विन्सटन चर्चिल - इंग्लंडचे राष्ट्रीय महानायक

इंग्लंडचे दोन वेळा पंतप्रधान राहिलेले विन्सटन चर्चिल हे जगातील सगळ्यात विवादित व्यक्तिमत्व असेल. काही डाव्या विचारांच्या लेखकांनी तर विन्सटन चर्चिल यांना सरळ सरळ हिट्लरच्याच तोडीचा हुकूमशहा म्हणून घोषित केले आहे. कोणाचेही मत विन्सटन चर्चिल बद्दल चांगले असेल असे वाटत नाही, तरी देखील विन्सटन चर्चिल हे इंग्लंडचे राष्ट्रीय महानायक आहेत.  

विशेषतः भारतासाठी, भारतीय नेत्यांसाठी विन्सटन चर्चिल हे सगळ्यात मोठे खलनायक आहेत. कारण त्यांनी नेहमीच भारतीयांना जंगली-रानटी विशेषण लावली. भारतीय नेत्यां विषयी त्यांनी कधीच चांगले उद्गार काढले नाहीत. अगदी  भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पाच महिने अगोदर चर्चिल यांनी ब्रिटिश संसदेत भाषण करतांना म्हणाले,"भारतातील सगळे नेता कमी दर्जा आणि क्षमतावले आहेत. त्याचे बोलणे जरी गोड असले पण हृदयातून ते बिनकामाचे आहेत. ते सत्ते करता एकमेकांशी भांडतील आणि याच राजकारणात देशाला डुबवतील. या तर्हेने भारतातील सत्ता दृष्ट, बदमाश आणि लुटारुंच्या हातात जाईल. या नेत्याच्या संपत्तीच्या हव्यासापोटी एक दिवस असा येईल कि भारतीय जनतेला हवा आणि पाण्यावर पण कर द्यावा लागेल." भारताला स्वातंत्र्य देण्याच्या ठाम विरोधात विन्सटन चर्चिल होते. अर्थात विन्सटन चर्चिल काही पूर्णपणे खोटे बोलले असे आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर ७० वर्षांनी कोणी म्हणू शकणार नाही. महात्मा गांधी यांच्या बद्दल तर चर्चिल यांना विशेष राग होता, ते महात्मा गांधी यांना "नंगा फकीर" म्हणून संबोधित करत, १९४२ मध्ये महायुद्ध सुरु असतांना महात्मा गांधी उपोषणाला बसणार असे कळल्यावर पण चर्चिल त्यांच्याशी वाटाघाटी करण्यास विरोध करत होते, इतकेच नव्हे तर "या उपोषणात महात्मा गांधी यांचा जीव गेला तरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न प्रशासनानी करू नये,मरू द्यावे" असे वक्तव्य पण त्यांनी केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४३ मध्ये बंगाल येथे पडलेल्या भयानक दुष्काळ आणि त्यात मृत्युमुखी पडलेले दुर्दैवी ३० लाख भारतीय यांच्या मागे विन्सटन चर्चिल यांचेच निर्णय कारणीभूत होते हे शंभर टक्के सत्य आहे. १९४७ ला इंग्लंडने भारताला स्वातंत्र्य दिले तेव्हा विन्सटन चर्चिल यांना फक्त एकच समाधान होते कि आपण पंतप्रधान असतांना भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले नाही, कारण जून १९४५ साली दुसऱ्या महायुद्धा नंतर झालेल्या निवडणुकीत विन्सटन चर्चिल यांचा हुजूर पक्ष निवडणूक हरला होता. 
अर्थात ब्रिटनचे बहुसंख्य याच मताचे असल्यामुळेच भारताला २०० वर्षे पारतंत्र्यात रहावे लागले, त्या मुळे विन्सटन चर्चिल काही वेगळे विचार मांडत किंवा वेगळ्या पद्धतीने भारता सोबत वागत होते अश्यातील भाग नाही, शेवटी त्यांची मानसिकता भारताला ओरबाडायची आणि भारतीयांना नागवायचीच होती, अर्थात हे अजिबात विसरता कामा नये कि ते मालक होते आणि आपण गुलाम ! विन्सटन चर्चिल हे उच्चकोटीचे देशप्रेमी होते. १८९५ साली सैन्यात भरती झाले होते, ब्रिटन करता त्यांनी १८९७ आणि १८९८ साली युद्धात भाग घेत रणांगणावर उतरलेले योद्धे होते. १९०० पासून विन्सटन चर्चिल ब्रिटन संसदेत सदस्य म्हणून दाखल झाले, संसदेत पण त्यांची प्रतिमा एक अभ्यासू आणि लढाऊ सदस्य म्हणून तयार झाली. १९०९ साली त्यांना गृहसचिवपद मिळाले, पण आपल्या आक्रमक स्वभाव आणि बेधडक वक्तव्य करण्याच्या सवयीपायी तत्कालीन औद्योगिक तंटे शांतपणे सोडवण्यात त्यांना अपयश आले आणि १९११ साली त्यांना नौसेनेचे अध्यक्षपद देण्यात आले, हाडाचे सैनिक असलेल्या चर्चिल यांनी तेव्हा ब्रिटनच्या नौसेनेमध्ये दूरदर्शीपणाने अनेक आधुनिक बदल केले, त्याचा फायदा १९१४ साली पहिले महायुद्ध सुरु झाले तेव्हा ब्रिटन नौसेनेला झाला. अर्थात त्यांच्या नावावर काही ठिकाणी आर्तक्य निर्णय घेत अनेक सैनिकांच्या मृत्यूची जवाबदारी पण आली होती, निर्भसना सहन करावी लागली, त्यांच्या निर्णय क्षमतेवर पण प्रश्न उचलल्या गेले. विन्सटन चर्चिल या बाबत पण आपण देशाच्या प्रदीर्घ फायद्यासाठी तसे निर्णय घेतल्याच्या मतावर ठाम होते. पण विन्सटन चर्चिल यांचे नेतृत्वगुण उजळून निघाले ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते ब्रिटनचे पंतप्रधान झाले तेव्हा.  
ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान नोव्हिल चेंबर्लेन हे ब्रिटनने कोणत्याही युद्धात उतरावे या मताचे नव्हते, "आपल्याला माहित नसलेल्या सुदूर देशात भांडण झाल्यामुळे आपण येथे खंदक खोदून, गॅस मास्क लावून बसणे हे अतिशय भयानक आहे. नसत्या भीतीने झालेले भांडण हा युद्धाचा विषय असावा हे अशक्य आहे."  हे नोव्हिल चेंबर्लेन यांचे वक्तव्य युरोपात सुरु असलेल्या जर्मनीच्या दादागिरीला ब्रिटनने उत्तर द्यावे या विचारांना आळा घालणारे होते. या करता नोव्हिल चेंबर्लेन यांनी हिटलर सोबत एक करार "म्युनिक कॉन्फरन्स" पण करून आले होते. पण विन्सटन चर्चिल आणि त्यांचे समर्थक हिट्लरवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण ब्रिटनचे राजे किंग जॉर्ज सहावे, त्यांचे मित्र आणि ब्रिटिश परराष्ट्र मंत्री एडवर्ड वूड फर्स्ट अर्ल ऑफ हॅलिफॅक्स, स्वतः पंतप्रधान नोव्हिल चेंबर्लेन यांना मात्र ब्रिटनने शांत राहावे असे मत होते.  
पण ३ सप्टेंबर १९३९ साली ब्रिटनने हिटलरच्या जर्मनी विरोधात युद्धाची घोषणा केल्यावर विन्सटन चर्चिल यांना पुन्हा नौसेनेचे अध्यक्षपद देण्यात आले. पण मे १९४० पर्यंत जर्मनीने युद्धात मोठी आघाडी घेत चेकोस्लाव्हिया, पोलंड, डेन्मार्क सोबत नॉर्वेला ताब्यात घेतले, आता तो बेल्जीयमचा आणि उर्वरित युरोप घशात घालायला तयार झाला आणि ब्रिटनमध्ये राजकीय उलथापालट झाली. ब्रिटनच्या विरोधी पक्षाला ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान नोव्हिल चेंबर्लेनच्या युद्ध विषयक धोरणांवर अजिबात विश्वास राहिला नाही आणि त्यांनी पंतप्रधानां विरोधात अविश्वास ठराव संसदेत मांडला. नोव्हिल चेंबर्लेनच्या जागेवर कोणाला आणायचे याचा शोधही सुरु झाला होता. वाढत विरोध लक्षात घेता नोव्हिल चेंबर्लेन यांनी राजीनामा द्यायचे ठरवले आणि फक्त विरोधी पक्षाचे समर्थन मिळवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान म्हणून विन्सटन चर्चिल यांचे नाव समोर आले. एक नवीन युद्धकालीन राष्ट्रीय सरकार बनविल्या गेले. ब्रिटिश परराष्ट्र मंत्री एडवर्ड वूड फर्स्ट अर्ल ऑफ हॅलिफॅक्स, नोव्हिल चेंबर्लेन या आपल्या विरोधकांना सोबत घेत विन्सटन चर्चिल पंतप्रधान झाले.   
विन्सटन चर्चिल पंतप्रधान झाले ती वेळ अत्यंत प्रतिकूल अशी होती. तत्कालीन सोवियत रशियाने हिटलर सोबत आक्रमण न करण्याचा शांतता करार केला होता, तर अमेरिकेन संसदेने तटस्थतेचे धोरण असलेला कायदाच संमत केला होता, जो युरोप ब्रिटनच्या खांद्याला खांदा देत लढू शकत होता तो पूर्णपणे जर्मनीच्या घशात गेला होता, बेल्जीयम ताब्यात घेत जर्मनी आता फ्रांसमध्ये मुसंडी मारून आघाडी घेत होता, युरोप मध्ये ब्रिटन नौसेनेला चांगलाच तडाखा बसला होता, जवळपास साडे तीन लाख ब्रिटिश सैनिकांचा जीव कसा वाचवायचा या चिंतेत ब्रिटीश सरकार पडले होते, त्यातच एडवर्ड वूड फर्स्ट अर्ल ऑफ हॅलिफॅक्स, नोव्हिल चेंबर्लेन सारखे विरोधक हिटलर सोबत शांतता करार करण्याचा दबाव वाढवत होते, राजे किंग जॉर्ज सहावे यांचे मत पण विन्सटन चर्चिल बाबतीत अजिबात चांगले नव्हते. अश्या परिस्थितीत विन्सटन चर्चिल यांनी १३ मे रोजी संसदेत पंतप्रधान म्हणून आपले पहिले भाषण केले त्यात त्यांनी पहिलेच निक्षून सांगतिले कि, "हि लढाई इतिहासातील सगळ्यात महत्वपूर्ण, निष्टुर आणि कदाचित अनेक महिने-वर्षे चालेल अशी लढाई असून या करता आपण तयार राहिले पाहिजे, या साठी रक्त, परिश्रम, अश्रू आणि घाम या शिवाय देण्यासारखे माझ्याजवळ दुसरे काही नाही. या लढाई साठी आमची नीती एकच आहे ती म्हणजे आपण आकाश, पाणी आणि जमिनीवर संपूर्ण ताकदीने हल्ला करून लढायची! आणि आमचे लक्ष एकच आहे "विजय" ! " इतक्या प्रतिकूल परिस्थिती असे भाषण फक्त एक हाडाचा सैनिकच देऊ शकतो. 
देशातील काही लोकांना युरोपातील युद्धाविषयी आणि त्या पाई देशावर येणाऱ्या संकटाचे कोणतेही गांभीर्य नसतांना, अमेरिके सारखे इतर पण मतदीचा हात आखडता घेत असतांना, एडवर्ड वूड फर्स्ट अर्ल ऑफ हॅलिफॅक्स, नोव्हिल चेंबर्लेन सारखे राजकारणी हिटलर सोबत शांतता करार करण्यासाठी दबाव वाढवत असतांना, विन्सटन चर्चिल दबावात झुकले नाही तर प्रसंगी मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची धमकी देत सरकारच धोक्यात आंत असतांना, हिटलरचे सैन्य फ्रांस ताब्यात घेत समोर येत असतांना आणि महत्वाचे म्हणजे पराभूत मनस्थितीत देशाचे उच्च लष्करी अधिकारी पोहचले असतांना, आपल्या मतावर ठाम फक्त विन्सटन चर्चिलच राहू शकले. 
पण, "देश युद्ध दोन वेळा हरतो, सगळ्यात पहिले हरतो तो सेना अधिकाऱ्यांच्या - राजकारण्यांच्या मनात आणि नंतर रणांगणावर." या उक्तीवर प्रचंड विश्वास असलेल्या विन्सटन चर्चिल फ्रांसच्या जमिनीवर अडकलेल्या आपल्या तीन लाख सैन्याला वापस आणायचा चंग बांधला, कारण या सैनिकांना सोडवून आणू शकलो तरच आपण आपल्या सैन्य अधिकर्यात, आपल्या जनतेत युद्ध जिंकण्याचा आत्मविश्वास पुन्हा तयार करू शकू असा विश्वास निर्माण करू शकू याची पूर्ण जाणीव विन्सटन चर्चिल यांना होती. पण फ्रांसच्या जमिनीवर, आकाशात आणि पाण्यात जर्मन प्रभुत्व झाले होते आणि आता डंकन क्रिक येथे अडकलेल्या आपल्या सैनिकांना सोडवून आणणे हि आपले आर्थिक आणि मनुष्य बाळाचे अनावश्यक नुकसान करणारी गोष्ट आहे असे बहुतेक सैन्य अधिकाऱ्यांचे, राजकारण्यांचे मत होते, सोबतच आता जर्मन सोबत जिंकलेल्या युरोपीय देशांची सामुग्री, मनुष्यबळ होते आणि त्या मुळे हिटलरचे सामर्थ्य वाढले असून आपण त्या सामर्थ्याला तोंड देऊ शकू का ? असा प्रश्न या सगळ्यांना पडला होता.  या पेक्षा आपण हिटलर सोबत शांतता करार करावा असा दबाव एडवर्ड वूड फर्स्ट अर्ल ऑफ हॅलिफॅक्स, नोव्हिल चेंबर्लेन सतत करत होते.  
विन्सटन चर्चिल यांनी ऍडमिरल रैमजी यांच्या सोबत डंकन क्रिक मधून आपल्या तीन लाख सैनिकांना सोडवून आणायची एक धाडसी योजना बनवली," जनतेची मदत घेण्याची" ! "ऑपरेशन डायनमो"! ब्रिटनच्या त्या भागात असलेल्या मच्छीमार, जनतेच्या वयक्तिक नावांची मदत घेत फ्रांसच्या डंकन क्रिक येथे अडकलेल्या आपल्या सैनिकांना सोडवून आपल्या देशात परत आणायचे. विन्सटन चर्चिल यांच्या प्रयत्नांना यश आले जवळपास ९०० वयक्तिक नावा देशवासीयांनी या अभियानासाठी तयार केल्या आणि आपण अजून युद्धाला तयार असल्याचे, हे युद्ध ब्रिटन पर्यंत आले तर घरा घरातून युद्ध लढू पण हिटलर समोर झुकणार नसल्याचा निर्धार पण दाखवला. २६ मे १९४० या दिवशी हे अभियान "ऑपरेशन डायनमो" सुरु झाले. याच दिवशी विन्सटन चर्चिल यांनी देशांच्या संसद सदस्या सोबत वार्तालाप करत, आपण हिटलर सोबत होणाऱ्या कोणत्याही शांतता कराराला आपल्या देशाचे आत्मसमर्पण समजतो आणि आत्मसमर्पण करण्यास आपला पूर्णपणे विरोध असल्याचे वक्तव्य केले. सोबतच युद्ध मंत्रिमंडळाच्या बैठकीत पण आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत एडवर्ड वूड फर्स्ट अर्ल ऑफ हॅलिफॅक्स, नोव्हिल चेंबर्लेन यांना सरकारचा पाठींबा काढला तर काहीही हरकत नसल्याचे सांगत खणबीर भूमिका घेतली. 
 "देशातील काही मनुष्य हानी, काही ऐतिहासिक इमारती वाचवण्यासाठी जर आपण आपल्या देशाचा आत्मसन्मान गहाण टाकत अश्या देशासोबत "शांतता करार" करण्याच्या आड आत्मसमर्पण करणार असू, जो अत्यंत जुलमी आणि मानवतेचा शत्रू आहे तर आपण आपले अस्तित्व हरवू, देशाचे अस्तित्व हरवू, आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाही. इमारती पुन्हा उभ्या राहू शकतात, पण आत्मसन्मान, आत्मविश्वास पुन्हा सहजतेने साध्य करता येणार नाही." असे भाषण ब्रिटिश संसदे समोर देत विन्सटन चर्चिल संसदेचे समर्थन प्राप्त केले. डंकन क्रिक येथे अडकलेल्या तीन लाख सैनिकांना सोडवून आणत देशाला प्रदीर्घ युद्धासाठी तयार केले, देशाच्या जनतेचा, सैन्याचा आत्मविश्वास वाढवला आणि दुसऱ्या महायुद्धाचा पुढील इतिहास तर आपल्याला माहीतच आहे.   
"जे देश लढून मरतात, ते फिनिक्स सारखे पुन्हा जिवंत होतात, पण जे देश न लढता आत्मसमर्पण करतात, ते नष्ट होतात, आपले अस्तित्व हरवून बसतात."  या उक्ती वर विन्सटन चर्चिल यांचा पूर्ण विश्वास होता, याच विश्वासाच्या बळावर त्यांनी १० मे १९४० रोजी पंतप्रधान पद सांभाळल्यावर आपल्यावर असलेले आत्मसमर्पणाचे सगळे दबाव झुगारत स्वतःच्या बळावर आपण आपल्या सैनिकांना सोडवू शकतो असा विश्वास २६ मे १९४० ला आपल्या सैन्यामध्ये, नागरिकांमध्ये फक्त १६ दिवसात निर्माण केला आणि ते त्या प्रमाणे वागले. तत्कालीन काळात जे लोक, नेते, देश विन्सटन चर्चिल यांच्या देशाला विजय मिळवून द्यायच्या मार्गात अडथळा निर्माण करत होते ते सगळे विन्सटन चर्चिल यांच्या करता शत्रू होते आणि त्यांनी शत्रूंशी शत्रू प्रमाणेच व्यवहार केला, त्यात त्यांनी कोणतीही मानवता दाखवली नाही हेच खरे.  

टिप्पण्या