महात्मा गांधी यांचे वर्णद्वेष-वंशद्वेष, सामाजिक भेदभाव या विरोधातील कार्य जगमान्य आहे आणि म्हणूनच अमेरिकेत झालेल्या वर्णद्वेषा विरोधी दंगलीत कृष्णवर्णीय आणि त्यांच्या समर्थकांकडून अमेरिकेच्या राजधानीतील भारतीय दूतावासा समोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना विचारशील माणसाला व्यथित करते आणि मनात प्रश्न उभे करते कि असे का घडले असेल ?
आपल्याला माहीतच आहे कि दक्षिण आफ्रिकेत वकिली करत असतांना महात्मा गांधी यांना वर्णद्वेषातून गाडीच्या बाहेर फेकत अपमानित झालेल्या महात्मा गांधी यांचे नवीन रूप जगासमोर आले. यातूनच दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेष विरोधी पहिल्या मोठ्या आंदोलनाचा जन्म झाला, पुढील इतिहास पण आपल्याला माहित आहे. याच दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी विरोधी आंदोलनातील दुसरे मोठे नाव म्हणजे नेल्सन मंडेला ! वर्णद्वेषी विरोधी आंदोलन यशस्वी करणारे, त्या करता मोठा कारावास भोगणारे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती नेल्सन मंडेलांनी पण अनेक वेळेला खुल्या दिलाने आपल्या वर्णद्वेषाच्या विरोधातील आंदोलनाच्या जडणघडणीत, आंदोलनाच्या प्रेरणेत महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव मान्य केला आहे. इतकेच नाही तर दिल्ली येथील एका संमेलनाला व्हिडीओ द्वारे संबोधित करतांना महात्मा गांधीं विषयी गौरवउद्गार काढत म्हंटले, "दक्षिण आफ्रिकेत झालेल्या शांततापूर्ण परिवर्तना मध्ये महात्मा गांधी यांचे योगदान अजिबात छोटे नाहीये, त्यांच्या तत्वांच्या बळावरच दक्षिण आफ्रिकेतील अतिशय वर्णभेदाच्या द्वेषपूर्ण घृणित धोरणाच्या विरोधात जनतेला एकत्रित करून आम्ही हा भेदभाव संपवू शकलो."
जी भावना महात्मा गांधी यांच्या बाबत नेल्सन मंडेला यांची होती तशीच भावना अमेरिकेतील वर्णद्वेष विरोधी आंदोलनातील महानायक मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांची पण होती. १९५५ पर्यंत अमेरिकेत या कृष्णवर्णीय आफ्रिकन अमेरिकन लोकांसोबत होणारा भेदभाव हि एक साधारण घटना होती. अमेरिकेतील सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेस मध्ये पण कृष्णवर्णीय वेगळ्या जागा असायच्या, हा भेद संपवण्यासाठी मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी ३८१ दिवसांचे एक यशस्वी आंदोलन केले आणि अमेरिकेत या भेदभावाला विरोधात एक नवीन पर्व सुरु केले. स्वतः मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी पण महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानातुन मिळणाऱ्या प्रेरणेचा अनेकदा उच्चार केला होता.एका ठिकाणी स्वतः मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) असे सांगतात कि, "१९४० साली मी पहिल्यांदा महात्मा गांधी यांचे विचार वाचले आणि त्या विचारांनी ते इतके प्रभावित झाले कि मी लागोलग महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानाची पुस्तके विकत घेऊन अभ्यासण्यास सुरवात केली." हि पुस्तके अभ्यासल्या नंतर मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी आपले मत प्रगट केले कि,"महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान वाचून सत्ताप्राप्तीची माझी ओढ हळूहळू संपली. अहिंसेच्या तत्वावरील आणि मार्गावरील माझा विश्वास वाढला. सामाजिक सुधारणा शाश्वत मार्गाने करण्याचा हाच एक मार्ग आहे आणि याच मार्गात ती क्षमता आहे असे माझे पक्के मत झाले आहे."
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यालयात पण त्यांनी महात्मा गांधी यांचे छायाचित्र लावले होते, या मागे पण प्रेरणा महात्मा गांधी यांच्या वर्णद्वेषी विरोधी आंदोलनापासून त्यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानापर्यंतची असल्याचे मान्य केले होते. भारतात काय किंवा जगात इतरत्र काय महात्मा गांधी यांच्या वर्णभेद, वंशभेद या विरोधात दिलेल्या लढाया बद्दल, या भेदभावाची पीडितांच्या अधिकारांबाबत त्यांनी केलेल्या कामा बद्दल, त्यांच्या सत्य-अहिंसेच्या तत्वज्ञाना बद्दल, नियमित बोलले जाते, शिकवले जाते. जागतिक स्तरावर महात्मा गांधी यांच्या तत्वांचे गारुड अनेक नेते आणि आंदोलकांच्या मनावर आहे, महात्मा गांधी यांनी या सगळ्या भेदभावाला केलेला विरोध, केलेला त्याग जगाला माहित आहे. इतिहासात हा आपल्याला शिकवलं जातो, तसा तो जगात पण इतरत्र हि शिकवलं जातो, सांगितलं जातो, गौरविल्या जातो. मग प्रश्न उभे राहतात कि महात्मा गांधी यांनी ज्यांच्या उन्नतीसाठी आपले जीवन घालवले तेच लोक विवेकहीन होत त्यांच्या पुतळ्याची विटंबना का करतात ?
अर्थात ज्यांनी महात्मा गांधी यांच्या अतिरिक्त प्रेमाने, गांधी विचारांच्या अतिरिक्त प्रेमात आपले डोळे बंद केले आहे, जे महात्मा गांधी यांच्या विचारांच्या चिकित्सेलाच तयार नाहीये त्यांच्या करता हा बदल धक्कादायक असेल. भारतात तर हि प्रक्रिया किंवा महात्मा गांधी यांच्या विचारांचा किंवा त्यातील विरोधाभासाचा विरोध त्यांच्या हयातीतच सुरु झाला होता. त्यातूनच त्यांच्या हत्येसारखा अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला. मात्र तथाकथित गांधीवादी तेव्हा पण याला गांधीवादाचा प्रभाव मानायला तयार नव्हते. कृष्णवर्णीय जगतात पण साधारण १० वर्षांपासून हळू आवाजात महात्मा गांधी यांच्या विरोधात मतप्रदर्शन व्हायला लागले होते आणि गंमत म्हणजे त्याचा मुख्य रोख महात्मा गांधी हे कृष्णवर्णीय आफ्रिकन लोकांना भारतीय लोकांपेक्षा कमी दर्जाचे मानत असा होता.
आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांसाठी यांनी लढा दिला असे आपल्याला भारतात शिकवले जाते. पण दक्षिण आफ्रिका आणि आफ्रिकेतील इतर देशातील अभ्यासकांच्या मते महात्मा गांधी यांनी लढा दिला तो समस्त कृष्णवर्णीयांसाठी नाही तर फक्त भारतीय वंशाच्या कृष्णवर्णीयांसाठी! उलट दक्षिण आफ्रिकेतील तत्कालीन ब्रिटिश शासन जे कृष्णवर्णीय आफ्रिकन लोकांशी वागणूक करत होते त्याला महात्मा गांधी यांचा पाठींबाच होता. तसेच महात्मा गांधी यांनी मूळ कृष्णवर्णीय आफ्रिकी जनतेला 'असभ्य', 'अर्धे मूलनिवासी', 'जंगली', 'घाणेरडे', 'जनावरांसारखे', असे हिणवले असल्याचे मत पण या अभ्यासकांनी नोंदले आहे.
२०१६ मध्ये घाना या आफ्रिकन देशात सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या विरोधात आंदोलन झाले. घाना विश्वविद्यालयाच्या आवारात भारत-घाना मैत्रीचे प्रतीक आणि गांधी यांनी केलेल्या वर्णद्वेषी लढाईच्या सन्मानार्थ हा पुतळा बसवण्यात आला होता. पण घाना विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या विरोधात मोठे आंदोलन करत पुतळा हलवण्यास भाग पाडले. त्या नंतर मोठे आंदोलन आग्नेय आफ्रिकेतील मलावी या देशात महात्मा गांधी यांच्या प्रस्तावित पुतळ्याच्या विरोधात झाले. २०१९ मध्ये ब्रिटन मधील मँचेस्टर येथे पण प्रस्तावित महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला तेथील कृष्णवर्णीय आफ्रिकन जनतेने मोठा विरोध केला. भारत, युरोप करत आता हे लोण पार अमेरिकेपर्यंत पोहचले असल्यास नवल नाही.
त्या मुळे अमेरिकेतील वर्णद्वेषा विरोधातील दंगलीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना हि आश्चर्य आणि दुःख व्यक्त करण्याची घटना नसून गांधीवाद्यांसाठी आत्ममंथन करण्याची घटना आहे. शेवटी मोहनदास करमचंद गांधी पण एक माणूस होते, त्या नुसार त्यांच्या विचारात, वागणुकीत पण अनेक विरोधाभास होते. त्यातून अनेक समजुती - गैरसमजुती या उभ्या राहिल्या. पण गांधीवाद्यांनी "महात्मा" चा दर्जा दिलेल्या मोहनदास गांधी यांच्या विचारांची चिकित्साच कधी केली नाही. महात्मा गांधी यांच्या नावाचा राजकीय फायदा जिवंतपणी आणि त्यांच्या मृत्यू नंतरही होतो म्हंटल्यावर भारतातिलकही राजकीय पक्षांनी पण या चिकित्से कडे दुर्लक्ष तर केलेच उलट अशी चिकित्सा करणाऱ्यांची नेहमी भर्त्सना करण्यातच धन्यता मानली. आता तरी अश्या घटनांतून हि तथाकथित गांधीवादी जागे होतील अशी अपेक्षाच आपण करू शकू.
मात्र आपण जागे होत गांधीवादाची चिकित्सा करण्यासाठी आपला इतिहासाचा अभ्यास, इतिहासाचे आकलन वाढवायची गरज आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा