भारत सरकारने दादागिरी करणाऱ्या चीन विरोधातील पाऊल म्हणून जवळपास ५८ चिनी अँप वर बंदी घातल्याचे जाहीर केले आणि आपल्या देशात नेहमी प्रमाणे उलट सुलट चर्चा सुरू झाल्या.
बंदी हुकुमावर पहिला आक्षेप हा होता की चिनी अँप वर बंदी घालून चीनच्या आर्थिक साम्राज्याचे आपण काय वाकडे करणार आहोत? वर वर बघायला गेलो तर काही चिनी अँप वर बंदी घालून आपण चीनचे काहीही वाकडे करू शकणार नाही. एव्हड्याश्या अँपचा जीव किती ? आणि त्याच्यातून चीनला मिळणारा महसूल किती? काय फरक पडणार आहे या अँप वर बंदी घालून? असा प्रश्न नक्कीच पडायला हवा!
पण थोडं थांबा पुन्हा एकदा विचार करा, आता एक उदाहरण देतो, बघा tiktok हे व्हिडीओ बनवणारे चिनी अँप जगभरात प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगात २ अब्ज इंस्टोल पैकी ६११ दशलक्ष इंस्टोल फक्त आपल्या देशात आहे. १७ अब्ज डॉलर्सची वार्षिक उलाढाल आहे या अँपची ! या अँपच्या कमाईत भारताचा हिस्सा आहे जवळपास ३०%, म्हणजे हा अँप जगभरातून जितके कमावतो त्याच्या ३०% फक्त भारतातून कमावतो, आणि tiktok बाजारातील किंमत आहे जवळपास १०० अब्ज डॉलर्स. आता या अँपचा भारतातील ३०% धंदा एकाएकी बंद झाला तर या कंपनीची व्हॅल्यू पण घसरली, आता या अँपच्या अपडेट साठी, जाहिरातीसाठी, केलेला खर्च सगळा बुडाला, याचा फटका जरी चीन सरकारला बसला नसला तरी भांडवल टाकणाऱ्या चीन्यांना नक्कीच बसला आहे आणि कोणीही इतका मोठा फटका एका रात्रीत तेही आपल्या सरकारच्या आततायी पणापाई कोणी सहन करणार नाही. ते काही प्रमाणात या विरोधाची भुण भुण सरकार कडे करतील, एकदम भरताप्रमाणे सरकारला शिव्या वगैरे प्रकार घडले नाही तरी चीन सरकारवर याचा दबाव नक्कीच वाढेल.
मुख्य म्हणजे Tiktok सारखे व्हिडीओ बनवणाऱ्या अँप मधून मोठ्या प्रमाणावर धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणारे, दहशत घालणारे व्हिडीओ सतत आणले जात होते त्याला आता काही प्रमाणात लगाम लागेल. सरकारने अँप वर बंदी घालत योग्य पाऊल उचलले आहे असे मला तरी वाटते.
आता प्रश्न असा पडतो की ज्या मोबाईल ऍप कंपन्या मध्ये चिनी पैसा लागलाय त्या कंपन्या बंद करण्याचे धारिष्ट सरकार कधी दाखवणार? कारण अनेक भारतीय कंपन्यात चिनी आर्थिक गुंतवणूक आहे, जसे
Paytm, PhonePe, Swiggy, Zomato, OYO, OLA इत्यादी कंपन्या मध्ये जवळ जवळ २८,००० कोटी ची गुंतवणूक केली आहे चीन ने, जी या सरकार ने विना तक्रार बिनबोभाट सुरू ठेवल्या आहे हे सरकारला कसे चालते? वगैरे फालतू प्रश्न विचारल्या जात आहे.
या करता पहिले लक्षात घ्या की, आर्थिक गुंतवणूक हा वेगळा विषय आहे. लक्षात घ्या चिनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यावर असे लक्षात आले होते की गुंतवणूक बाजाराची नाजूक अवस्थेचा फायदा घेत चीन सरकार जगातील महत्वाच्या कंपन्यांचे शेअर विकत घेत त्यातील आपली गुंतवणूक वाढवायचा प्रयत्न करत आहे. जेणे करून उद्या या संस्थांच्या व्दारे चीन देशाची अर्थव्यवस्था हाताळू शकते. आठवत असेल तर चीनची HDFC मधील गुंतवणूक. त्या वेळेपासूनच फक्त भारतातच नाही तर अमेरिका, जर्मनी, जपान इत्यादी देशांनी चीनच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक गुंतवणूकिवर बंदी आणली आहे.
दुसरे की आता पर्यंत ज्या भारतीय कंपनीमध्ये चिनी गुंतवणूक आहे कदाचित चीन काढून घेईल, त्या मुळे आपल्याला आपल्याच अश्या कंपन्यांवर काही कारवाई करण्याची गरज नाही. कारण कितीही झाले तरी त्या भारतीय कंपन्या आहेत. मात्र चीनने त्यांच्यातील गुणवणूक काढून घेतली तर तितकी गुंतवणूक देशातून आणि चीन वगळता इतर राष्ट्रातून व्हायला हवी याची काळजी मात्र आपण घ्यायला हवी.
पुन्हा एकदा महत्वाचे लक्षात घ्या की, ज्या चिनी अँप वर भारत सरकारने बंदी घातली आहे ती आर्थिकतेच्या कारणांनी नाही तर सुरक्षेच्या करणाखाली घातली आहे. जुन्या बातम्या वाचाल तर गेल्या अनेक महिन्यापासून या अँप वर बंदी घालायची मागणी सायबर एक्सपर्ट आणि गुप्तचर खाते करत होते. UC ब्राऊजर तर यात सगळ्यात वरती होते, अमेरिकन सरकारने या वर पहिलेच बंदी घातली आहे.
आता महत्वाचा प्रश्न काल सरकारने बंदी जाहीर करून अजून या अँप मोबाईलवर दिसत आहेत, इंस्टोल होत आहेत ते कसे? सरकारने या अँप वर बंदी टाकल्यावर सगळ्यात पहिले तर गूगल प्ले काही दिवसात या अँप आपल्या प्ले स्टोअर वरून हटवेल, नव्हे तसे करणे त्याला कायदेशीर रित्या बंधनकारक असेल. तसेच या अँप वर बंदी घातली असून या अँप कडे जाणारी रहदारी अडविण्याचा आदेश इंटरनेट प्रोव्हायडरला दिला जाईल, त्या नंतर त्यांच्या कडून हा डेटा ट्राफिक ब्लॉक केल्या जाईल.
त्यामुळे येत्या काही दिवसात या अँपचे अपडेट्स मिळणे, टेक्निकल सपोर्ट मिळणे बंद होईल आणि हे अँप काही कामाचे राहणार नाही. याला थोडा वेळ लागतो म्हणून आज हे अँप तुमच्या फोनवर काम करत आहे. पण लवकरच त्याची उपयोगिता संपेल, तेव्हा आजच या अँपला आपल्या फोन मधून काढून टाका.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा