मानखुर्दच्या करिश्मा भोसले यांनी मशिदी वरील भोंग्यांवरून मोठया आवाजात होण्याऱ्या अजान विरोधात आवाज उठवला आणि हा मुद्दा पुन्हा एकदा कोमातुन बाहेर आला. या अगोदर पण या विरोधात प्रसिद्ध गायक सोनू निगम याने आवाज उठवला होता.
मशिदी वरील भोग्यांच्या विरोधात आवाज उठवणारी रणरागिणी करिश्मा भोसले असो, की पूर्वी आवाज उठवणारा सोनू निगम यांच्या वाट्याला आला तो "विरोधच" ! मानखुर्दच्या माननीय आमदारांनी करिश्मा भोसलेला "आवाजाचा त्रास होत असेल तर घर बदल" असा सल्ला पण दिला आहे.
वर्षातील ३६५ दिवस दिवसातून ५ वेळा मशिदी वरील या भोंग्यातून देशभरातील मशिदीतून मोठ्या आवाजात अजान दिली जाते. शहराच्या ज्या भागात मशीद आहे किंवा अनेक मशिदी आहेत त्या विभागाच्या जवळ राहणाऱ्या इतर धर्माच्या लोकांना त्या ध्वनी प्रदूषणाचा चांगलाच त्रास होतोच, पण या मुळे इतर धर्माच्या प्रार्थना स्थळावर पण भोंगे लावायची आणि मोठा आवाज करायची एक वेगळी स्पर्धा सुरू होते, भांडणे होतात. मात्र या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो तो लहान पोरांना, वृद्धांना आणि रुग्णांना! पण धार्मिक वेड लागलेले विचारात घेत नाही.
कायदेशीर रित्या या मशिदीवरील भोंग्यांना पायबंद घालायचा प्रयत्न पण देशात, राज्यात जनक्कीच झाला आहे. उच्च न्यायालयाने "ध्वनी प्रदूषण नियमन अधिनियम २०००" च्या आधारे मशिदी वरील भोंग्यांना आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. औद्योगिक भागात दिवसा ७५ डेसीबल, तर रात्री ७० डेसीबल, व्यावसायिक भागात दिवसा ६५ डेसीबल, तर रात्री ६० डेसीबल, रहिवासी भागात दिवसा ५५ डेसीबल, तर रात्री ४५ डेसीबल, तर शांतता क्षेत्रात जिथे शाळा, दवाखाने आहेत त्या भागात दिवसा ५० डेसीबल, तर रात्री ४० डेसीबल अशी मर्यादा घालून दिली आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की, राज्यात कुठेही ही आवाजाची मर्यादा पाळली जात नाही. इतकेच नाही तर संवैधानिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करण्यास प्रशासन पण दुर्लक्ष करते. मुख्य म्हणजे राज्यातील या भोंगे युद्धात भाग घेणाऱ्या अनेक प्रार्थनास्थळांना (प्रार्थनास्थळ हा शब्द मुद्दाम वापरत आहे कारण यात सगळ्या धर्माची प्रार्थना स्थळे येतात म्हणून) भोंग्यांना शासकीय परवानगी न घेताच लावल्या गेले आहे. पण कायदा राबवण्याची जवाबदारी ज्या पोलीस खात्यावर आहे तेच या बाबतीत उदासीन आहे, कदाचित राजकीय दबाव त्यांच्यावर असेल!
मानखुर्द मधील भोंग्यविरोधातील ताज्या घटनेत पण पोलिसांची भूमिका भोंग्यांवर कारवाई करण्यापेक्षा प्रकरण दाबण्याची आणि करिश्मा भोसलेला शांत करण्याची, चूप बसविण्याची जास्त होती. त्यातही तेथील स्थानीय आमदार करिश्मा भोसले यांनी या भागातील आपले घर सोडून दुसरीकडे राहायला जायचा सल्ला देत असेल तर, तर तो सल्ला नसून धमकी आहे हे पोलिसांनी पण ध्यानात घ्यायला हवे. पोलीस या भोंग्यांवर आणि आमदारावर पण कारवाई करत नसेल तर या मागे नक्कीच राजकीय दबाव आहे हे उघड गुपितच आहे.
बाकी या सगळ्या प्रकरणात आवाज फुटला नाही तो राज्यातील तथाकथित पुरोगामी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकांकडून. दिवाळीतील फटाके, गणपतीत उत्सवात वाजणारी देवाची गाणी, होळी मध्ये जळणारी सुकलेली लाकडे आणि अंगावर उडवले जाणारे पाणी या मुळे होणारे प्रदूषण, त्या मुळे होणारी सार्वजनिक आरोग्याचे नुकसान जितके यांच्या डोळ्यात खुपते तितके हे मशिदीतील भोंगे का खुपत नाही? निदान या बाबतीत तरी किमान नियमाचे पालन करत हे भोंगे वाजविल्या गेले पाहिजे या साठी आग्रही भूमिका घेणे, जे भोंगे बेकायदेशीर रित्या, परवानगी न घेता लावले आहेत त्या विरोधात आवाज उठवणे, आंदोलने करणे हे यांना का जमत नाही? देवळात बोकडाचा, कोंबड्याचा बळी चढवणे ही अंधश्रद्धा आहे तर बकरी ईदेला बकऱ्याचा बळी देने श्रद्धा कशी? या विरोधात एखादा कायदा बनवावा असे अंनिस आणि पुरोगाम्यांना वाटत नाही काय? हे खरे प्रश्न नाहीत काय?
या सगळ्या प्रकरणा तुम्ही आम्ही नक्की आता काय करणार? हा पण एक खरा प्रश्न आहेच. कारण या भोंग्यांना जाहीर विरोध करणारा सोनू निगम असो, की आताची करिश्मा भोसले दोन दिवस या विषयावर आपण बोलू, लिहू आणि नंतर थंड बसू, अजून आपल्या हातात काय आहे? आपल्या पैकी अनेक संविधानप्रेमी जनतेने या भोंग्यविरोधात न्यायालयात संवैधानिक लढा दिला, पण न्यायालयाने दिलेले आदेशाची अमलबजावणी प्रशासन करणार नाही तर जनता हतबल होणार नाही का?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा