काय गंमत आहे बघा साम्यवादी विचारवंत आणि त्यांच्या वळचणीला बसलेले नेहमीच आज जोरावर असलेल्या आणि मुख्य म्हणजे देशाच्या सत्तेत असलेल्या उजव्या विचारधारेतील लोकांना नेहमी एकच प्रश्न विचारत की, "देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही नक्की काय करत होते? तेव्हा तुमची भूमिका नक्की काय होती?" बरे इतके विचारून गप बसतात का तर नाही, काहींनी मागितलेली माफी, काहींनी केलेली फितुरी लगेच कोणताही विचार न करता या उजव्यांच्या अंगावर टाकली जाते. भारतीय राजकारणातील हा एक मोठा विनोदी प्रकार आहे.
आता देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कम्युनिस्ट म्हणजेच साम्यवादी लोकांचे योगदान आहे काय? आणि साम्यवादी लोकांनी स्वातंत्र्य संग्राम काळात तुरुंगवास भोगला आहे का? या तील पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे "नाही". तर या प्रश्नातील दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे "हो", पण तो तुरुंगवास त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला म्हणून नाही भोगला हे पण स्पष्ट करणे आवश्यक आहे. पण उत्तर असे का? याची काही कारणे आहेत.
पहिले एक नक्कीच लक्षात घ्यायला हवे की ब्रिटिशां विरोधातील भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा १५० वर्षाचा इतिहास हा एकसंघ नक्कीच नाहीये. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या उद्देशाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय जनतेने आपला रोष ब्रिटिश सरकार विरोधात व्यक्त केला, तो रोष कधी व्ययक्तिक होता, कधी धार्मिक, कधी राजनैतिक, कधी सामाजिक, कधी वैचारिक! पण या सगळ्याचा समस्त भारतीय जनमाणसावर होणारा परिणाम एकच होता तो म्हणजे ब्रिटिश सत्ते विरोधात समस्त भारतीय जनतेचे एकत्रिकरण! सोबतच हे पण मान्य करायला हवे की महात्मा गांधी यांनी या देशवासीयांच्या एकत्रिकरणाचा चांगला उपयोग १९४२ च्या "चले जाव" आंदोलनात करून घेतला.
हेच कारण आहे की १८५७ च्या ब्रिटिश शासना विरोधातील बंडा नंतर महाराष्ट्राच्या भूमीत वासुदेव बळवंत फडके सारखे क्रांतिकारी १८७० मध्ये तयार झाले. या मागे नक्की कोणती विचारधारा होती? धार्मिक, राजकीय की सामाजिक? तर त्या मागे होता आज ज्याला तमाम डावे विचारवंत "विषारी" म्हणतात तो राष्ट्रवाद!
या काळात भारतातील शिक्षण व्यवस्था ब्रिटिश विचारा नुसार बदलत होती, भारतीयांना नवीन "वाघिणीचे दूध" म्हणून गौरवल्या गेलेल्या इंग्रजी भाषेची ओळख होत होती, सोबतच नवीन छापील पुस्तकांच्या प्रसारामुळे नवीन माहितीच्या भारतीयांच्या कक्षा रुंदावत होत्या.
या सगळ्यात भारतीयांवर प्रभाव पडत होता अमेरिकन स्वातंत्र्य संग्रामचा, फ्रेंच राज्यक्रांतीचा आणि नवीन सामाजिक जाणिवेचा. अमेरिकन सहसवाद, भांडवलशाही आणि स्वातंत्र्य, या सोबतच फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली समता आणि समाजवादाने भारतीय नव शिक्षित तरुणांना भुरळ घातली होती. पहिल्या महायुद्धा नंतर जगात अनेक बदल झाले, त्याचा असर आता भारतीय जनमाणसावर व्हायला लागला होता. त्याच मुळे का असेना धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या एकच असणारा हा विशाल प्रदेश आता एका "राष्ट्रवादी" भावनेने भारल्या गेला. भारतात समाजवादी विचारांचा पगडा अगोदर पडला.
पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१७ ला रशिया मध्ये बोल्शेविक क्रांती होत लेनिनने सत्ता कबिज केली. शेतकरी आणि कष्टकरी लोकांचे स्वतःचे सरकार असा या सरकारचा प्रचार करण्यात आला. अमेरिकन स्वातंत्र्य संग्राम असो की फ्रांस राज्यक्रांती या जगमध्ये बदल घडवून आणणाऱ्या घटना भारतीय तरुणांनी फक्त वाचल्या होत्या, पण रशियन क्रांती त्यांच्या समोर घडत होती. तेव्हा मार्क्स आणि लेनिनच्या तत्वज्ञानाकडे ही तरुणाई आकृष्ट झाली, भारावली नसती तर नवल. या भारावले पणातून अनेक तरुणांनी लेनिन आणि मार्क्सवादाचा अभ्यास सुरू करत, त्यांना समजावून घ्यायचा प्रयत्न सुरू केला. पण म्हणून ते लगेच साम्यवादी झाले असा त्याचा अर्थ होत नाही.
देशासाठी फासावर चढणारे भगतसिंग ही त्यातलेच. अर्थात त्यांनी आपल्या कारावासात, जीवनाच्या अंतिम टप्प्यात लेनिनचे चरित्र आणि रशियन क्रांतीचा इतिहास वाचण्यात, मनन करण्यात वेळ घालवला, पण या अगोदर त्यांनी स्वातंत्रवीर सावरकरांचे विचार पण समजवून घेत अभ्यास केला, पण म्हणून ते हिंदुत्ववादी झाले नाहीत. पण भगतसिंग यांनी लेनिन विषयी केलेल्या अभ्यासा वरून डावे इतिहासकार त्यांना सरळ साम्यवादी विचारांचे ठरवतात जे की एकदम चूक आहे.
अर्थात याचा अर्थ अजिबात नाही की भारतीयांनी साम्यवादी विचार नाकारले. भारतातील कम्युनिस्ट पक्षाची वाटचाल बघायची तर १९२० साली सोवियत रशियात कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या दुसऱ्या कॉंग्रेस नंतर देशात कम्युनिस्ट पक्ष स्थापन करायच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र पक्ष स्थापन व्हायला १९२५ साल उजडावे लागले. या काळात भारतात अनेक साम्यवादी विचारांने भारावलेल्या तरुणांनी काही छोट्या संघटना सुरू केल्या होत्या. याच काळात १९२४ मध्ये भारतातील साम्यवादी नेते पहिल्यांदा ब्रिटिश सरकारच्या निशाण्यावर आले आणि कारागृहात गेले, कारण होते "कानपुर बोल्शेविक षडयंत्र" !
तत्कालीन काळात कानपूर हे एक औद्योगिक केंद्र म्हणून समोर येत होते, त्या मुळे तेथे कामगार वस्ती पण चांगलीच फोफावत होती. या कामगारांकडे समाजवादी आणि साम्यवादी नेत्यांचे लक्ष गेले नसते नवल. याच कामगार शक्तीचा फायदा घेत क्रांती घडवून आणायचे मनसुबे साम्यवादी नेते बघत होते. त्यातून जन्मला आले "कानपुर बोल्शेविक षडयंत्र" ब्रिटिश सरकारने हे षडयंत्र कार्यान्वित व्हायच्या अगोदरच धरपकड सुरु केली आणि मानवेंद्र नाथ राय, डांगे, शौकत उस्मानी या साम्यवादी नेत्यांना अटक केली, आरोप ठेवण्यात आला ब्रिटिश सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करण्याचा. पण लक्षात घ्या या नेत्यांनी ब्रिटिश सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला हे बरोबर, पण या प्रयत्नांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी काहीही देणेघेणे नव्हते याचा संबंध होता, साम्यवादी क्रांती करत साम्यवादी सरकार स्थापन करण्याशी. म्हणजे यांनी देशासाठी नाही तर विचारधारे साठी तुरुंगवास भोगला. पुढे सरकारकडे रक्कम भरत या नेत्यानी स्वतःची सुटका करून घेतली.
शेवटी १९२५ मध्ये मानवेंद्र नाथ राय, डांगे, मोहंमद अली या साम्यवादी नेत्यांनी वर सांगितलेल्या साम्यवादी विचारांच्या या छोट्या संघटनाना पक्षात यायचे निमंत्रण दिले, जे अनेकांनी मान्य केले नाही. त्या मुळे जवळपास १९२९ पर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा राजकीय आणि संघटनात्मक दृष्ट्या कमकुवतच राहिला. मुख्य म्हणजे देशातील जनतेला पण आपले अस्तित्व हा पक्ष दाखवू शकला नाही. याचे कारणही होते या पक्षाचा कारभार भारताच्या आवश्यकते पेक्षा, विचारधारेच्या आवश्यकतेवर आणि सोवियत रशियाच्या इशाऱ्यावर सुरू होता आणि कदाचित याच मुळे साम्यवादी विचारांनी भारलेल्या पण "राष्ट्रवादा" चा पण पुरस्कार करणाऱ्या या छोट्या संघटनांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन व्हायला नकार दिला.
तेव्हा देशातील समाजवादी विचारांच्या आणि साम्यवादा कडे झुकलेल्या राष्ट्रवादी लोकांसाठी जवळचा पक्ष हा काँग्रेसचं होता. इतकेच काय तर धार्मिक उजव्या विचारांच्या हिंदू आणि मुस्लिमांसाठी हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग हे पक्ष असून सुद्धा, मध्यम मार्गी विचारांवर चालणाऱ्या या उजव्यांसाठी जवळचा पक्ष हा काँग्रेसचं होता. याच कारणाने साम्यवादी विचारांकडे झुकलेले सुभाषचन्द्र बोस हे पण काँग्रेसमध्ये होते तर, उजव्या विचारांचे लाला लाजपत राय पण कॉंग्रेस मधीलच नेते !
भारतीय कम्युनिस्ट पक्षासाठी १९२९ हे वर्ष महत्वाचे ठरले, कारण होते "मेरठ षडयंत्र" ! या वर्षी ब्रिटिश सरकारने भारतातील साम्यवादी नेत्यांना देशाच्या बाहेर काढण्यासाठी एक विधेयक पास केले. या कायद्या नुसार पुन्हा साम्यवादी नेत्यांवर कडक कारवाई करत पुनः ब्रिटिश सत्ते विरोधात क्रांती करण्याचा आरोप लावला. पुन्हा या षड्यंत्राचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी काहीही संबंध नव्हता, संबंध होता साम्यवादी विचारधारे सोबत. पण आश्चर्य कारक पणे या वेळी समाजवादी नेते, राष्ट्रवादी नेते आणि काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांच्या या कारवाई विरोधात आवाज बुलंद केला. राष्ट्रवादी विचारांच्या नेत्यांनी आणि विशेषतः काँग्रेसने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूने कौल दिल्याने, देशाच्या जनतेच्या मोठ्या संख्येला पहिल्यांदा भारतीय कम्युनिस्ट पक्ष नावाचा एक पक्ष भारतात असल्याचे कळले.
१९३३ साली या साम्यवादी नेत्याची सुटका झाली. कम्युनिस्ट पक्षाचे पुनर्गठन करण्यात आले. पण १९३४ मध्ये काँग्रेस मधील साम्यवादी विचारांच्या लोकांनी बाहेर निघत नवीन पक्ष स्थापन केला कॉंग्रेस सोशलिस्ट पक्ष नावाचा. अगोदर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे याचा विरोधच केला. पण नंतर जुळवून पण घेतले. १९३६ पासून समाजवादी आणि साम्यवादी पक्षात सहयोग वाढायला लागला. पण देशाच्या स्वतंत्रलढ्यासाठी नाही तर विचारधारेसाठी.
१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले. या युद्धाकरता ब्रिटिशांची मदत न करता, उलट सशस्त्र क्रांती करत त्याची सत्ता हटवायची आणि भारताला बोल्शेविक सत्ता आणायची असे साम्यवादी पक्षाच्या अनेक नेत्यांचे म्हणणे होते. या वरून पक्षात फूट पण पडली, काही नेत्यांना पक्षातून निलंबित पण करण्यात आले.
ब्रिटिशांना युद्धा साठी मदत करायची नाही यावर मात्र सगळ्यांचे एक मत होते. पण १९४१ मध्ये जर्मनीने सोवियत रशियावर हल्ल्या केला आणि परिस्थिती बदलली. आता या साम्यवादयांना ब्रिटिश सत्ते बद्दल प्रेम उत्पन्न झाले. या युद्धात ब्रिटिशांना सर्वोपरी साहाय्य करण्याचे पक्षाने ठरवले. याच प्रेमातून काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या "भारत छोडो" आंदोलना पासून साम्यवादी नेते दूरच राहिले, कारण त्यांची विचारधारा आता त्यांना सोवियत रशिया आणि त्यांच्या मित्रांना साथ द्यायची मागणी करत होती.
याच विचारधारेतून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचे ठरवत साम्यवादी विचारांचे राष्ट्रवादी नेते सुभाषचंद्र बोस सोवियत रशियातून रिकाम्या हाताने निघाले आणि मदतीच्या आशेने हिटलर कडे गेल्यावर साम्यवादी मुखपत्राने सुभाष बांबूच्या नावाने आपल्या मुखपत्रात निंदा करायला सुरवात केली होती.
पण ही सुरवात होती. मुळातच साम्यवादी विचारांनी भारलेले पण स्वतःला मध्यममार्गी, समाजवादी भासवणाऱ्या आणि मुख्य म्हणजे कम्युनिस्ट पक्षात नसलेल्या "ट्रोजन हॉर्स" ने स्वतंत्र भारतातील राजकारणात, समाजकारणात पण बराच उच्छाद मांडला! कारण एकदम साफ आहे, त्यांना भारताला आवश्यक काय आहे या करता साम्यवादी विचारधारेला आवश्यक काय आहे याची चिंता जास्त होती! देशाचा आवश्यकते पेक्षा सोवियत रशियाची आवश्यकता मोठी होती!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा