"आत्मनिर्भर भारत" चा खरा अर्थ


आज चीन आणि भारतामध्ये सीमा प्रश्ना वरून तणाव निर्माण झाल्या नंतर अनेकांना चिनी वस्तूंवर आपण अवलंबून असण्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. पण, भारताला मोठ्या प्रमाणावर चिनी वस्तूंची गरज आहे हे ठरवणारे नक्की कोण आहे? तुम्ही आणि आम्हीच ना ? मग चिनी वस्तूंबाबत आपल्या गरजा कोण कमी करणार आपणच ना? 

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "आत्मनिर्भर भारत" आणि "व्होकल फॉर लोकल" चे आवाहन केले तेव्हा पंतप्रधानांच्या आवाहनातील संदेश लक्षात न घेता त्या आवाहनाला हसण्यावारी नेणारे आपणच आहोत हे विसरून चालणार नाही. पण पंतप्रधानांच्या आवाहनांचे गांभीर्य आपण ओळखू शकलो नाही. आत त्या आवाहनाचा अर्थ आपण समजून घेऊ.

मित्रांनो, भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "चिनी कोरोना विषाणूच्या" विरोधात देशाच्या लढाईला चालना देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली, तेव्हा पंतप्रधानांनी देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी नवीन मंत्र दिला "आत्मनिर्भर भारत" आणि "व्होकल फॉर लोकल" चा ! आता "आत्मनिर्भर भारत" म्हणजे नक्की काय ? "व्होकल फॉर लोकल" म्हणजे नक्की काय ? हा पुन्हा एकप्रकारे जुना "स्वदेशी" चा नारा आहे का ? उत्तर आहे नाही ! "आत्मनिर्भर भारत" आणि "व्होकल फॉर लोकल" हा जुन्या "स्वदेशीच्या" नाऱ्या पेक्षा अधिक व्यापक आहे.

आजच्या जागतिकरणाच्या युगात आणि आपण त्या युगाचा भाग असल्यामुळे देशाच्या बाहेरील उत्पादनाला थांबवू शकत नाही. पण त्या उत्पादनात आपले योगदान नक्कीच वाढवू शकतो. उदाहरणार्थ आपण मोबाईल फोनचे सुटे भाग आपल्या कडे कच्चा माल उपलब्ध नसल्यामुळे स्वस्तात बनवू शकत नाही, मात्र आपण त्या मोबाईल फोनचे डिजाईन आणि असेंब्लिंग देशात करून त्या मोबाईल मधील भारताचे योगदान नक्कीच वाढवू शकतो. सोबतच त्याची क्वॅलेटी कंट्रोल करत कामाचा दर्जा उंचावत त्या उत्पादनाला जागतिक दर्जाचे उत्पादन म्हणून मान्यता पण प्राप्त करू शकतो. सोबतच जो कच्चा माल भारतात मिळत नाही त्या ऐवजी सबटीट्यूट काही वापरता येते का याचे पण संशोधन करत आपण आपल्या उत्पादना मध्ये बदल घडवून आणू शकतो. यालाच आपण म्हणू "आत्मनिर्भर भारत"

चीन आज स्वतःची "आर्थिक महासत्ता" म्हणून ओळख प्रस्थापित करत आहे, चीन असे का करू शकला ? आज चीन जगाचे मॅनिफॅक्चरिंग हब आहे म्हणून तो आर्थिक शक्ती झाला नाही, तर त्याने स्वतःच्या देशात अस्तित्वात असलेल्या मोठ्या अंतर्गत बाजारपेठेचा योग्य उपयोग करून घेतला त्या मुळे तो आर्थिक शक्ती म्हणून जगा समोर आला. उदाहरणच घ्यायचे म्हंटले तर १९९४ साली सुरु झालेली अमेरिकन अमेझॉन आणि १९९९ ला सुरु झालेली चिनी अलीबाबा या दोन्ही एकाच प्रकारच्या व्यापारामध्ये असलेल्या कंपन्या ! मात्र आज अलीबाबाने फक्त देशाअंतर्गत बाजाराचा योग्य वापर करत जागतिक स्तरावर आपले आस्तित्व दाखवून दिले आहे. म्हणजेच देशाअंतर्गत तयार झालेली उत्पादने अगोदर देशात विकत हळू हळू जागतिक स्तरावर आपले साम्राज्य नेले. हेच नेमके पंतप्रधांना त्यांच्या "व्होकल फॉर लोकल" मधून अभिप्रेत आहे.

अर्थात या सगळ्याला आपला देश तयार आहे का ? तर नक्कीच आहे. आजही भारतात अनेक जागतिक स्तरावर अतिउत्तम उत्पादनाचे डिजाईन, असेंब्लिंग आणि क्वॅलेटी कंट्रोल होत आहे. भारतातील उपलब्ध प्रशिक्षित कुशल कामगारांच्या बळावर भारत पण जागतिक मॅनिफॅक्चरिंग हब म्हणून समोर येऊ शकतो. तुम्हाला माहीतच असेल कि "चिनी कोरोना विषाणू" च्या प्रादुर्भावापूर्वी भारतात या विषाणू विरोधात लढण्यासाठी आवश्यक PPE किट चे उत्पादनच होत नव्हते, या किट साठी आपण पूर्णपणे जागतिक बाजारावर निर्भर होतो. पण कोरोना काळात जागतिक स्तरावर निर्माण झालेला तुटवडा आणि वाढलेल्या किमती लक्षात घेता पंतप्रधाननांनी भारतातच या किटची निर्मिती करायचे आवाहन दिले आणि भारतीय मॅनिफॅक्चरिंग इंडस्ट्रीने भारताला या बाबतीत स्वयंपुर्ण बनवलेच, सोबतच जागतिक स्तरावर पण आपण एक मोठे पुरवठादार ठरू इतके उत्पादन फक्त दोन महिन्यात करत हे आव्हान यशस्वी पणे पेलले.

एक लक्षात घ्या, चीनने याच सगळ्या मार्गावरून जात स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणून समोर आणले, आता भारता सकट दक्षिण आशियातील देशावर दादागिरी करत लष्करी महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा बाळगत आहे. या मागे चीनच्या अंतर्गत बाजारपेठेची आर्थिक ताकद चीनच्या मागे आहे. उद्या जगाने जरी चिनी उत्पादने घेण्यात हात आखडता घेतला तर त्याला पडणारा आर्थिक फटका कमी असेल कारण त्याची देशांतर्गत बाजारपेठ खूप मोठी आहे. चीन नंतर सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाची बाजारपेठ पण त्याच तोडीची आहे. देशांतर्गत उत्पादन वाढले तर रोजगार वाढतील आणि बाजारपेठेची आर्थिक ताकद पण! तेव्हा पंतप्रधानांच्या "आत्मनिर्भर भारत" आणि "व्होकल फॉर लोकल" च्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या आणि देशाला आर्थिक महासत्ता करण्याच्या स्वप्नाला सत्यतेत उतरवा.

माझ्या मते तरी आपल्या पंतप्रधानांनी "आत्मनिर्भर भारत" आणि "व्होकल फॉर लोकल" चे आवाहन करत आपल्या करता एका नवीन भारताचे स्वप्न आणि नवीन मार्गाची दृष्टी दिली आहे. या मार्गाने आपण आपले चिनी वस्तूंवरील अवलंबित्व नक्कीच कमी करू शकतो.

टिप्पण्या