जनता त्रस्त, सरकार मस्त

महाराष्ट्र सरकार मध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही असे म्हंटले की म्हाआघाडी सरकारच्या समर्थकांना मिरच्या लागतात. मात्र आता पतांजलीच्या कोरोना वरील औषधांवर बंदीचे बघा, ही बंदी घालणे महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे काम आहे, म्हणजे ही बंदी घोषित करायला हवी होती आरोग्य मंत्र्यांनी, पण घोषित केली गृहमंत्र्यांनी. 
आता राज्यात टाळेबंदी लागू करायची जी काही सर्कस केल्या गेली ती गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणारी होती. त्या मुळे आता टाळेबंदी शिथिलता करतांना पण त्याची घोषणा ही गृहमंत्रालया कडून यायला हवी होती. पण कदाचित गृहमंत्री पतंजली विरोधातील कारवाईत अडकून बसल्या मुळे असेल, पण राज्यात केशकर्तनालय सुरू करणार असल्याची आणि त्याचे नियमांची घोषणा राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी केली. 

अर्थात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्य सरकारला केलेल्या आर्थिक मदतीचे जे काही दावे केले होते ते खोडायला पण राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांऐवजी याच परिवहन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. आता फक्त राज्याच्या परिस्थितीत डबघाईस आलेल्या राज्य परिवहन मंडळाला वाचवण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार हे सांगायला कोणते मंत्री समोर येतात हे बघायला हवे!
असो मात्र गृहमंत्री इकडे इतकी काम करत असतांना आता त्यांच्या वरील कामाचा बोजा वाढला आहे, त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या अपराधांच्या वाढत्या मनोबळात दिसत आहे. या अगोदर पण नागपूरच्या गुन्हेगारीचा वाढता ग्राफ आणि गुन्हेगारी रोखण्यात शहर पोलिसांना येणारे अपयशावर लिहले होते. 

मात्र आता तर नागपूरमधील गुन्हेगार समाज माध्यमांवरून पोलीस आणि सामान्य नागरिकांना धमक्या द्यायला लागले आहेत इतकी त्याची हिम्मत वाढली आहे. नागपुरात गुन्हेगारांकडून पोलिसांची खिल्ली उडवणारे, आपली शस्त्र दाखवत स्वतःची लाल करून घेणारे आणि नागरिकांन मध्ये दहशत निर्माण करणारे व्हिडीओ टिकटॉक सारख्या समाज माध्यमातून बनवून त्याला पसरवण्याचे काम या शहरात सुरू आहे. 
शहरातील खुनाचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीये. शहरातच मार्च महिन्यात ५ खून,  एप्रिल महिन्यात ४ खून, मे महिन्यात ७ खून नोंदल्या गेले होते. जून महिन्यात तर तब्बल १४ खून नोंदल्या गेले. भरवस्तीत सगळ्यांसमोर खून होणे ही आता नित्याची बाब होणार का? अशी भीती वाटायला लागली आहे. याच महिन्यात असे अगोदर दोन खून झाले होते. मात्र काल पोलीसांच्या म्हणण्यानुसार क्षुल्लक भांडणातून एका ३४ वर्षीय महिलेला तिच्या ७ वर्षाच्या मुला समोर, पाठलाग करत फिल्मी स्टाईलने भररस्त्यात मारल्या गेले. 
इकडे गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ होत असतांना प्रशासकीय पातळीवर असेच पायपोस नसल्याची लक्षणे दिसत आहे. सरकारचा वचक तर प्रशासकीय पातळीवर दिसत नाही. याचाच परिणाम म्हणून की काय, मुख्य सचिव संजय कुमार यांच्या नियुक्तीचा आदेश उप सचिवांच्या सहीने निघतात आणि हे सगळे होत असतांना मुख्यमंत्री बाहेर निघत नाहीये. 

पण इतके सगळे होत असतांना आपण मात्र काही बोलायचे नाही. कोमट पाणी प्यायचे आणि घरी बसायचे.

टिप्पण्या