अभिनेता अभिनयच करणार




शेवटी काय ? तर, अभिनेत्याने चित्रपटात कितीही कणखर भूमिका केली, कितीही ज्ञान दिले तरी खऱ्या जीवनात अभिनेते तसेच असतील असे नाही. 

२०१७ साली संजय लीला भन्साळी यांनी राजपूत राणी पद्मावतीच्या जीवनावर आधारीत एक चित्रपट बनवायला घेतला "पद्मावत". या ऐतिहासिक चित्रपटात संजय लीला भन्साळीने "सिनेमॅटिक लिबर्टी" घेत ऐतिहासिक तथ्यांसोबत तोडमरोड केल्याची शंका राजस्थान मधील राजपूत लोकांना झाली, अर्थात या मागे संजय लीला भन्साळी यांचे पूर्व कर्तृत्व होतेच. अगदी भन्साळीने बनवलेल्या शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या "देवदास" कादंबरी वर चित्रपट बनवतांना पण त्याने त्या कथे मध्ये याच "सिनेमॅटिक लिबर्टी" च्या नावाने बरीच लुडबुड केली होती, पण हा चित्रपट काल्पनिक कथेवर असल्याने टीका झाली असली तरी विरोध वगैरे झाला नाही. त्या नंतर या "पद्मावत" चित्रपटावर अगोदर मराठा साम्राज्याचे पेशवे पहिले बाजीराव पेशवे आणि त्यांची प्रेयसी मस्तानी या कथेवर पण "बाजीराव-मस्तानी" नावाचा चित्रपट बनविला या चित्रपटात पण संजयने पुन्हा हीच "सिनेमॅटिक लिबर्टी" घेत काही ऐतिहासिक आणि तत्कालीन सांस्कृतिक तथ्यांशी बरीच छेडछाड केली. पण महाराष्ट्रात त्या वर जोरदार टीका जरी झाली असली तरी, हिंसक आंदोलन वगैरे झाले नव्हते. अर्थात याचे कारण महाराष्ट्रातील सामाजिक राजकारणात होते. 

पण राणी पद्मावतीला राजपुतण्यात देवीचा दर्जा ! तिने केलेला "जोहार" हा पूज्य विषय! राणी पद्मवतीच्या या बलीदानावर आधारित ऐतिहासिक कथा, कविता, पोवाडे या वरच हा राजपुती पिंड पोसल्या गेलेला. त्यातही राजपूत अजूनही राजस्थान मध्ये आपले सामाजिक आणि  राजकीय पकड मजबूत असलेली जमात. आता या राणीवर चित्रपट काढायचा तर अगदी कथे पासून कपड्यांपर्यंत डोळ्यात तेल घालून जागृत राहायला हवे होते. पण संजयने त्यातही "सिनेमॅटिक लिबर्टी" घेतल्याचे लक्षात आल्यावर महाराष्ट्रात उमटली नाही, ती हिंसक प्रतिक्रिया या राजस्थानी राजपुतांकडून उमटली. या प्रकरणात आगीत तेल ओतण्याचा प्रकार भारतातील तथाकथित लिंब्रांडुंनी केले, त्यांनी या करता राणी पद्मवतीच्या "जोहार" वरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संजय लीला भन्साळीच्या तथाकथित "सिनेमॅटिक लिबर्टी"  ला पाठींबा दिलाच आणि हे करणे आमचा संवैधानिक अधिकार असल्याचा गमजा पण केला. या प्रकाराने राजपूत अधिक बिथरले, हिंसक झाले आणि या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणीच तोडफोड केली. मग भारतातील तमाम लिंब्रांडु अभिनेत्यांनी मग या राजपुतांचा विरोध करायला सुरुवात केली. 

या राजपूत विरोधात त्या वेळेस समोर आला होता हाच "सुशांतसिंग राजपूत" या हल्ल्याच्या निषेध करतांनाच त्याने आज पासून मी माझ्या नावाच्या मागे असलेले "राजपूत" हे उपनाव लावणार नाही असे घोषित केले. एका झटक्यात सुशांतसिंग भारतीय लिंब्रांडुंच्या गळ्यातील ताईत झाला होता. सुशांतसिंग याने घेतलेल्या कणखर भूमिकेचे कौतुक केल्या गेले होते. त्याच्या या निर्णयाने त्याच्यावर किती मानसिक दबाव होता आणि त्याने तो मानसिक दबाव किती हिमतीने परतवून लावला, या करता समाजातील तथाकथित स्वतंत्रमत वल्यानी कशी मदत केली याच्या सुरस कथा तेव्हा समाज माध्यमांवर, वृत्तपत्रात प्रसारित झाल्या होत्या. 

पण शेवटी सुशांतसिंग एक अभिनेताच निघाला, त्या काळात त्याच्या लेखकाने दिलेले संवाद आणि दिगदर्शकाला अपेक्षित अभिनय त्याने व्यवस्थित निभावले हेच म्हणावे लागेल. कारण खरेच त्याने तेव्हा मानसिक दबाव झुगारला असता, त्याला त्यावेळी खरेच मानसिक आधार देणारे आजही सोबत असते तर आज त्याला आत्महत्या करायची वेळ नक्कीच आली नसती. कणखर पणा हा खोट्याला खरे सिद्ध करण्यात नसून खऱ्याला खरे म्हणण्यात आहे हे सुशांतसिंग याने लक्षात घेतले नाही हीच खरी त्याची शोकांतिका! एकदा ही गोष्ट लक्षात घेतली असती तर वयक्तिक आयुष्यात आलेल्या प्रत्येक वादळातुन हा नक्कीच तरला असता. 

तरी या तरुण उमद्या हाडाच्या अभिनेत्याला विनम्र श्रद्धांजली! ओम शांती !

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा