२२ तारखेच्या "जनता कर्फ्यु" नंतर भारतातील लोकांनी राज्यात घोषित "लॉक डाऊन - संचारबंदी" ला हरताळ फासले, या मुळे "चायनीज कोरोना व्हायरस" विरोधातील युद्धात आपल्याला मात मिळू शकते आणि त्याची शारीरिक आणि आर्थिक हानी जबरदस्त राहील याची जाणीव ठेवताच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे "लॉक डाऊन" आणि "जनता कर्फ्यु" पेक्षा कडक संचारबंदीची घोषणा केली.
खरे तर जगातील सगळ्यात मोठी दळणवळण संस्था असलेली भारतीय रेल्वे जी देशावर आलेल्या कोणत्याही संकटात कधीही बंद पडली नव्हती, देशाची फाळणी झाली तेव्हा पण भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी फाळणी झालेल्या भागात दंगली मध्ये आपली प्राणाची बाजी लावत रेल्वे चालवली होती, १९४७, १९६२, १९६५, १९७१ च्या युद्धात पण रेल्वे कधीच बंद केल्या गेली नव्हती. पण हे "चायनीज कोरोना व्हायरस" विरोधातील युद्ध वेगळे आहे आणि ते तितक्याच गंभीरतेने घेण्यासाठी संपूर्ण देशात "भारतीय रेल्वे" पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, या वरून तरी या "लॉक डाऊन - संचारबंदीचे" महत्व आणि गरज लक्षात घ्यावी.
केंद्रीय सरकारने किंवा राज्य सरकारने "चायनीज कोरोना व्हायरस" च्या विरोधातील उपाय योजनेत उशीर केला असे वाटत असले तरी तसे नाहीये, विशेषतः भारत सरकारने "व्हायरस इफेक्टेड" देशातून आपले नागरिक सोडवून आणण्यापासून त्यांना वेगळे ठेवण्यापर्यंत अनेक उपाय योजना खूप पहिलेच सुरू केल्या होत्या. अगदी बिहारच्या मधुबानी या भारत-नेपाळ सीमे वरील जिल्हा अधिकाऱ्यांसोबत या करता काय काय करायचे याचे निर्देश आणि बैठकी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात झाल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेने पण भारताची या बाबत स्तुतीच केली आहे. आपण इतर देशांना या आरोग्य विषयक मदत देऊ करत या क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण असल्याची ग्वाही पण दिली आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर राज्य सरकारने पण अत्यंत जलद पावले उचलली यात काही शंका नाही. यात केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही व्यवस्थित एकमेकांसोबत काम करत आहे. पहिल्यांदा जरी तपासणीची संख्या कमी आहे असे वाटत असले तरी आज ती संख्या वाढली आहेच, पण ती विकसित देशांपेक्षा जास्त आहे आणि त्यात आता या तपासणी किट पण भारतातच तयार होणार असल्याची बातमी अधिक दिलासादायक आहे. त्या मुळे हा २१ दिवसांचा "लॉक डाऊन - संचारबंदी" ने आपण आरोग्य विषयक लढाई नक्कीच जिंकू!
पण या सोबत आता आणि लढाई झाल्या नंतर मोठी लढाई राहील ती आर्थिकतेची! २१ दिवस देश पूर्णपणे बंद राहिल्यामुळे सगळी कामे अडतील, देशातील उत्पादन पूर्ण ठप्प झाले राहील. अनेकांचे रोजगार जरी बुडाले नसले तरी मिळकत कमी झालेली राहील. हातावर पोट असणाऱ्यांचे जे असंघटित कामगार आहेत त्याचे प्रश्न आधीक जटिल असतील. सध्या तरी मजुरांच्या मिळकतीच्या प्रश्नावर देशात फक्त तीनच राज्यांनी योजना जाहीर केली आहे, उत्तर प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू यांनी. पण लवकरच इतरही राज्ये या करता योजना समोर आणतील अशी आशा! कदाचित केंद्र सरकार राज्या करता आर्थिक योजना जाहीर करेल, आज या बाबतीत घोषणा होईल असे वाटत होते, मात्र योजना बनवण्याचे काम सुरू आहे असे सांगण्यात आले आहे. मुख्यतः केंद्रीय योजना आणि त्याचे संचालन राज्य सरकार करेल या पद्धतीने ही असंघटित मजुरांकरता योजना असेल, म्हणून मुख्य योजना राज्य सरकारचीच असेल आणि ते योग्यही राहील.
आधीच मंदीत असलेली वैश्विक अर्थव्यवस्था अजून या "चायनीज कोरोना व्हायरस" मुळे मंदीत जाणार हे नक्की, आणि त्याचा आपल्याला जबर फटका बसणार हे पण नक्की त्या मुळे आता पासूनच पुन्हा आपले आई वडील करायचे तशी काटकसर करायला सुरुवात करा. पण या संकटाचा भविष्यात फायदा पण होऊ शकेल, कदाचित चीनच्या या विषयातील व्यवहार बघता, जगातील लोक त्याच्या पासून दूर राहतील, तसेच भारतातील "उत्पादन उद्योगात" कच्चा माल हा मुख्यत्वे चीन मधून येत होता, आता एक तर त्या करता दुसरा मार्ग शोधल्या जाईल किंवा देशांतर्गत दुसरी व्यवस्था उभी करण्यात येईल, या मुळे "मेक इन इंडिया" ला पण नव्याने चालना मिळू शकते. त्या मुळे ही आपत्ती आपल्या करता इष्टापत्ती पण ठरू शकेल. भारतीय अर्थव्यवस्था लवकर उभारी घेईल कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा हा "सेवा उद्योग" मधून येतो, मात्र यातील काही भागाला मोठा फटका बसणार आहे, महत्वाचा उद्योग म्हणजे "पर्यटन". विदेशी पर्यटक आणि देशांतर्गत पर्यटन काही महिने या संकटानंतर प्रभावित राहील.
भारतातील प्रत्येक जण या "चायनीज कोरोना व्हायरस" विरोधात आपापल्या परीने, पध्द्तीने लढत आहे, अंबानीने आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून काम सुरू केले आहे, महिद्राचे आनंद महिंद्र यांनी आपल्या कारखान्यात व्हेंटिलेटर्स बनवण्याचे संकेत दिले आहे. इतर अनेक उद्योजक या युद्धात पुढाकार घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एक परिस्थिती मात्र एकदम खरी कोणताही आडपडदा न ठेवता मान्य केली आणि सांगितली, की या आपत्ती सारखी परिस्थिती संपूर्ण जगाला नवीन आणि अप्रत्यशीत अशी आहे. त्या मुळे या युद्धात काही देशांनी केलेल्या आणि सफल झालेल्या योग्य उपायांचा अंगीकार करतांनाच, जे देशांनी केलेल्या चुकांवरून शिकत त्या आपण टाळायला हव्या आणि म्हणूनच आताच्या परिस्थितीत सध्या उचललेले पाउल एकदम योग्य आहे. त्या मुळे राज्यात किंवा देशात कोणत्या पक्षाचे सरकार आहे त्या पेक्षा ते आपल्या देशाचे सरकार आहे आणि त्या सरकारने घालून दिलेले नियम आपल्याला पाळायचे आहे हे आत्ताच आपल्या डोक्यात पक्के करून घेऊ.
तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धात करायचा "जयघोष" म्हणत या युद्धात सहभागी होऊ आणि व्हायर्सरूपी गमिन"चायनीज कोरोना" ला हरवू.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा