२६ डिसेंबर १९२५ मध्ये कानपुर येथे
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या
नेतृत्वाखाली झाली. १९१७ साली रशियात लेनिनच्या नेतृत्वात झालेल्या यशस्वी
बोल्शेविक क्रांतीची प्रेरणा आणि कार्ल मार्क्स यांच्या तत्वज्ञानाचे आकर्षण या
पक्षाच्या स्थापने मागे होते. म्हणजे डाव्यांचा भारतातील इतिहास जरी १९२५ पासून
सुरू होत असला तरी, यांचा
जागतिक दखलपात्र इतिहास पण फक्त भारतीय डाव्यांच्या फक्त ८ वर्षे जुना आहे. मात्र
यांच्या देशातील आणि जागतिक राजकारणातील षडयंत्र मात्र यांच्या इतिहासाच्या
पानांपेक्षा कितीतरी जास्त भरतील.
याच १९२५ साली भारतात नागपुरात एका
सांस्कृतिक आणि राजकीय संघटनेची स्थापना झाली. २७ सप्टेंबर १९२५ साली नागपूर येथे
केशव बळीरामपंत हेडगेवार या अत्यंत सामान्य दिसणाऱ्या असामान्य माणसाने केली.
पूर्णतः राष्ट्रवादी हिंदू विचारधारा या संस्थेच्या स्थापनेमागे होती. हिंदू संघटन
करून, हिंदू हित साधने हा
या संघटनेचा मूळ हेतू. ही संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ!
पण राष्ट्रवाद आणि साम्यवाद यांचा
भारतात तरी छत्तीसचा आकडा आहे. खरे तर बोल्शेविक क्रांती नंतर किंवा चीन मध्ये
माओच्या लाल क्रांती नंतर तिथे जे काही चांगले वाईट या डाव्यांनी केले त्याला
"राष्ट्रवादाची"
जबरदस्त जोड देतच आपले कार्य सिद्धीस
नेले होते आणि आहे. माओने तर चिनी राष्ट्रवाद सोबत चिनी संस्कृतीवादाची पण जबरदस्त
फोडणी दिली आहे. त्याच्या क्रांतीला सांस्कृतिक क्रांतीचे नाव दिल्या गेले. मात्र
भारतातील डावे जे १९६४ पर्यंत डाव्यांच्या गोठ्यात एकाच सोवियतांच्या दावणीला
बांधल्या गेले होते, ते
नंतर चिनी माओच्या दावणीला बांधल्या गेले असल्यामुळे भारतीय डाव्यांना भारतीय
राष्ट्रवाद मात्र विषारी वाटतो.
आज ९४ वर्षा नंतर जागतिक आणि भारतात
सुद्धा डाव्यांचे अस्तित्व पुसल्या जात असतांनापण आपली रेष न वाढवता दुसऱ्याची रेष
खोडायचे काम मात्र हे डावे इमाने इतबारे करत आहे.
हे सांगायचे निमित्त म्हणजे सध्या
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथे B.A. च्या चौथ्या सत्रातील इतिहासाच्या अभ्यासक्रमात "राष्ट्र निर्मितीमधील राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे भूमिका" असा
विषय अंतर्भूत केला आहे. मात्र या विरोधात नागपूर आणि राज्यात कारण नसतांना राळ
उठवण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी
आणि डाव्या वळवळी या विरोधात आवाज उठवत आहे. यांच्या नुसार हे शिक्षणाचे भगवेकरण
आहे. पण असे असेल तर भारतीय विद्यापीठात आज पर्यंत जो साम्यवादी इतिहास शिकवला
गेला ते शिक्षणाचे डावेकरण किंवा लालेकरण नव्हते का? याचे उत्तर मात्र हे देणार नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
सांस्कृतिक एकीकरणातून जागृत झालेल्या हिंदूंचे विशाल स्वरूप आज आपल्याला
भारताच्या राजकीय पटलावर दिसत आहे. आपल्या स्थापणेपासून आज पर्यंत अनेक चुकीचे
तथ्यहीन आरोप, कायदेशीर
कारवाया, हिंसक हल्ले पचवत
रा.स्व.सं. आपले राष्ट्राप्रति, समाजाप्रती
असलेले कर्तव्य निष्ठेने करत आला. संघ कसा वाढला आणि वाढत आहे हा नक्कीच अभ्यासाचा
विषय होऊ शकतो. संघाच्या उद्दिष्ट्या बाबत मतमतांतरे नक्कीच असू शकतात, पण म्हणून तो अभ्यासाचाच नाही किंवा
अभ्यासक्रमात घ्यायचाच नाही हे मात्र बरोबर नक्कीच नाही!
कोणतीही राजकीय व्यवस्था, समाज व्यवस्था, वैचारिक आंदोलने १००% बरोबर कधीच नसतात,
तशीच भारतात काँग्रेस स्वतःला समजत
असलेली मध्यममार्गी, साम्यवादी
डावीकडे झुकलेली आणि संघाची उजवीकडे झुकलेली वैचारिकता १००% बरोबर आहे असे कुणाचे
म्हणणे नाही. पण या सगळ्या विचारधारेचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येणे हा प्रत्येक
विद्यार्थ्यांचा हक्क आहे आणि नेमका हाच हक्क संघाचा अभ्यासक्रमात केलेल्या
समावेशाचा विरोध करत डावे आणि काँग्रेसी डावलत आहे.
बरे यातही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
विद्यापीठ, नागपूर हे काही असा
संघवरील अभ्यासक्रम सुरू करणारे पहिले विद्यापीठ नाही. या अगोदर डॉ. बाबासाहेब
आंबेडकर औरंगाबाद विद्यापीठ, गोंडवाना
विद्यापीठ, पश्चिम बंगाल मधील
वर्धमान विद्यापीठ, बनारस
हिंदू विश्ववविद्यालय, दिल्ली
विद्यापीठ अगदी डाव्यांच्या आवडत्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पण राष्ट्रीय
स्वयंसेवक संघावर आधारित अभ्यासक्रम सुरू आहेत.
मग नागपूर विद्यापीठातील संघाच्या
अभ्यासक्रमाचा निषेध का? याचे
कारण म्हणजे या सगळ्या विद्यापीठात संघाबद्दल नकारात्मक आणि डाव्या विचारांच्या
चष्म्यातून शिकवले जात होते, अगदी
नागपूर विद्यापीठात पण "भारतातील
जातीयवादी शक्तींचा उदय" वगैरे
तद्दन नकारात्मक पद्धतीने शिकवल्या जात होता. शिक्षण क्षेत्रात असलेला डाव्यांचा
वरचष्मा या करता उपयोगी पडत होता. पण आता संघाचा इतिहास वस्तुनिष्ठ पद्धतीने
शिकवल्या गेल्यास आज पर्यंत आपण चुकीचा इतिहास शिकवत होतो हे बाहेर येईल याच
भीतीने डावे आणि यांच्या मागे लपून आपले राजकीय इप्सिप्त पूर्ण करणारे काँग्रेसी
हादरलेले आहेत. या मुळे त्याचे आधीच आक्रसत असलेले राजकीय क्षितिज अजून आक्रसेल
आणि त्या योगे सत्ता सुंदरी त्यांच्या पासून अजून दूर जाईल ही या मागची खरी भीती
आहे. पण हा विरोध करत असतांना विरोधक ही गोष्ट मात्र नक्कीच विसरतात की, भारतात जितके तरुण विद्यापीठात संघाच्या इतिहासाचा अभ्यास करत असतील त्या पेक्षा कितीतरी जास्त तरुण रोजच्या संघ शाखेत हजेरी लावत असतातच, पण संघाच्या अभ्यासवर्गात स्वतःहून भाग घेत असतात.
भारतात वेगवेगळ्या विद्यापीठात खरे तर
सामंतवाद, वसाहतवाद, नववसाहतवाद, समाजवाद, साम्यवाद, नक्षलवाद, आंबेडकरवाद या सगळ्या वादा वरील
अभ्यासक्रम सुरू आहेत. इतकेच नाही तर भारताच्या फळणीस जवाबदार असलेल्या भारतीय
मुस्लिम लीग या पक्षाचा पण इतिहास भारतातील विद्यापीठात आनंदाने शिकवल्या
जातो. मात्र भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचा वाटा उचलणाऱ्या,
आपल्या सेवा कार्याने समाजाच्या
प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवणाऱ्या, भारताबरोबरच जगात जिथे जिथे हिंदू आहेत
तिथे तिथे आपले अस्तित्व तयार करणाऱ्या, व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण सारख्या अनोख्या संकल्पना
मांडणाऱ्या आणि त्याला सिद्ध करून दाखवणाऱ्या, समाजातील शेवटच्या रांगेत असलेल्या
व्यक्तीच्या उन्नतीसाठी अंतोदय सारखी संकल्पना मांडत त्याला पूर्णत्वाकडे नेण्याचा
सकारात्मक बदल करणाऱ्या, राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचा अभ्यासक्रमात केलेला समावेश मात्र चालत नाही, हा संघाबद्दलचा द्वेष नाही तर दुसरे काय?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा