"राष्ट्रवाद" - एक वैचारिक लढाई


२०१९ ची लोकसभा निवडणूक हि एक “वैचारिक निवडणूक” होती. हा विजय फक्त नरेंद्र मोदी – अमित शहा यांचा नाही, हा विजय फक्त भाजपचा किंवा त्याच्या विकासाच्या राजकारणाचा नाही, हा विजय फक्त “हिंदुत्वाचा” नाही, तर हा विजय आहे “राष्ट्रवादाचा”, हा विजय आहे अनादी काळा पासून जी “राष्ट्रवादाची” व्याख्या जनतेच्या मनात आहे त्याचा! हा पराजय आहे त्या “राष्ट्रवादाच्या व्याख्येचा” ज्याला डावे विचारवंत जनतेवर लादायचा प्रयत्न करत होते ज्यात “राष्ट्रवाद” कुठेच नव्हता.

ज्या प्रमाणे भारतातील तथाकथित डाव्या पुरोगाम्यांना या निवणुकीत असलेली अंतर्गत “मोदी लाट” ओळखता आली नाही, त्याच पद्धतीने गेले काही वर्षात देशातील जनतेची होणारी वैचारिक घुसळण पण त्यांना ओळखता आली नाही.

काही महिन्यांपूर्वी भारताने उरी हल्ल्य नंतर पाकव्याप्त काश्मीर मध्ये केलेल्या “सर्जिकल स्ट्राईक” वर आधारित “उरी” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. “द वायर” नावाच्या डाव्या विचारांच्या वेब पोर्टलने या चित्रपटाविषयी लिहतांना त्याला “विषारी राष्ट्रवादाची” अभिव्यक्ती असे लिहले होते, या वर अनेक राष्ट्रप्रेमी किंवा राष्ट्रवादी लोकांनी आपला रोष पण व्यक्त केला होता. तसेही भारतातील डावे विचारवंत वैचारिक दृष्ट्या राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रवाद हा वेगवेगळा मानतात, आणि त्यात “राष्ट्रवाद” हा राष्ट्रा करता आणि नागरीकांकरता घातक मानतात. हा त्याच्या वैचारिक खेळ आहे. संघ आणि भाजपच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना ते “फासिस्ट राष्ट्रवादी” म्हणतात, आणि राष्ट्रवादाच्या विरोधात उभे राहतात आणि राष्ट्रवादावर आरोप पण करतात, आपण त्याचा परमर्श घेऊ.
 
पण “राष्ट्रवाद” म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर राष्ट्रप्रेम म्हणजेच “राष्ट्रवाद”! मग राष्ट्रवादाला डावे “विषारी” का म्हणतात? तर हि निव्वळ धूळफेक आहे हे लक्षात घ्या, भारतातील डावे हे पहिले सोवियत रशियाच्या चमच्याने वैचारिक दुध पिणारे, त्यांनी जे वैचारिक दुध पाजले त्याच्याच वांत्या हे डावे इथे करत आपला “बुद्धीभेद” करायचा प्रयत्न करतात.


“राष्ट्रप्रेम” आणि “राष्ट्रनिष्ठा” हा राष्ट्रवादाचा पाया आहे, राष्ट्रा विषयी तेथील माणसा विषयी प्रेम नसेल तर “राष्ट्रवादी” विचार मनात येतच नाही. राष्ट्रप्रेम मनात असलला जो पण विचार करतो त्यात राष्ट्राच्या फायद्याचा विचार पहिले येतो, मग तो लष्करी, आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक विचार असो! राष्ट्र आणि राष्ट्रातील समाज सर्व दृष्ट्या उन्नत, संपन्न आणि स्वावलंबी व्हावा असा विचार जो करतो तो “राष्ट्रवादी”! अर्थात आपल्या देशात करोडोंचे घोटाळे करून गब्बर होणारे आणि सामाजिक अस्वस्थतेचा फायदा घेत सत्तेचा मलिदा खाणारा पक्ष पण आपल्या नावात “राष्ट्रवादी” हा शब्द लावतो हि गोष्ट वेगळी!

भारतीय राष्ट्रवादाचा “उदय”! असे आपल्या कानावर पडत असते, याचे कारण हे लोक भारताला एक राष्ट्र मानत नाही, यांच्या दृष्टीने भारत हा वेगवेगळ्या भाषा, वंश, आणि अस्मितांचा मिलाप आहे. ईग्रज आल्यावर भारत देश जन्माला आला. पण हे जगातील सगळ्याच बलाढ्य राष्ट्रांमध्ये घडले आहे. इग्लंड, फ्रांस, जर्मन, इटली, स्पेन इतकेच काय तर रशियाचा इतिहास पण असाच आहे. हि सगळी राष्ट्र वेगवेगळ्या देशांचे समूह कधी भाषिक, कधी भौगोलिक, कधी वांशिक, तर कधी ध्येयिक कारणाने एकत्र येत एक राष्ट्र बनले आहे. तसाच विविधतेने भरलेला भारत एका भौगोलिक, धार्मिक आणि सांस्कृतिक सूत्रात बांधलेला असल्यामुळे मानिसिक रित्या नैसर्गिकपणे एक “राष्ट्र” म्हणून समोर आला.

भारतातील राष्ट्रवाद हा पश्चिमी विचारांचा आयातीत राष्ट्रवाद आहे, असाही आरोप केल्या जातो. मुख्यत: हा आरोप अत्यंत तथ्यहीन तर आहेच आणि हा आरोप करणाऱ्या बुधीवाद्यांची उपनिवेशिक बौद्धिक शरणागतता दाखवणारी आहे. “राष्ट्रवादावर” हा कोणत्याही देशाचा, विभागाचा आणि विचारांचा मक्ता नाही, त्या मुळे “राष्ट्रवाद” फक्त पश्चीमेतून आला हे म्हणणे देखील वेडेपणाचे आहे. “राष्ट्र” जन्मते तेव्हा “राष्ट्रवाद” पण तेथे वास करतो, मुळातच “राष्ट्र” जन्माची प्रेरणाच “राष्ट्रवाद” असतो. भारतात हा राष्ट्रवाद अगोदरच होता, आधुनिकते सोबत त्याची व्यापकता वाढली आणि आजचा भारत उभा राहिला इतकेच.

“राष्ट्रवाद” हा लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरोधी आहे, असा आरोप करणारे पण आहे. मुळातच लोकशाहीचा चुकीचा अर्थ लावत लोकशाही राबवणारे आणि विरोधी विचारांच्या अभिव्यक्तीला व्यक्त होऊ देण्यास आडकाठी आणणारे असे वक्तव्य कसे करतात याचे आश्चर्य वाटते. राष्ट्रात लोकशाही प्रखरपणे नांदायच्या मागची प्रेरणा पण “राष्ट्रवाद” असू शकते, हे आपणास ब्रिटनच्या उदाहरणा वरून लक्षात येईल. लोकशाहीत विरोधी मतांचा आदर व्हायलाच हवा, त्यावर चर्चा पण व्हायलाच हवी पण यात “निष्कर्षावर”  दुमत किंवा बहुमत येण्यासाठी नाही तर निष्कर्षावर सहमत होणारी हवी, सहमती म्हणजे एकमत नाही हे लक्षात ठेवावे तर खऱ्या अर्थाने लोकशाहीचे खरे भव्य रूप आपल्याला दिसेल.

अभिव्यक्ती स्वातंत्र्या करता आपल्या राष्ट्राच्या सन्मानाच्या आणि एकतेच्या विरोधात जाणार नाही याची जवाबदारी न घेता वक्तव्य येत असेल तर त्याला राष्ट्रप्रेमी नागरिक विरोध करणारच मग त्याला अभिव्यक्तीची गळचेपी म्हणतांना तुम्ही राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या अभिव्यक्तीची गळचेपी करत नाही काय?

“राष्ट्रवाद” संविधान आणि व्यक्तीस्वातंत्र्य मानत नाही. हा अजून एक धादांत खोटा आरोप आहे. यात मुख्य मेख अशी कि “राष्ट्र” स्थापन झाल्या शिवाय राष्ट्राचे संविधान बनत नसते आणि “राष्ट्र” स्थापन व्हायची प्रेरणाच “राष्ट्रवाद” असतो. त्या मुळे राष्ट्रवाद आपल्या राष्ट्राच्या सन्मान प्रतीक असलेल्या संविधानाचा आदर आणि सन्मान करणार नाही असे होणार नाही. पण “राष्ट्रवादी” शक्तींवर असले आरोप करणार्यांनी मात्र भारतात संविधानाचा गैरवापर करणाऱ्या लोकांच्या गळ्यात गळे घालून सत्तेचा मलिदा खाण्यात धन्यता मानली हे पण सत्य आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात संविधान विरोधी NAC स्थापन करत पंतप्रधानांच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणण्यात आली होती, आणि त्या NAC मध्ये आज “संविधान बचाव किंवा संविधान खतरे मे है” चा उद्घोष करणारे डावे कॉंग्रेसच्या खांद्याला खांदा लाऊन बसले होते, विशेष म्हणजे याच डाव्यांनी सरकारचा संविधानिक पाठींबा काढला होता.

कोणताही “राष्ट्रवादी” पक्ष सत्तेवर आला तर याच मुळे तो नागरिकांच्या संवैधानिक स्वातंत्र्याचा आणि संविधातून मिळणाऱ्या हक्कांचा संकोच करणार नाही उलट त्याचे रक्षणच करेल, पण त्याच बरोबर तो नागरिकांना संवैधानिक हक्का सोबत त्याच्या संवैधानिक कर्तव्यांची आठवण सतत करून देत, कर्तव्याच्या पुर्तेतेची अपेक्षा करेल, हेच नेमके डाव्या विचारधारेला आणि सत्तेला चटावलेल्या उपनिवेशवादी मानसिकतेत असणार्या लोकांना नको आहे. कारण जेव्हा राष्ट्राप्रती कर्तव्याची जाणीव होते तेव्हा “राष्ट्रवाद” आपोआप केंद्रस्थानी येतो.

खरे तर युरोपियन समाजवादी बुद्धिवाद्यांनी “राष्ट्रवाद” या शब्दाला बदनाम केले, त्यावर कडी केली ती डाव्या विचारवंतांनी. युरोप पहिल्या – दुसऱ्या माहायुध्दात भरडल्या गेला तो त्याला कारणीभूत “जर्मन राष्ट्रवाद” असा एक सार्वत्रिक समज जेत्या राष्ट्रांनी पसरवला. “जेत्याचा इतिहास” हा खरा इतिहास असे मानणाऱ्या एत्देषीय बुद्धीभ्रष्टांनी पण त्याचीच तळी उचलली. पण कोणीही याचा विचार केलाच नाही कि “जर्मन राष्ट्रवाद” या भयानक विनाशाच्या दारात उभा राहायला तयार का झाला? असे कोणते कारण होते कि, जर्मन लोकांना एकदा अनुभव येऊन सुध्दा दुसर्यांदा पुन्हा “राष्ट्रवादाचा” मोह झाला. याचे साधे सरळ उत्तर आहे हे आहे कि इंग्लंड, फ्रांस, रशिया या राष्ट्रांच्या “राष्ट्रवादी” दादागिरीला उत्तर द्यायलाच “जर्मन राष्ट्रवादाचा” उदय झाला, पण हे कारण आपल्याला सांगितलेच जात नाही. जर्मनीला आपल्या वसाहती वाढवायच्या होत्या हे बरोबर पण आपल्या असलेल्या वसाहती घालवणे हे पण ब्रिटीश-फ्रांस राष्ट्रवादात बसत नव्हते त्याचे काय?

भारतातील “डावे” तर अत्यंत कणाहीन असे विचारवंत आहेत, त्यांना “राष्ट्रवाद” कळणार कसा? अगदी दुसर्या महायुद्ध काळात जेव्हा हिटलरने सोवियत रशिया सोबत मैत्रीचा करार करत फ्रान्सवर हल्ला केला त्या वेळी याच हिटलरचा पुळका भारतीय कम्युनिस्ट पक्षाला आला होता. ब्रिटन जर्मनी विरोधात युद्धात उतरल्यावर भारतात सुरु झालेल्या लष्करी भरतीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाठिंबा दिला तेव्हा त्याला विरोध करणारे हेच दावे विद्वान मात्र हिटलरने मैत्री करार मोडून सोवियत रशियावर हल्ला केल्यावर मात्र या युद्धात भारताने ब्रिटीशांच्या बाजूने उभे राहावे या विचारांची पिंक फेकू लागले. इतकेच नाही तर या बदललेल्या युद्धाच्या परिस्थितीने लष्करी मदतीच्या आशेने सिवियत रशियात गेलेल्या डाव्या विचारांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सोवियत रशियाने नाकारल्यावर, फक्त देशाच्या स्वातंत्र्या करता जेव्हा हिटलरला भेटायला आणि मदत मागायला जर्मनीत गेले. तेव्हा हेच भारतातील डावे मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मानहानी त्यांच्या कम्युनिस्ट मुखपत्रातून करत होते.


या उलट आपल्या विचारांच्या विरोधी विचारांचे असून सुद्धा भारतातील “उजव्या” विचारसरणीने मात्र नेहमीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना योग्य सन्मान देण्याचा प्रयत्न केला कारण फक्त एकच कि आपल्या राजकीय वैचारिक बैठकीतपण आपल्या “राष्ट्रहिताला” त्यांनी नेहमी सर्वोच्च स्थान दिले.
या उलट मात्र भारतातील डाव्यांनी “राष्ट्रहिता” पेक्षा आपल्या वैचारिक अक्षावर देशाच्या जनतेला फिरवत ठेऊन सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचेच परिणाम म्हणून चीनच्या आक्रमणाच्या वेळेस हेच डावे चीनला भारताचा भाग्यविधाता म्हणायला पण तयार झाले, त्याच मुळे भारतात या डाव्यांच्या नक्षलवादी हिंसाचाराला जनता बळी जाऊ लागली, त्याच मुळे भारतात “भारत तेरे तुकडे हजार” चे नारे बुलंद करणार्यांच्या मागे “डावी संघटना”उभी असल्याचे चित्र दिसले, त्याच मुळे देशात दहशतवादी कृत्य करणाऱ्या अफजल गुरु, याकुब मेनन सारख्या आतंकवाद्यांना दिलेल्या संवैधानिक शिक्षेला “न्यायालयीन खून” म्हणून डावे विचारवंत समोर घेऊन आले.      

 याच सगळ्या “डाव्या” विचाराला देशातील जनतेने नाकारत खऱ्या “राष्ट्रवादाला” जनतेने जवळ केले. याच “राष्ट्रवादाची” मशाल पेटती ठेवायचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली जवळपास नव्वद वर्षे करत आहे, जेव्हा जगातील काही बुद्धीवाद्यांनी विशेषतः भारतातील डाव्या बुद्धिवाद्यांनी “राष्ट्रवाद” या शब्दाला अक्षरशः एखाद्या शिविचेच रूप दिले होते. याच वैचारिक युद्धाच्या निर्णायक परिस्थितीत आज देश उभा आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे कर्तुत्व हेच की, डाव्यांच्या “राष्ट्रवाद” विरोधी मानसिकतेचा फोलपणा त्यांनी ठळक पणे देशवासीयांच्या समोर आणला. “वैचारिक लढतीत” एक विजय अजून मिळवत देशात “राष्ट्रवादाचे” स्थान बळकट केले. असे करत या संघ – मोदी – शहा या “त्रीधारेने” भारताच्या वैचारिक आणि राजकीय विचारंचा अक्ष बदलला आहे.  


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा