आता काही दिवसांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यू नंतर जेव्हा समाज माध्यमांवर असल्या प्रतिक्रिया आल्या तेव्हा आपला जळफळाट झाला नव्हता का? जेव्हा ABP माझा वर किंवा BBC पोर्टल वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी जेव्हा "सावरकर नायक की खलनायक" अशी चर्चा होते तेव्हा आपले रक्त नक्कीच तापते ना? मग तेव्हा आपण पण तसेच वागत आहोत हे आपल्याला समजत नाही काय?
नवीन पिढी ज्यांनी गिरीश कर्नाड यांना फक्त "टायगर जिंदा है" सारख्या तद्दन मनोरंजक चित्रपटात नायकाच्या अधिकाऱ्यांच्या दुय्यम भूमिकेतच बघितले आहे त्यांना खरेच गिरीश कर्नाड यांची उंची माहीत आहे का? असा प्रश्न नक्कीच मनात येतो.
ज्यांनी उंबरठा, निशांत, सरगम मधील काम ज्यांनी बघितले आहेत त्यांच्यावर गिरीश कर्नाड यांच्या अभिनयाचा ठसा नक्कीच उमटला असणार. ज्यांनी त्यांची ययती, हयवदन ही नाटके बघितली असतील ते नक्कीच त्यांच्या नाट्य लेखन आणि नाट्य दिग्दर्शनाचे चाहते झाले असतील. उत्सव सारखा नितांत सुन्दर चित्रपट पण यांनीच दिग्दर्शशीत केला होता.
त्याचे विचार कसेही असले तरी त्यांच्या भूमिकांवर ते विचार नक्कीच कुरघोडी करू शकले नाही त्याच मुळे मालगुडी डेज सारख्या मालिकेत वकील असलेला, देशप्रेमी आणि हिंदू संस्कृती विषयी प्रेम असणारा, प्रेमळ पण तितकाच कडक अश्या वडिलांची भूमिका त्यांनी अत्यन्त सुंदरपणे सादर केली होती हे कसे विसरता येईल.
वैचारिक बैठक वेगळी असणे म्हणजे आपला शत्रू असणे ही काही आपली भूमिका नाही. त्या मुळे गिरीश कर्नाड वरील राग समजू शकत नाही. पण तरीही गिरीश कर्नाड, नसरुद्दीन शहा सारख्या अनेकांनी आमची अभिनयाची क्षितिजे समृद्ध केली हे पण विसरून चालणार नाही. पण तरी त्यांच्या वैचारिक भावनेच्या धारेत आम्ही वाहून गेलो नाही, कारण आमचा आमच्या विचारधारेवर जास्त विश्वास होता.
अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघातानंतर, परिकर यांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर विरोधी गटा कडून ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्याची प्रतिक्रिया म्हणून तुम्ही तशाच प्रतिक्रिया देत असाल तर, अत्यन्त दुःखाने हे मान्य करावेच लागेल की विरोधकांची इच्छा आता पूर्ण झाली. कारण तुम्ही कट्टर नक्कीच नव्हता, पण त्यांनी तुम्हाला कट्टरतेकडे झुकवलेच.
असो, ज्या रावणाचा वध केल्या वर पण लक्ष्मणाला रावणाच्या पाया पडायला लावले होते. आजही आपण जी "शिवस्तुती" म्हणतो ती रावणानेच लिहली आहे हे विसरू नका. जरी रावणाच्या वाईट कर्मा साठी आपण दरवर्षी त्याला जाळत जरी रावणाचा निषेध व्यक्त करत असलो तरी त्याचीच "शिवस्तुती" म्हणत त्याच्या योग्य गुणांचे आपण कौतुकच करतो, हीच आपली संस्कृती आहे हे विसरू नये.
"मरणांती वैराणी" हा नेहमी करता वापरात नकोच हे मान्यच. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याचा निषेध व्यक्त झालाच पाहिजे. पण त्याला स्थळ-काळाचे औचित्य नक्कीच पाळावे. गिरीश कर्नाड यांचा विचारांचा रावण नक्कीच दरवर्षी जळवा, पण आज त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवावी इतकेच!
योग्य भूमिका।....
उत्तर द्याहटवा