"आम्ही काय इस्लाम मध्ये सुधारणा करण्याचा ठेका आम्ही नाही घेतला, मुसलमानांना समजा धार्मिकतेच्या गटारातच लोळावयाचे आहे त्याला काँग्रेस काय करणार?" लोकसभेत भाषण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत गाजलेल्या "शहाबानो प्रकरणा" वरील काँग्रेसची भूमिका सांगितली. वर वर बघायला ही समाजाच्या "मला काय त्याचे!" या भूमिकेचाच भाग वाटतो. पण देशाला पुढे न्यायची जवाबदारी ज्याच्या खांद्यावर आहे अश्या पक्षाची ही भूमिका असेल तर ही भूमिका अत्यंत धोकादायक अशी आहे.
आपल्या महाराष्ट्रात "अंधश्रद्धा निर्मूलन समिती" नावाची एक संस्था काम करते. खरे तर "धर्मातील" अंधश्रद्धा दूर करणे, चुकीच्या परंपरा विसर्जित करणे या सारखे समाज सुधारणावादी काम या संस्थेने सुरू केले. पण हळू हळू ही संस्था विवादाच्या भोवऱ्यात अडकली. या संस्थेवर मुख्य आरोप होता तो म्हणजे "हिंदू धर्माच्या" बदनामीचा!
या संस्थेचे जे काही कार्य आहे ते फक्त एकच धर्माच्या विरोधात आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे. जसे हिंदू धर्मातील अनिष्ठ चालीरितींवर आपण हल्ले चढवतात, जसे हिंदू धर्मातील भोंदू बाबांवर कारवाई या वर संस्थेचे जे घोषित - अघोषित कार्यकर्ते या वर उत्तर देतांना "आम्ही हिंदू आहोत त्या मुळे "हिंदू" धर्मातील अनिष्ठ रूढी-परंपरा-अंधश्रद्धा दूर करणे हे आमच काम आहे." असे बोलायला लागले. एका दृष्टीने हे बरोबर होते. पण हा युक्तिवाद अत्यंत तोकडा तेव्हा पडतो जेव्हा तुम्ही आपल्या कामाला समाजात नेता. भारतीय समाजाचे वैविध्य हेच वैशिष्टय आहे. अनेक धर्म, जाती, पोटजाती यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, रूढी-परंपरा यांनी हा समाज समृद्ध आहे. त्या मुळे कोण्या एका धर्माला बदलावल्यावर संपूर्ण समाज बदलेल हा मात्र वैचारिक फोलपणा होता आणि आहे.
याच वैचारिक फोलपणाचा नमुना वरती सांगितलेले काँग्रेस नेत्यांचे "शहाबानो प्रकरणा" वरील वक्तव्य आहे. याच विचारातून जिथे हिंदू धर्मातील श्रद्धांवर तथाकथित पुरोगामी हल्ला करायला लागले, तेव्हा मात्र इतर धर्मांमधील अंधश्रध्दांवर मात्र चूप बसले किंवा थातूरमातूर काम केले. शिवलिंगावर दूध चढवणे चुकीचे असेल, तर थडग्यावर चादर चढवणे पण तितकेच चुकीचे आणि चिवरदान किंवा मेणबत्त्या लावणे पण तितकेच चुकीचे सांगतांना यांची जीभ चाचरली. पण याच बरोबर इस्लाम मध्ये धार्मिक सुधारणा करणाऱ्या हमीद दलवाई सारख्या लोकांच्या मागे पण या मानसिकतेची लोक खुल्या मनाने उभी राहू शकली नाही हे पण वास्तव.
त्यातच स्वातंत्र्यानंतर भारतात "सेक्युरिजम" च्या नावाखाली काँग्रेसने धार्मिक राजकारण अजूनच विकृत पद्धतीत सुरू केले. त्याचा परिणाम म्हणजे भारतातून कपाळावरील गंध, शेंडी, धोतर, टोपी यांना सुट्टी मिळाली, पण जाळीदार गोल टोपी, शेरवानी, बुरखा याचे महत्व वाढत गेले. खरे तर देशाचे धार्मिकतेच्या कारणावरून तुकडे पडल्यावर, जे मुस्लिम असूनही भारतात राहिले त्यांनी भारतातील "समान नागरी कायद्याला" विरोध करायला नको होता. पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी पण या बाबतीत कच खाल्ली हे नक्की. जे राज्यकर्ते तत्कालीन तथाकथित हिंदू कट्टरतावाद्यांना न जुमानता जसे "हिंदू कोड बिल" लागू करू शकले, त्याच प्रमाणे मुल्ला-मौलवींचा विरोध मोडून काढत "समान नागरी कायदा" लागू करू शकले नसते काय?
पण काँग्रेसला "समान नागरी कायदा" तर जमला नाहीच, पण मुस्लिम तृष्टीकरणात ती इतकी बुडाली की मुस्लिमांना धार्मिक सुधारणेचे आवाहन करण्यापेक्षा "मुस्लिम पर्सनल लॉ" च्या रुपात धार्मिक शरिया कायदा तयार करण्याचे पाप केलेच, पण "शहाबानो प्रकरणात" तर संविधानाची पण मोडतोड केली.
अर्थात इतर अल्पसंख्यांक धर्म किंवा जातींना कुरवाळत त्यांना अधिक कट्टर बनवत त्यांची मतपेढी तयार करायची आणि आपण सत्ता उपभोगायची हीच रीत असल्यामुळे जो काही धार्मिक किस पडायचा तो "हिंदूंचा" आणि जे काही आरोप करायचे ते "हिंदूंवर" असेच सुरू राहिले.
पण याचे परिणाम भारतासारख्या देशात सामाजिक विघटन घेऊन आले. "तीन तलाक" च्या मुद्यावर आज काँग्रेस पुन्हा तीच खेळी खेळायचा प्रयत्न करत आहे. पण या मुळे इस्लाम मधील धार्मिक सुधारणावादी गटाला त्यांच्या कार्यात अडथळा आणेल आणि देशात पुन्हा धार्मिक असंतोष तयार होईल, जो अतिशय घातक होईल.
अश्याच धार्मिक विघटनातून मग माजी पंतप्रधान मनमोहनसिंग सारख्या हुशार माणसाला पण,"देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" सारखी भंपक वाक्य फेकावी लागतात.
त्या ऐवजी कोणतेही धर्म-पंथ-जात-भाषा या मध्ये न विभागता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "१२० करोड भारतीय" यांना आवाहन करतात आणि त्या हिशोबानेच सरकारच्या योजना कोणत्याही भेदभाव न करता "१२० करोड" भरतीयांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात हे सामान्य भारतीय नागरिकांना भावात आहे आणि हेच नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या विजयाचे खरे कारण आहे.
पण "फोडा आणि राज्य करा" या इंग्रजांच्या नीतीचा अवलंब करणाऱ्या तथाकथित संविधान रक्षक, पुरोगामी पक्षांना हा फरक जो पर्यंत समजणार नाही, तो पर्यंत EVM वरील खोटे आरोप लोकांचे मनोरंजन आणि त्यांचे मानसिक समाधान करत राहतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा