विरोधक जागे होणार काय?

                    नरेंद्र मोदी सरकारने सत्ता ग्रहण करून आज १३ दिवसाच्या वर झाले. सरकार लगेच कामाला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली कॅबिनेट मिटिंग घेतली त्यात महत्वाचे निर्णय घेतले आणि मॉरिशस, श्रीलंकेच्या दौऱ्यावर निघून गेले. 

                     गृहमंत्री म्हणून पदभार सांभाळल्या नंतर अमित शहा यांनी उच्च स्तरीय बैठकांचा सपाटा लावला. येणाऱ्या  केदारनाथ यात्रेच्या नियोजना पासून, जम्मू काश्मीर राज्याचे मतदार संघ पुन्हा रेखांकित करण्याचा दूरगामी परिणाम करण्यासारखा निर्णय घेतला. 

                        वित्त मंत्री बनलेल्या निर्मला सीतारामण यांनी जवळपास अकरा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सेवेतून बरखास्त करत धडक कारवाई सुरू केली. नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचा कार्यक्रम हातात घेतल्याचे जाहीर केले, आणि ते फक्त जाहीर करून थांबणार नाही हे देशातील जनता जाणून आहे.

                  पण या सगळ्यात विरोधक कुठे आहे? निवडणुकी पूर्वी आघाडी-महाआघाडी सारखे शब्दप्रयोग करत शड्डू ठोकणारे विरोधक निकालाच्या धक्क्यातून अजून सावरलेले दिसत नाही. 

                   महाराष्ट्रात आणि देशात आपल्या राजकारणाने दबदबा कायम करणारे शरद पवार यांना आता राजकारण कसे करावे हेच उमगत नसल्याचे त्याच्या येणाऱ्या वक्तव्यावरून दिसत आहे. जेव्हा शरद पवारांसारख्या "जाणत्या राजा" ची ही अवस्था असेल तर देशातील इतर राजकारणी लोकांची, विशेषतः राहुल गांधी सारख्या जबरदस्ती नेता बनणाऱ्या लोकांची मानसिक अवस्था बिकट झाली असणार यात काही शंका नाही.

                    त्यातूनच मग वंचित आघाडी वाले MIM ची मत मिळाली नाही म्हणून हरलो, किंवा बसपा वाले समाजवावादी मत नाही मिळाली म्हणून रडारड करत आहेत. 

                      मुळातच विरोधकांनी आणि त्यांच्या पत्रकारांनी आघाडी-महाआघाडी मजबूत असल्याचा आभास तर उत्तम तयार केला होता. आपण सगळे एक असल्याच्या बतावणीचा बुरखा निवडणुकी आधीच फाटला असला तरी त्याला "रफ्फु" करून त्या जीर्ण कपड्याला चालवण्याचा प्रकार होता. 

                      या १३ दिवसात विरोधकांकडून निवडणुका हरल्याचे अनेक कारण दिल्या गेली. त्यात अगदी EVM वरील आरोपांपासून अगदी, मतदारांची अक्कल काढण्यापर्यंत गेला. आता तर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांवरच निवडणुकीच्या पराभवाचे खापर फोडले. 

                         तरी बरे की शेखर गुप्ता सारखे ल्युटीयन्स पत्रकार उशिरा का होईना आपल्या कोषातून बाहेर येत आपल्या आकलनातील आणि गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने जमिनीवर केलेल्या लोकउपयोगी कामाला कसे नजरेआड केले हे समप्रमाण दाखवत आहेत.

                        तरी विरोधक मात्र अजून शुद्धीवर येत नाहीये. तर काही विरोधक अजून EVM विरोधात जनमत पेटवून देशात "क्रांती" करायचे स्वप्न बघत आहेत. या करता त्यांचा जुना "प्रोपोगंडा प्रोग्राम" चालवत EVM बद्दल आणि एकूणच भारतीय निवडणुक प्रक्रिये बाबत खोट्या वावड्या उठवायचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः यात अग्रेसर निवडणुकांमधील असे घटक आहेत जे जातीचे राजकारण करत हिंदूंमध्ये फूट पडून आपल्या पोळीवर तूप ओढून घेत होते. पण या निवडणुकांमध्ये त्यांचे जातीय राजकारण इतक्या जोरदार पणे हरले की त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. 

                    तसेही निवडणुकीच्या आधीही सगळ्याच विरोधी पक्षांनी EVM बद्दल शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. इतकेच नव्हे तर या करता न्यायालयाचे दरवाजे वाजवायची पण तयारी केली होती. पण भाजपला मिळालेले प्रचंड बहुमत बघून आणि त्या बद्दल जनतेची प्रतिक्रिया बघता त्यांची सध्यातरी चूप राहणेच पसंद केले. 

                 तरी निकालानंतर दबक्या आवाजात या निकलाबद्दल असंतोष व्यक्त करणे सुरूच ठेवले, जेणे करून जनतेकडून या विरोधात आवाज वाढल्या जाईल आणि दबाव वाढवता येईल. पण यात ज्ञानबाची मेख ही की, जनतेला माहीत आहे ना! की त्यांनी नक्की मत कोणाला दिले. म्हणून जनतेकडून पण त्यांना काहीच फायदा झाला नाही.

                      या निकालांचा सगळ्यात जास्त असर देशाच्या पश्चिम आणि पूर्व राज्यातील पंतप्रधानपदा करता उत्सुक नेत्यांना पडला आहे, ते नेते म्हणजे शरद पवार आणि ममता बॅनर्जी. योगायोगाने दोघांनी ही काँग्रेसमधून बाहेर पडत आपला पक्ष स्थापन केला होता आणि आपापल्या राज्यात त्यांना भक्कम स्थितीत आणले होते. त्यातही शरद पवार यांनी तर काँग्रेस सोबतच आपली चूल पुन्हा मांडली. 

                 पण या निवडणुकीचा त्यांच्यावर झालेला प्रतिकूल परिणाम त्यांच्या वक्तव्यावरून आणि वागणुकीवरून दिसत आहे. शरद पवार रोज वेगवेगळी वक्तव्ये करत संभ्रम निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत आणि स्वतःच स्वतःचे हसे करत आहेत. तर तिकडे ममता बॅनर्जी बंगालला स्वतःच्या हाताने आजारकतेच्या उंबरठ्यावर उभे करत आहे.

                 बंगाल मध्ये निवडणुकी नंतर भाजप कार्यकर्त्यांच्या खुनाचे सत्रच तृणमूल कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. "जय श्री राम" चा जयघोष पण त्यांना सहन होत नाही, या वरूनच त्यांच्या ढासळलेल्या मानसिक परिस्थितीची जाणीव करून देत आहेत.

लवकरच आता महाराष्ट्रासकट अनेक राज्यांच्या निवडणुका येत आहेत. त्या निवडणुकात विरोधकांची रणरीती काय राहील आणि ती किती काम करेल हे बघणे मनोरंजक असेल. 

सध्या तरी विरोधक आणि त्यांचे पाठीराखे अजून धक्क्यातून सावरले नसल्यामुळे असेल सध्या तरी वृत्तपत्रापासून समाज माध्यमातून होणारे युद्ध सध्या तरी थंड पडले आहे. पण विधानसभेच्या निवडणुकी निमित्य लवकरच ते पुन्हा आपल्या शिगेला पोहचेलच!

टिप्पण्या