गिरीश कर्नाड आज आपल्याला हे नाव माहीत आहे ते डाव्या विचारांचे कलाकार कंपू मधील सदस्य म्हणून, "मै भी नक्षल" चा बोर्ड लावत सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - नरेंद्र मोदी - भाजपचे कट्टर विरोधक म्हणून. काही दिवसांपूर्वी त्यांनी कर्नाटकात "टिपू सुलतान जयंती" निमित्त निर्माण झालेल्या वादात त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली होतीच, पण त्यांना जनतेच्या शाब्दिक रोषाला बळी पण पडावे लागले होते.
पण गिरीश कर्नाड हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांची राजकीय मत जितकी प्रखर आणि स्पष्ट.....तितकाच त्यांचा अभिनय आणि दिगदर्शन पण! आज अनेक हिंदुत्ववाद्यांना कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या पुस्तकांची भुरळ पडली आहे. गिरीश कर्नाड यांची चित्रपट दिगदर्शक म्हणून कारकीर्द पण भैरप्पा यांच्या कादंबरीवर आधारित होता "वंश वृक्ष".
महाराष्ट्र - कर्नाटक सीमा आणि भाषा वाद आपल्या जोरावर असतांना पण गिरीश कर्नाड यांना दोन्ही कडून सारखेच प्रेम मिळाले. कोकणी भाषी घरात इथे महाराष्ट्रात त्यांचा जन्म. मराठीशी त्यांची नाळ इथेच जुळली आणि त्यांनी पण वेळो वेळी ती टिकवून ठेवली.
पुण्यात शिक्षण झाले असल्यामुळे आणि महाराष्ट्र-कर्नाटकात असलेली नाटकाची संपन्न परंपरा या मुळे गिरीश कर्नाड यांच्या वर पण नाटकाने गारुड केले असल्यास नवल नाही. त्यांनी दिगदर्शीत केलेली अग्नी मुत्तु मळे, तलेदंड ही कन्नड नाटके, तर हयवदन, तुघलक, टिपू सुलतान, ययाती ही काही गाजलेली नाटके.
त्यांनी मराठीत केलेला "उंबरठा" हा चित्रपट पाहिला नाही असा एका पिढीतील मराठी सापडणार नाही. स्मिता पाटील यांच्या कारकिर्दीतील हा चित्रपट मैलाचा दगड! तसाच मराठी चित्रपटात तत्कालीन काळात जे नाविन्यपूर्ण विषय हाताळले गेले त्यातील हा एक चित्रपट.
गिरीश कर्नाड यांनी हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकेत पण काम केले. दूरदर्शनवर गाजलेल्या "मालगुडी डेज" च्या नितांत सुंदर मालिकेतील पोरगा "मंजू" जितका लक्षात राहतो तितकाच लक्षात राहतो, स्वभावाने कडक पण प्रेमळ, देशप्रेमी, काहीसे धार्मिक पण धर्माचे अवडंबर नाकारणारे त्याचे वडील "गिरीश कर्नाड"!
पद्मभूषण १९९२ ला, त्या अगोदर १९७४ ला पद्मश्री पुरस्कार त्यांचा सन्मान केला होता. संगीत नाटक अकादमीचा नाट्य लेखनासाठीचा पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते.
आज वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे बंगळुरू येथील घरी निधन झाले. वैचारिक मांडणीच्या गदारोळात पण एक उत्तम आणि संवेदनशील अभिनेता, दिगदर्शक, लेखक असलेला हिरा आपण गमावला त्याचे दुःख नक्कीच आहे. त्याचा आत्म्याला सदगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा