BBC हिंदी / मराठी आता स्वतःला "न्यायाधीश" समजायला लागली आहे असे वाटते. कारण ओरिसातून निवडून आलेले आणि मंत्रिपदाची शपथ घेतलेले "ओरिसाचे मोदी" म्हणून ओळखले जाणारे श्री प्रताप चंद्र सारंगी यांच्या बद्दल लिहलेल्या लेखा बद्दल.
१९९९ साली ओरिसा मध्ये संतप्त हिंदू जमावाने ग्राहम स्टन्स नावाच्या पद्र्याचा जाळून खून केला होता. त्या काळात हे प्रकरण चांगलेच गाजले. या गुन्ह्याकरता दारासिंह आणि इतर ११ लोकांना अटक करून त्यांच्यावर खटला दाखल केला होता. त्यात प्रथम दारासिंह याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर न्यायालयानेच त्या शिक्षेला जन्मठेपेमध्ये बदलावली तर इतर अकरा जणांना सोडून देण्यात आले.
या प्रकरणा वरून देशात बराच वादंग झाला होता. या प्रकरणाच्या मागे बजरंग दलाचा हात असल्याचा आरोप पण करण्यात आला, त्याची चौकशी पण करण्यात आली. पण त्यात काहीही तथ्य तपास करणार्यांना आढळले नाही.
तर या काळात सारंगी हे बजरंग दलाचे ओरिसातील अध्यक्ष होते. याच एका कारणा वरून आता BBC त्यांच्यावर आरोप करत आहे. विशेषतः तेव्हा मात्र तपास यंत्रणांना या सगळ्या प्रकरणात बजरंग दलाचा हात आढळला नसतांना!
यात BBC चा तर्क असा की, सारंगी यांनी तेव्हा दिलेल्या मुलाखतीत हत्येचा निषेध केला असला तरी, ते धर्मांतर विरोधी होते! किती हास्यास्पद तर्क आहे हा! की ख्रिश्चन मिशनरीच्या धर्मांतराचा विरोध करणे हा भारतीय कायद्याने गुन्हा आहे असे BBC ला वाटते.
खरे तर हे जगजाहीर आहे की भारतात चालणाऱ्या मिशनरीजच्या धर्मांतराला भारतातील सगळ्याच "हिंदुत्ववादी" संघटना विरोध करतात. मुळातच गरीब आदिवासी लोकांना फसवून किंवा प्रभोलन दाखवत ह्यांची धर्मांतर चालतात.या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आदिवासी कल्याण आश्रम, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांचे आणि यांच्या स्वयंसेवक/कार्यकर्त्यांचे मत नक्कीच विरोधात आहे.
म्हणून कोणत्याही गुन्ह्याचे आरोप कोणताही पुरावा नसतांना BBC करणार आणि आपण निमूटपणे ते मान्य करायचे ही कोणती पत्रकारिता आहे? BBC आता भारतीय न्यायालयाची भूमिका करणार आहे की पत्रकारिता करणार आहे हे पण BBC ने स्पष्ट करावे? माझा पण या सगळ्या धर्मांतराला विरोध आहे म्हणून उद्या भारतात कुठेही अशी घटना पुन्हा घडली तर, या लेखात लिहलेल्या या वाक्यावरून BBC मला पण गुन्हेगार समजणार काय?
बाकी बेकायदेशीर पणे एकत्र येणे, धार्मिक भावना भडकवणे, दंगल घडवणे या सारखे गुन्हे "राजकीय गुन्हे" म्हणून ओळखले जातात. ओवेसीच्या भावा पासून सध्या तुमच्या गळ्यातील ताईत झालेल्या कन्हैया कुमार पर्यंत यातील अनेक गुन्ह्याची नोंद असलेले गुन्हेगार आहेत. सारंगी यांच्यावर ओरिसा सरकारने केलेला एकही आरोप सरकार न्यायालयात सिद्ध करू शकले नाही हे महत्वाचे!
अहो, कोरेगाव - भीमा नंतर केलेल्या कारवाई नंतर उसळलेल्या दंगलीचे गुन्हे महाराष्ट्र सरकारने मागे घेतले म्हणून, नाहीतर तुमच्या आवडत्या प्रकाश आंबेडकरांवर पण हेच गुन्हे दाखल झालेले असते.
त्या मुळे BBC ने फालतू बडबड न करता फक्त पत्रकारिता करावी, काहीही पुरावे नसतांना दुसऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायची उठाठेव करू नये. BBC ची निस्पृह पत्रकारितेची ओळख भारतातून गेल्या काही वर्षात पार पुसल्या गेली आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या "फेक न्यूज" बाबतीतील खोट्या रिपोर्ट्स मूळे आता BBC विश्वासहार्य पण राहिली नाही. भारतातील तथाकथित पुरोगामी कंपूच्या मागे फरफटत जात आपली उरली सुरली प्रतिष्ठा धुळीला मिळण्यापूर्वी BBC ने योग्य पाऊले उचलायला हवी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा