झाकल्या मुठीचा फुटलेला फुगा.

          या निवडणुकीत अनेक "झाकल्या मुठी" उघड झाल्या. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर प्रणित वंचित बहुजन आघाडीची हवा व्यवस्थित पणे करण्यात आली होती. 

               पुण्यातील "एल्गार परिषद" आणि त्या नंतर झालेली कोरेगाव - भीमा दंगल ही महाराष्ट्रात जातीय दरी द्वेष वाढवणारी ठरते की काय? ही भीती वाटत असतानाच, महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्या षड्यंत्रचा योग्य तपास करत या विरोधात अनेकांना कारागृहाचा रस्ता दाखवला. 
                      पण या सगळ्या प्रकरणात राजकीय दृष्ट्या मागे पडलेले प्रकाश आंबेडकर हे एकाएकी प्रकाश झोतात आले. तथाकथित पुरोगामी पत्रकार यांचे हे लाडके नेते ठरले. त्यातच "जय भीम, जय मीम" च्या घोषणा देत MIM च्या ओवेसी सोबत आघाडी करत त्यांनी जोरदार दंड थोपटले. 

                      डाव्या पत्रकारांना हवी असलेली संघ, भाजप विरोधी पूर्ण पोपटपंची करत यांनी बरीच हवा निर्माण करायचा प्रयत्न केला. स्वतः प्रकाश आंबेडकर त्याच्या अकोला येथील बालेकिल्ल्या सोबत सोलापूर येथुन पण उभे राहिले. 

                  पण वंचित आघाडीचे उमेदवार काही जिंकून आले नाही. यातील महत्वाची गोष्ट ही की, मुस्लिम मत काही वंचित कडे वळली नाही, ती गेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडे. भाजप हिंदू मधील जातीय दरी कमी करत "हिंदुत्वाच्या" मुद्यावर हिंदूंना एका झेंड्याखाली आणण्यात यशस्वी झाली हे या मागील अजून एक कारण. 
                       अजून एक झाकली मूठ म्हणजे राज ठाकरे. "लाव रे तो व्हिडीओ" हे वाक्य तथाकथीत पुरोगामी-लिबरल पत्रकारांनी बरेच उचलून धरले. आपल्या पक्षाचा एकही उमेदवार उभा नसतांना त्यांनी आपली पूर्वीची काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी भूमिका बदलत भाजप विरोधी भूमिका घेतली होती. त्यांनी महाराष्ट्रातील काही भागात सभा घेण्याचा सपाटा लावला होता. वायर, क्विड सारख्या डाव्या प्रपोगंडा पोर्टल आणि व्हाट्स अँप वर येणाऱ्या "फेक न्यूज" च्या आधारावर नवीन "डिजिटल इंडिया" पद्धती प्रमाणे संगणकिय प्रेझेन्टेशनचा आधारावर कथित "पुरावे" दाखवत भाजपला बदनाम करण्याचा सपाटा राज ठाकरेंनी लावला आणि पुरोगामी पत्रकारांनी त्यांना डोक्यावर बसून नाचायला सुरवात केली.

                  राज ठाकरेंना उत्तर द्यायला भाजप थोडी चाचपडली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला. पण राज ठाकरे यांचे वक्तृत्व जास्त उजवे ठरले अशी हवा तयार करण्यात वृत्तसृष्टीला काही काळ तरी यश नक्कीच आले. 

                       पण या पत्रकारांनी एका गोष्टी कडे दुर्लक्ष केले ते म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषणातील खोटेपणा आणि विरोधाभास यांच्या कडे आणि दुसरे म्हणजे राज ठाकरे यांची आज पर्यंत तयार झालेली इमेज! 

                  हा धागा मात्र पकडला तो जनतेने! ज्या "डिजिटल" पद्धतीने राज ठाकरे भाजप आणि मोदी यांची पोलखोल करण्याचा आव आणत होते, डिजिटल इंडिया या सरकारी घोषणेची हुर्ये उडवत होते, त्याच डिजिटल इंडिया मुळे "स्मार्ट फोन" हातात घेऊन, इंटरनेटचा योग्य वापर करत राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांचा धुवा समाज माध्यमांवर नियमित निघत होता. मग डोवाल वरचे आरोप असोत, की त्यांनी लाभार्थी म्हणून समोर आणलेला आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता असो, या सगळ्या खोट्या आरोपांना भाजप पेक्षाही जास्त प्रखरपणे उघडे पाडले ते समाज माध्यमांवरील जनतेने. सोबतच त्यांना अगोदर भरभरून पणे दिलेल्या नगरसेवक आणि आमदार ज्याला सांभाळता आले नाही, एकही आंदोलन शेवट पर्यंत निभावू शकले नाही असे अर्धवट काम करणाऱ्या राज ठाकरे जनतेमध्ये आपली इमेज काही बदलवू शकले नाही. त्याच मुळे राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी जरी दिसत असली तरी पर्याय न दिल्यामुळे त्या गर्दीचे रूपांतर मतामध्ये करता आले नाही. त्यांनी सभा घेतलेल्या मतदार संघामधील फक्त तीन जागा विरोधकांनी जिंकल्या, बारामती - सुप्रिया सुळे, सातारा - उदयनराजे भोसले आणि रायगड - सुनील तटकरे, आता यांच्या जिंकण्यात उमेदवारांचा स्वतःचा करिश्मा किती? आणि राज ठाकरे यांच्या "लाव रे तो व्हिडीओ" चा हात किती? याचा विचार तुम्ही करायचा. बाकी राज ठाकरे हे शरद पवार यांचे "पोपट" असल्याचे ठसवण्यात मात्र भाजप नक्कीच यशस्वी ठरली हे मात्र नक्की.

              तिसरी राष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती म्हणजे प्रियांका गांधी वाढरा!
                       "काँग्रेस की आधी, प्रियंका गांधी" या घोषणे सोबत "जनता की भारी मांग पर" प्रियांका गांधी वढेरा यांची काँग्रेस मध्ये पद देत झोकात  निवडणूकीत उतरवल्या गेले. प्रियंका यांनी पण प्रचाराचा झंजावत उभा केल्याचा देखावा तयार केला गेला. काँग्रेस प्रेमी पत्रकारांना तिच्यात लगेच इंदिरा गांधींचा भास व्हायला लागला. खरे तर आधीही काँग्रेस मध्ये राहुल गांधी यांच्या पेक्षा पण प्रियंका यांची मागणी जास्त होती, पण सोनिया गांधी यांनी कौल राहुल गांधी यांना दिला. या अगोदर प्रियंका गांधी वढेरा रायबरेली-अमेठी या गांधी घराण्याच्या मतदार संघाचे नियोजन करीत आल्या आहे, आणि इथे आजपर्यंत राहुल गांधी आणि सोनिया गांधी हरले नसल्यामुळे त्यांना राजकारणाची चांगली समज आहे आणि त्यांचा करिष्म्याची हवा तयार झाली होती. अगोदर मोदी विरोधात वाराणसी मधून उभी राहणार म्हणून केलेली गर्जना आणि नंतर घेतलेली माघार हे उदाहरण "मैदानात येताच या फुग्यातील हवा गेली" याचाच पुरावा होता. जनतेने नाकारण्याचे अजून चांगले उदाहरण इतकेच देता येईल की प्रियंका गांधी वढेरा यांनी प्रचारा दरम्यान केलेल्या सभा पैकी फक्त वायनाड आणि रायबरेली ह्याच जागा काँग्रेसला राखता आल्या. गमतीची गोष्ट म्हणजे पंजाब मधील १३ पैकी ८ जागा काँग्रेसने जिंकत विजय साजरा केला असला तरी ज्या दोन मतदार संघात प्रियांका यांनी सभा घेतल्या त्या जागा मात्र काँग्रेसला गमवावे लागले. 

          चौथी व्यक्ती म्हणजे कन्हैया कुमार!
                     JNU मधील आजन्म विद्यार्थी आणि "भारत तेरे तुकडे" वल्या घोषणे मुळे नावरूपात आलेला, पुरपगाम्यांनी अगदी "प्रेषित" जन्माला आला या नुसतीच त्याला डोक्यावर घेतले. नागपुरात येऊन RSS संपवण्याची भाषा करणारा. संपूर्ण भारतात "हमे चाहीये आझादी" च्या घोषणा देत फिरत होता. भारताचे लेलीनग्राम म्हणून ओळख असलेल्या बेगुसराय मधून कम्युनिस्ट पक्षाकडून उभा होता. पण लोकांना हा देश तोडणारा "मसीहा" "प्रेषित" आवडला नाही. त्याला निवडणुकीत करवून आपली Phd पूर्ण करण्यास वापस पाठवले. त्या मुळे या निवडणुकीत याचाही फुगा फुटला.

                    या निवडणुकीत करिश्मा चालला तो फक्त मोदी यांचा, त्यांनी ज्या ज्या मतदारसंघात सभा घेतली त्यात भाजपचे उमेदवार जिंकून आले. त्या मुळे असेल कदाचित पण या चौघांना कोणी कितीही हुशार विद्यार्थी म्हंटले असले तरी यांचा पेपर मात्र खूपच कठीण गेला, कारण अभ्यास पूर्ण नव्हता हे मात्र नक्की.

टिप्पण्या