राजकारणाचा चेहरा बदलणारी निवडणूक

              "एक्झिट पोल" मध्ये भाजप चे अध्यक्ष अमित शहा यांच्या म्हणण्या नुसार भाजप + NDA यांना 300 + जागा दाखवल्या मुळे भाजप प्रेमी जनतेमध्ये आनंदाची लाट आली आहे पण!

            काल फक्त "एक्झिट पोल" दाखवले आहेत रे बाबांनो. अजून "निक्काल" लागायचा आहे. 

          23 मे पर्यंत धीर धरा......उगाच दुसऱ्याकरता "बारनॉल" घ्याल आणि स्वतःलाच लावावे लागेल. 

                 याचा अर्थ हा नाही की भाजप प्रणित NDA सत्तेत येणार नाही किंवा नरेंद्र मोदी सत्तेत येणार नाही. पण इतक्या सहजपणे येतील असे मला वाटत नाही. कारण निवडणुकीच्या आधीचे वातावरण संमिश्र होते, त्या प्रमाणे निकाल पण संमिश्र लागू शकतात. 

                     हे खरे की तथाकथित महागठबंधन पेक्षा NDA ने स्वतःला निवडणुकीच्या बरेच आधी एकत्र आले, आपले सगळे वाद विसरत जागा वाटपातील घोळ संपवले! हे पण बरोबर आहे की भाजप हा अजूनही संघटनात्मक पक्ष असल्यामुळे त्याच्या कडे कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी आहे आणि त्याच बळावर त्यांचे निवडणूक नियोजन हे विरोधी पक्षा पेक्षा अधिक सरस आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम चांगला निवडणूक निकाल लागण्यात होऊ शकतो. 

                     पण याच बरोबर एक लक्षात घ्या की निवडणूक जिंकण्यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे "मतदार"! आणि कोणत्याही पद्धतीत "मतदार" हा मूर्ख नसतो, त्याला कधीच कोणीही गृहीत धरून चालू नये. राजकारण्यांनी गेल्या काही वर्षांत समाजात दुही पसरवण्याचे काम इमाने इतबारे केले आहे. हा एक सुप्त राक्षस आहे, तो कधी, कसा आणि कोणच्या कामात येईल हे सांगणे खरेच कठीण! गुजरात विधानसभा निवडणुकीत आपण "पटेल आरक्षणाच्या" रूपाने तो बघितला आणि त्याच्या जागे होण्याचे परिणाम पण! असे अनेक राक्षस काँग्रेसने, समाजवादी मंडळींनी, डाव्यांनी आणि क्षेत्रीय अस्मितावादी पक्षांनी तयार करून ठेवले आहेत. ज्याचा वापर ते वेळोवेळी करतात.

                       काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार त्यांना नरेंद्र मोदी यांच्या "प्रतिमा भंजनात" जास्त रस होता, आणि ते या निवडणूक प्रचारात सत्यत्याने त्या "प्रतिमा भंजनाचे" जास्त प्रयत्न करत होते. सोबतच "हिंदू आतंकवाद", "राष्ट्रवाद", "असहिष्णुता", "अभिव्यक्ती स्वातंत्र्य" या सगळ्या बाबी होत्याच. अर्थात त्याला यश किती आले ते निकालानंतरच कळेल. 

                      पण "एक्झिट पोल" नुसार निकाल खरेच आले तर मात्र विरोधकांना आपले पारंपरिक राजकारण मोठ्या प्रमाणात बदलावे लागेल. तसेही गेल्या पाच वर्षात राजकारणाचा "धार्मिक" अक्ष नरेंद्र मोदी यांनी यशस्वीरीत्या बदलवला आहे यात दुमत नाही. तरी अजून बरेच मुद्दे बाकी आहेत. मुख्य मुद्दा आहे कोणाचा "राष्ट्रवाद" खरा आहे याचा! या मुद्याच्या उत्तरानंतरच बाकीचे मुद्दे आपोआपच निकालात निघणार आहेत. 

                       या निवडणुकीत "विकासाचा मुद्दा" गायब झाला, नाही तर तो केल्या गेला दोन्ही कडून! कारण खरा विकास म्हणजे काय? हेच अजून आपल्या राजकारण्यांना कळले नाहीये हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. त्याच मुळे गेल्या वेळेस सारखे भाजप ने पण कोणतेही विकासाचे पक्के प्रारूप निवडणुकीत दिले नाही, तर काँग्रेस पण बिनबुडाच्या "न्याय योजनेचीच" जाहिरात करत राहिले.

                 23 मे चे निकाल काहीही लागो, पण या निकालाचे पडसाद भारताच्या राजकारणात अनेक वर्षे पडत राहतील हे नक्की. 

                पण या "एक्झिट पोल" ने एका घोषणेवर शिक्कामोर्तब नक्कीच केले आहे, ते म्हणजे "आयेगा तो मोदी ही!"

टिप्पण्या