आज नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्या वर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यावर काँग्रेसला खरे तर पळता भुई थोडी झाली आहे.
आज कॉंग्रेस "लोकसभा निवडणूक 2019 ची आहे, आजच्या परिस्थितीवर ही निवडणूक लढवली जावी." असले वक्तव्य करत आहे. तसा विचार करता हे वक्तव्य एकदम योग्यच!
पण निदान काँग्रेसने हे वक्तव्य करतांना निवडणुकीला या वळणावर आणण्यास आपण पण तितकेच जवाबदार आहोत याची जाणीव ठेवली आहे का?
2014 ला नरेंद्र मोदी यांच्या उदया बरोबरच काँग्रेस मधील "सुवर्ण काळात" जगणाऱ्या नेत्या-कार्यकर्त्यांचा पण उदय झाला. मोदींनी कोणतीही गोष्ट केली तरी ती नेहरू-इंदिरा-राजीव-मनमोहनसिंग यांनी अगोदरच केले असल्याचा साक्षात्कार त्यांना होत होता.
मग जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकन काँग्रेसला न केलेले संबोधन पण केले असल्याचा खोटेपणा या लोकांनी केला.
नेहरू तर भारताचे नवीन "परमेश्वरच"!
आज भारतात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त नेहरूंच्याच "चमत्काराने" ! हे पटवण्याचा आटापिटा गेले पाच वर्षे याच लोकांकडून सुरू होता. हा आटापिटा इतक्या हास्यास्पद परिस्थितीत पोहचला की, इस्रोच्या शास्त्रज्ञानी आज पाठवलेल्या उपग्रहाचे आणि सोडलेल्या क्षेपणास्त्राचे श्रेय पण नेहरूंना दिल्या गेले.
नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या "डिजिटल इंडिया" चे श्रेय राजीव गांधी यांनी आणलेल्या "संगणकाला" दिल्या गेले. पण खरेच राजीव गांधी यांनी संगणक भारतात आणला? की त्यांनी त्या काळात नवजात असलेल्या होणाऱ्या भारतीय संगणक विकासाला नख लावले हा पण प्रश्न आहेच!
भारताने पाकिस्थान विरोधात केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक" रुपात नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या कणखर भूमिका नाकारत 1971 ची इंदिरा गांधी यांची बांगलादेश युद्धाची भूमिका किती चांगली होती, याचे गोडवे गाणारे पण हेच काँग्रेसी होते, पण यांना नेमका 1965 साली लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वात भारतीय सेनेने मिळवलेल्या विजयाचा मात्र विसर पडला.
भारताची अर्थव्यवस्था जगात सहाव्या स्थानावर पोहचल्यावर पण त्याचे श्रेय मनमोहनसिंग यांना द्यायला काँग्रेस विसरली नव्हती, या दाव्यात तर हास्यास्पद परिस्थिती ही होती की, 90 च्या दशकात भारताला "मुक्त अर्थव्यवस्थेचे" दार उघडून द्यायला अर्थमंत्री म्हणून मनमोहनसिंग यांचे कर्तृत्व असले तरी त्याचे खरे श्रेय पंतप्रधान म्हणून नरसिंहराव यांचे होते.
पण फक्त नेहरू-गांधी घराणेच भारताचे खरे उद्धारकर्ते हे दाखवण्याच्या नादा पेक्षापण आताचे काँग्रेसचे नेतृत्व त्या तोडीचे नाही हे लपवणे हा त्या मागचा उद्देश.
पण, देशाच्या वाटचालीत राज्यकर्त्यांनी केलेल्या चांगल्या कामांचा जसा वाटा असतो, तितकाच वाटा केलेल्या वाईट कामाचा पण असतो हे काँग्रेसी विसरले.
पण आधुनिक युगात आणि "डिजिटल क्रांतीत" भारताचे नागरिक इंटरनेट वरून काँग्रेसच्या दाव्याची पडताळणी करत होते, तेव्हाच काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराची आणि एय्याशीची प्रकरण पण एकामागून एक या मायाजालावर यायला लागली.
मग खुद्द "भारत भाग्य विधाता" नेहरूंच्या काळात झालेल्या जीप खरेदी भ्रष्टाचाराच्या प्रकरणा पासून झालेली सुरवात इंदिरा गांधी यांच्या नगरवला प्रकरणा सोबत, राजीव गांधी यांच्या बोफोर्सला सोबत घेत मनमोहनसिंग यांच्या काळातील कोटीच्या कोटी उड्डाणाच्या भ्रष्टाचारा पर्यंत येऊन थांबली.
राहिला प्रश्न विकासाचा, गरिबीच्या उच्चाटनाचा....खरे तर काँग्रेसी प्रेश्या पत्रकार तर सरकारच्या प्रत्येक दाव्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष देत होते, त्या दाव्याची चिरफाड करत होते. उदाहरणच द्यायचे झाले तर मोदी सरकारने प्रत्येक गावात वीज पोहचवण्याचा दाव्याला खोडायला त्या त्या गावात आपल्या कॅमेऱ्या सोबत ही लोक पोहचली होती आणि काय समोर आले? तर 70 वर्षा नंतर पण भारतातील आधुनिक शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावर पण आपण वीज पोहचवु शकलो नव्हतो.
गरिबांसाठीच्या उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना या सगळ्यांचीच चिरफाड गेली पाच वर्षे भारतीय मीडिया ने नक्कीच केली, पण या मीडियाने महत्वाची गोष्ट केली नाही ती म्हणजे तुलना, पंतप्रधान आवास योजनेची तुलना मग इंदिरा आवास योजनेशी झाली नाही, कारण तसे केले असते तर ही प्रेश्या मीडिया तोंडावर आपटली असती.
राहुल गांधी हे कितीही राफेल मधील तथाकथित भ्रष्टाचारावर ओरडत असले तरी अजूनही त्या करता आवश्यक पुरावे मात्र जनतेसमोर ठेवण्यात यशस्वी झाले नाहीत हे पण सत्य आहे.
बाकी "गोडसेने" केलेला खून काहीही संबंध नसतांना जर आजही भाजप आणि संघाला बदनाम करण्यास वापरल्या जात असेल तर पंजाब आतंकवाद वाढण्यास आणि 1984 च्या शीख दंगली मध्ये तर काँग्रेस प्रत्यक्ष सहभागी असल्यामुळे ठपका तर येणारच.
बाकी तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करता हा म्हणत्वांचा प्रश्न आहे. एक पंतप्रधान म्हणून देशाची युद्धनौका वापरता येतेच यात दुमत नाही, पण आपल्या सुट्टीच्या काळात ती वापरावी का? हा नैतिकतेचा प्रश्न आहे. निवृत्त नौदल अधिकारी रामदास यांनी कितीही सांगितले की हा अधिकृत दौरा होता, तरी आजच्या माहितीच्या स्फोटात त्यांच्या या दाव्याचे खंडन करणारे पण खंडीभर अधिकारी नक्कीच आहेत, सोबतच तत्कालीन काळातील लेख या दाव्यातील हवा काढत आहे हे पण सत्य आहेच ना!
खरे तर राहुल गांधी यांनी पहिले काँग्रेसच्या आजपर्यंतच्या आपल्या पक्षाच्या वाटचालीचा अभ्यास करायला हवा होता, तो न केल्यामुळेच आज काँग्रेसचे वस्त्रहरण होत आहे. तसेच काँग्रेस आता आपल्या गांधी घराण्याच्या व्यक्तिपूजक गुलामगिरीतुन बाहेर पडेल ही आशा पण आता लोप पावत चालली आहे.
भारतीय जनता आता या गुलामगिरीला पत्करते की या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडते यातच भारताच्या सक्षम लोकशाहीचे भवितव्य आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा