नरेंद्र मोदी सरकार 2.0 - काही चर्चित चेहरे

                 "मै नरेंद्र दामोदरदास मोदी...." ३० मे २०१९ रोजी हे शब्द पुन्हा राष्ट्रपती भवनात ऐकायला मिळाले आणि भारतात पहिल्यांदा गैर काँग्रेसी सरकारने आपला पहिला कार्यकाळ पुरा करत लगोलग दुसऱ्यांदा आपले सरकार स्थापन केले. 

                           देशाला मोदी यांच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल याची बरीच उत्सुकता होती. गेल्या मंत्रिमंडळातील अनेक चेहरे या वेळेस दिसतील की नाही दिसणार? नवीन कोण येणार? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर आता मिळाली आहेत. तरी एक मोठा प्रश्न कायम आहेच....कोणते खाते मिळणार?

                        असो मात्र जुन्या मंत्रिमंडळात असलेले काही चेहरे जरी कायम असले तरी आता त्या चेहऱ्यामगिल संदर्भ नक्कीच बदलले आहे. 
                        अमित शहा भाजपचे अध्यक्ष! या निवडणुकीत गांधी नगर वरून प्रचंड बहुमताने निवडून आले आहे. गेल्या वेळेस त्यांना राज्यसभेतून खासदार बनावे लागले होते. या वेळेस थेट लोकांनी निवडून दिले. या सरकार मधील सर्वात चर्चित चेहरा हाच राहील! त्यांना कोणते खाते दिले जाते या वर सगळ्यांची बारीक नजर राहील. मात्र त्यांचे आक्रमक राजकारण बघता त्यांच्या हातात "गृहखाते" नको म्हणून विरोधक देवाला साकडे नक्कीच घालत असणार.

                       गेल्या सरकार मधील दोन चेहरे या सरकार मध्ये कायम राहिले ते त्यांच्या कामामुळे पहिले म्हणजे नितीन गडकरी, दुसरा निर्मला सीतारामण! 
                      नितीन गडकरी यांच्या वर गेल्या सरकारमध्ये त्यांच्या कामाचा उरक बघून एक एक खाते वाढवण्यात आले. सार्वजनिक बांधकाम पासून सुरू झालेला प्रवास जहजराणी मंत्रालय, गंगा सफाई मंत्रालय करत पूर्ण ताकदीनिशी भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचा चेहरा मोहरा बदलण्यास त्यांनी सुरवात केली. या वेळेस त्या बदलाचे मधुर फळे आपल्याला खायला मिळतील. 
                        मनोहर परिकर सारखा कणखर आणि साधा माणूस भारताचा संरक्षण मंत्री म्हणून जबरदस्त छाप पाडून होता. त्यांना राजकीय कारणाने पुन्हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पद घ्यावे लागल्याने त्या जागी निर्मला सीतारामण यांची वर्णी संरक्षण मंत्री म्हणून लागली होती. मात्र यांनी तितक्याच कणखरपणे ते पद सांभाळत भारताच्या स्त्री शक्तीची चुणूक जगाला दाखवली. विरोधकांच्या "राफेल करारा" वरील आरोपांना त्यांच्याच भाषेत संसद भवनात आणि रस्त्यावर देत या बाईंनी किल्ला चांगलाच लढवला. 
               स्मृती इराणी गेल्या सरकार मध्ये राज्य सभेतून सरकार मध्ये मंत्री म्हणून वर्णी लागलेली एक वादग्रस्त ठरलेल व्यक्तिमत्व! गेल्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त वयक्तिक हल्ले कोणावर झाले असतील तर ते स्मृती इराणी यांच्यावर. कारण साफ होते गांधी परिवाराची जहागिर झालेल्या अमेठी मतदार संघात काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधी यांना आव्हान देणारी महिला होती ती! त्या मुळे त्याच्या मागे काँग्रेस हात धुवून लागली होती. मात्र या बाईंनी पाय मागे घेतले नाही. प्रत्येकाला उत्तर देत, अमेठीची लढाई सुरू ठेवली आणि राहुल गांधी यांना हरवत स्मृती इराणी या जायंट किलर ठरल्या आहेत. 

                    या सरकारमध्ये स्वास्थ कारणाने अरुण जेटली आणि परराष्ट्र मंत्री म्हणून आपली कारकीर्द गाजवलेल्या सुषमा स्वराज या मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे. पण काही जुने चेहरे काही नवीन चेहरे सोबत घेत नरेंद्र मोदी यांनी आपल्या 2.0 सरकारची सुरवात केली आहे. नवीन नावातील दोन नाव पण आश्चर्याचा सुखद धक्का देणारी आहेत. ती म्हणजे एस. जयशंकर आणि प्रताप चंद्र सारंगी!
                एस. जयशंकर म्हणजे सुब्रह्मणीयम जयशंकर माजी परराष्ट्रीय सचिव म्हणून आपल्याला माहीत आहेतच. पण एस. जयशंकर या मंत्रिमंडळातील सगळ्यात आश्चर्यकारक चेहरा असेल हे नक्की! नरेंद्र मोदी यांच्या गाजलेल्या आणि पूर्णतः यशस्वी विदेश दौऱ्या मागील चेहरा! भारतीय परराष्ट्र सेवेत ३६ वर्षे आपली सेवा दिल्या नंतर याच २०१९ मध्ये निवृत्त झाले होते. याच वर्षी त्यांना सरकारने "पद्मश्री" देऊ केली होती. 

नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीचा पाया तयार करण्यात एस. जयशंकर यांचा मोठा हात होता. त्याच मुळे असेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या मार्जितले बनले.
                आपल्या भारतीय परराष्ट्र सेवे मध्ये काम करतांना सगळ्यात जास्त वेळ त्यांनी चीन मध्ये काढला आहे. त्याच मुळे चीन सोबत झालेल्या डोकलाम विवाद सोडवण्यात यांची मोठी भूमिका राहिली आहे. अमेरिकेसोबत झालेल्या "इंडो न्यूक्लिअर डील" मध्ये पण यांनी महत्वाची भूमिका एस. जयशंकर यांनी निभावली होती. चीन सोबतच अमेरिका, रशिया आणि आसियान रीजन मध्ये त्यांनी विशेष कूटनितीक सेवा दिली आहे. माजी संरक्षणमंत्री आणि आता पुन्हा मंत्री पदाची शपथ निर्मला सीतारमण यांच्या नंतर एस. जयशंकर या मंत्री मंडळातील दुसरे असे मंत्री असतील ज्यांनी प्रसिद्ध JNU मधून शिक्षण घेतले!
                       एक झोपडी, एका पेटीत मावतील इतके कपडे आणि एक सायकल इतकी संपत्ती असलेले प्रताप चंद्र सारंगी यांना त्याच्या राज्यातील जनता "ओरिसातील मोदी" म्हणून ओळखतात.

बालासोर, ओरिसा येथून लोकसभा निवडणूक जिंकणारे, भारतातील सगळ्यात गरीब खासदार प्रताप चंद्र सारंगी. त्याची छायाचित्रे बघूनच लक्षात येईल की माणूस एकदम सामान्य आहे.

                      भारतीय लोकशाहीचे हेच सौन्दर्य आहे की इथे गरीब असो की श्रीमंत आपल्या कर्तृत्वाने उच्च पदावर जातोच आणि सामन्याचे प्रश्न इमानदारीत सोडवायचा प्रयत्न केला तर त्याच्या मागे जनता तशीच उभी राहते जशी आज सामान्य गरीब कुटुंबातून आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या मागे उभी आहे! 

                    श्री प्रताप चंद्र सारंगी यांचा जन्म ४ जानेवारी १९५५ चा. पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर यांच्या मनात पण संन्यास घ्यायचे आले. रामकृष्ण मठात राबता होतच. पण संन्यास घ्यायच्या इच्छेने कलकत्ता स्थित रामकृष्ण मठाच्या मुख्यालयात बेलूर येथे ते गेले आणि तेथील साधूंसमोर आपली इच्छा प्रगट केली. पण प्रताप चंद्र सारंगी यांची पारिवारिक स्थिती माहीत करून घेतांना, यांच्या विधवा आई बद्दल माहिती मिळाल्याने साधूंनी त्यांना पहिले आईची सेवा कर आणि नंतर इकडे ये म्हणून वापस पाठवले. अर्थात मनात अगोदरच विरक्ती असल्यामुळे वापस आल्यावर संसारात न पडता आईची सेवा करता करता समाज सेवा पण करू लागले. मयूरभंज या ओरिसातील गरीब आदिवासी क्षेत्रात त्यांनी शाळा उघडल्या, आदिवासी क्षेत्रातील समस्या सोडवणे हे त्यांचे मुख्य काम झाले. 
                  त्याच्या समाज सेवेचे फळ म्हणून २००४ ते  २०१४ असे दोन टर्म ते ओरिसा विधानसभेचे सदस्य राहिले. २०१४ मध्ये त्यांना पहिल्यांदा लोकसभेचे तिकीट पक्षा तर्फे देण्यात आले. पण तत्कालीन "मोदी लाटेचा" फायदा काही त्यांना झाला नाही आणि ते पडले. पण या निवडणुकीत त्यांनी बिजू जनता दलाच्या रवींद्र कुमार जेना यांचा १२,९५६ मतांनी पराभव केला. प्रताप चंद्र भाजप च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य पण आहे.

                    हे नरेंद्र मोदी 2.0 मंत्रिमंडळातील काही चर्चित चेहरे! येणाऱ्या काळात यांची कसोटी लागेल. त्यांना त्यांच्या भावी वाटचाली करता शुभेच्छा देऊ. या व्यतिरिक्त पण अनेक चेहरे मंत्रिमंडळात नव्याने किंवा जुनेच पुन्हा असे आहेत. पण वरील नवी नावे जास्त नवीन म्हणून आणि जुनी काही नावे त्यांनी गाजवलेली त्याची जुनी कारकीर्द म्हणून दिली आहे. खाते वाटप झाल्यावर पुन्हा प्रकाश टाकुच अजून काही नवीन नावांवर.

टिप्पण्या