अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधान रक्षण केवळ बाताच


                   कालच सोलापूरचे कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसैय्या आदाम यांना पंतप्रधान यांची स्तुती केली म्हणून पक्षाच्या केंद्रीय कमिटीतुन निलंबित केल्याची बातमी डाव्या विचारांच्या "अभिव्यक्ती स्वातंत्र्या" विषयी किती प्रेम आहे ते दाखवून गेली.

                        या बातमीची शाई वाळत नाही, त्याच्या आधी अजून एक "संविधान रक्षक" आणि "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे" पुरस्कर्ते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना "जो मला ट्रोल करेल त्याला बदडून काढा" असे आवाहन केले.

                       स्वतःला "लोकशाहीवादी", "संविधान रक्षक", आणि "अभिव्यक्तीचे स्वातंत्र्याचे" मोठे पुरस्कर्ते समजणाऱ्या लोकांना अशी भाषा शोभते? राज ठाकरे यांच्या मनसे कार्यकत्यांनी अशी "ठोकपिट" काही ठिकाणी केली, समाज माध्यमांवर त्या विरोधात आवाज नक्कीच वाढला, पण राज ठाकरे यांना जास्त दोष नाही देता येणार, कारण राज ठाकरे ज्या मुशीतून तयार झाले आहेत तिथे मुळातच "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे" वावडे! आणि ते त्यांनी कधीच लपवून ठेवले नाही, कारण कितीही काही असले तरी ते "पाखंड" कधी त्यांना जमले नाही. राज ठाकरे यांचे हे वागणे चांगले असो की वाईट पण त्यांनी नेहमीच खुले आम "खळ खटक" ची भाषा वापरली आणि प्रत्यक्षात पण आणली.

                    पण डाव्या विचारांचा कचरा ज्यांच्या डोक्यात आहे त्यांना "पाखंड" शिवाय दुसरे काही येत नाही. एकीकडे गरीब - आदिवासी यांच्या कल्याणा करता लढा देतो आहे असे मुंबई - पुण्या सारख्या शहरात बोलायचे, आणि सहानुभूती कमवत त्या जोरावर पैसे आणि माणसे जमवायची आणि इकडे छत्तीसगड-गडचिरोलीत त्याच पैशाने घेतलेल्या बंदुकीतून त्याच गरीब-आदिवासी जनतेवर गोळ्या चालवत त्यांची हत्या करायची ही यांची सवय, दुसऱ्याला व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान रक्षण, न्याय याची शिकवण देत स्वतः मात्र नेमके त्या उलट वागणूक करायची याची ख्याती!

                  दुसऱ्यावर आगा पिछा नसलेले आरोप करायचे, हे हवेत केलेले आरोप असल्यामुळे कोणी यांना पुरावे मागितले की मग "ट्रोल" म्हणून ओरडत आकाश पाताळ एक करणे हाच यांचा धंदा!

                    पहिले काय किंवा आता ही काय, वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर यांच्याच विचारांचे रेमे बसलेले असल्यामुळे यांच्या विरुद्ध विचारांना प्रसिद्धीचं देत नाही, आणि यांना अडचणीचे प्रश्न पण विचारत नाही.

                     पण जेव्हा पासून समाज मध्यम सामान्य सारखे सशक्त आणि सगळ्यांसाठी खुले असलेले व्यासपीठ सामान्य लोकांच्या हाती आले तेव्हा पासून मात्र यांना प्रश्न विचारले जाऊ लागले, यांच्या बोलण्या मधील आणि वागण्या मधील अंतर मोजल्या जाऊ लागले, थोडक्यात काय तर यांच्या "दांभिकपणावर" नेमके बोट ठेवल्या जाऊ लागले, आरोप केले की पुरावे मागितल्या जाऊ लागले, पुरावे नाही देता आले तर त्या आरोपांची खिल्ली उडवल्या जाऊ लागली आणि नेमके हेच यांना नको होते. मग जे प्रश्न विचारतात त्यांना "ट्रोल" म्हणून संबोधले गेले, पण तरी लोक चूप बसले नाही, तेव्हा यांचा लोकशाहीवादी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वादी चेहऱ्या वरचा बुरखा आज मात्र टरा टरा फाटला, अर्थात त्याला "भोक" पहिलेच पडली होती!

                   प्रकाश आंबेडकर पण याच माळेतील मणी! महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा दंगली नंतर भलतेच फर्मात आले. या दंगलीत म्हणे "भिडे गुरुजी" चा हात आहे, ते प्रत्यक्ष तिथे हजर होते, ते प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होते, असले आरोप करत पोलिसांवर, प्रशासनावर, सरकारवर प्रचंड दबाव आणला गेला, पण पुरावे मात्र देता आले नाही, इतकेच नाही तर या दंगलीच्या चौकशी साठी नेमण्यात आलेल्या आयोगासमोर पण त्यांना आजपर्यंत केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार करता आला नाही, कारण पुरावे नाही!, मग म्हणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "संविधानाच्या चौकटीत" बसवा, त्यांची ही मागणी तर आर्तक्य अशीच होती, कारण आपल्या जन्मा पासून तीन वेळेला बंदी आलेली ही संघटना त्या बंदीतून व्यवस्थित पणे आणि भारताच्या सनविधानीक न्यायव्यवस्थे मधून छाननी होऊन बाहेर पडली आहे. ही संघटना कोणत्याही पद्धतीने "संविधानाच्या चौकटीत" बसणारी नसती तर या संघटने वरची बंदी न्यायालयाने उठवली असती का? इतका साधा सरळ प्रश्न यांना पडला नाही, किंबहुना त्यांना हा विचार करायचा नव्हता कारण या प्रश्नाचे भांडवल करत आगामी निवडणुकीसाठी यांना काँग्रेसला आघाडीत घेण्यासाठी फक्त "ब्लॅक मेल" करायचे होते!

                        शेवटी काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी या विषयावर प्रस्ताव तयार करून आणण्याचे आवाहन करण्यात आले, त्या आवाहनाला प्रतिसाद देत आज यांच्या पक्षाचे नेते चव्हाण-आव्हाड दुकली सोबत जागा वाटपाचा तिढा सोडवायला बसले.

                       आता लोक प्रश्न विचारतील की, "संघाला संविधानाच्या चौकटीत बसवायचा प्रस्तावावर काँग्रेसची सही झाली का? नक्की काय प्रस्ताव आहे आम्हाला दाखवा" म्हणून त्यांनी पहिलेच "ट्रोल" करणार्यांना ठोका असा आदेश कार्यकर्त्यांना दिला.

                   एकूण काय तर यांना प्रेम फक्त सत्तेचे आहे, हे रक्षक फक्त स्वतःच्या खुर्चीचे आहे बाकी कोणाचे नाही!

                    खरे तर वृत्तवाहिनीवर पत्रकाराला अर्वाच्य शिव्या देतांना, कोणावर काहीही तथ्यहीन आरोप करतांना यांना पूर्ण "अभिव्यक्ती स्वातंत्र्य" असते, मात्र वैचारिक विरोधकांना मात्र प्रश्न विचारलेला यांना चालत नाही, आणि हे मात्र "लोकशाही वादी" म्हणून स्वतःची आरती ओवाळून घेणार!

                  आपण किती दिवस या "दांभिक" लोकांना डोक्यावर बसवणार आहोत? हाच नेमका प्रश्न आहे.

टिप्पण्या