गरज "मिशन शक्तीची"

"स्टार वॉर" हे नाव आपण कशा करता ऐकले आहे हे महत्त्वाचे! कारण या नावाचा हॉलिवूड चित्रपट चांगलाच गाजला आणि त्याच्या अनेक आवृत्या पण निघाल्या! पण "स्टार वॉर" हे नाव गाजले ते अमेरिकेचे ४० वे राष्ट्रपती रोनाल्ड रिगन यांनी मांडलेल्या संकल्पनेने.
मुळात हॉलिवूड कलाकार असलेले रोनाल्ड रिगन यांच्या १९८१ ते १९८९ या काळात ते अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष होते. सोवियत रशिया आणि अमेरिका यांच्यातील "शीतयुद्ध" अतिशय भरात होते. नवीन संहारक शस्त्र बनवली जात होती. खंडीय, आंतरखंडीय नवीन नवीन क्षेपणास्त्र जास्त पल्ला, जास्त वेगवान बनवण्याचा प्रयत्न केला जात होता.
याला पार्श्वभूमी होती १९६२ साली घडलेल्या "क्यूबन मिसाईल क्रायसेस" ची. सोवियत रशियाने आपला दक्षिण अमेरिकेतील मित्र देश क्युबा या देशात आपली अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे तैनात करण्याचा प्रयत्न केला होता. ज्याला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांनी जोरदार विरोध करत अमेरीके विरोधातील सोवियत रशियाची युद्धाची घोषणा असे म्हणत प्रतिहल्ला करायची तयारी सुरू केली होती. सोवियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रिचेव्ह पण मागे हटायला तयार नव्हते. जग अणू युद्धाच्या दरवाज्यात पोहचले होते. पण संयुक्त राष्ट्र संघाचे प्रयत्न आणि दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांनी घेतलेले एक पाऊल मागे या मुळे हे प्रकरण मिटले

पण धोका कायम होता, कारण क्षेपणास्त्राचा वेग आणि पल्ला वाढला होता. रशियाने त्याच्या भूमी वरून क्षेपणास्त्र डागले तर काय करायचे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला. या वर उत्तर म्हणून अमेरिकन शस्त्रज्ञानी एक संकल्पना आणली ती म्हणजे "स्ट्राटेटीक डिफेन्स इनेशेटीव्ह" (SDI) आणि "नॅशनल मिसाईल डिफेन्स" (NMD) या दोन्ही संकल्पनेला रोनाल्ड रिगन यांनी नाव दिले "स्टार वॉर" !

यात शत्रू पक्षाने क्षेपणास्त्र सोडल्यावर त्याचा वेगावर लक्ष ठेवत त्याला आपल्या हद्दीत येण्यापूर्वीच आपल्या क्षेपणास्त्राने भेदणे हा जसा कार्यक्रम होता तसाच आपले क्षेपणास्त्र शत्रू भूमीवर योग्य ठिकाणी, योग्य भेद करेल हे पण सुनिश्चित करायचे होते. या करता अनेक उपग्रह आकाशात सोडणे, तसेच शत्रूच्या संचार उपग्रहाला पाडणे हे पण उद्दिष्ठ होते. त्याच नुसार अमेरिकेने १९८० च्या दशकात आपल्या उपग्रहाला आपल्याच क्षेपणास्त्राने पाडत, अंतराळ युद्धाची झलक जगाला दाखवली.

या शस्त्र स्पर्धेत सोवियत रशिया कसा मागे राहणार होता? त्यानेही प्रचंड पैसा ओतत उपग्रह पडायचे तंत्रज्ञान विकसित केले. पण या सगळ्यांवर प्रचंड पैसा खर्च झाल्याने सोवियत रशिया कोसळला! रोनाल्ड रेगन यांच्या कार्यकाळातच ही घटना घडली आणि हा "स्टार वॉर" कार्यक्रम पण अमेरिकेने बंद केला.

पण ११ जानेवारी २००७ ला चीनने आपलाच आयुष्यमान संपलेला अंतराळातील एक उपग्रह आपल्याच क्षेपणास्त्राने पाडत जगाला आश्चर्याचा धक्का तर दिलाच, पण एका नव्या युद्धाला तोंड फोडले.

नव्या जमान्यातील युद्ध जितके जमिनीवर आणि अवकाशात लढल्या जातील तितकेच अंतराळात पण लढल्या जाईल याची जाणीव नव्याने चीनच्या उद्योगाने झाली.
नव्या युगात जग उपग्रहावर चालते, तुमचे फोन असो की उडणारे विमान असो, तुम्ही शहरात फिरतांना जो रस्ता शोधतांना वापरता ते GPS असो, देशाचा हवामानाचा अंदाज असो, अश्या अनेक कामा करता आपण उपग्रहावर अवलंबून आहोत. शत्रू देशावर हेरगिरी करण्यासाठी पण हेच उपग्रह काम करतात, तसेच शत्रू देशाने एखादे क्षेपणास्त्र डागले तर त्याचा मागोवा पण हाच उपग्रह आपल्याला देत आपले रक्षण करत असतो, मग कोणी तोच उपग्रह पडला तर किती गहजब होईल याची कल्पना तुम्हाला येऊ शकते.
दोनच उदाहरण देतो, आपण दुसऱ्या पोखरण अणू चाचणीच्या वेळेस आपल्यावर अमेरिकन उपग्रह सतत लक्ष ठेऊन होते, त्यांना गुंगारा देत आपल्या शास्त्रज्ञानी अणूचाचणी घडवलीच. आणि दुसरे म्हणजे कारगिल युद्धाच्या वेळेस अमेरिकेने त्यांचे GPS आपल्याला लष्करी कामाकरता वापरू द्यायचे नाकारले, त्या मुळे अनेक दिवस युद्ध रेंगाळले! या वर मात करायला म्हणून भारतीयांनी स्वतःचे "भुवन" ही नारिगेशन सॅटेलाईट सिस्टीम उभी केली.

पण समजा हीच उभी केलेली सिस्टीम चीनने उध्वस्त केली तर? ही भीती जशी आपल्याला आहे तशी ती अमेरिकेला पण आहे. म्हणून मग डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रध्यक्ष बनल्यावर "स्पेस फोर्स" ची कल्पना पुढे रेटली. या फोर्स मध्ये लष्करी तसेच वायुसेनेने अधिकारी एकत्रित काम करतील, या करता वायुसेनेचे पण दोन भाग केल्या जातील असा प्रस्ताव आहे.

पण रशियाने आधीच या वर काम सुरू केले आहे. या लष्करी कार्यक्रमाला त्याने "एरोस्पेस फोर्सेस" असे नाव दिले आहे. चीनने ही "स्पेस टयाक्टिक फोर्स" तयार केली असून "उपग्रह पाडणे" त्याचाच एक भाग होता. अमेरिकेतील रक्षातज्ञ डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे उभे आहे ते याच कारणाने.

भारतावर पण याचा वाईट प्रभाव पडू शकतो. चीन हा भारताचा स्वतः तर शत्रू आहेच, पण पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्थानचा मित्र पण! आता तर पाकिस्थान मध्ये चीनने प्रचंड आर्थिक गुंतवणूक केली आहे. उद्या काही कारणाने पाकिस्थानने भारताची आगळीक केली आणि युद्ध झाले आणि चीनने प्रत्यक्ष सैन्य न पाठवता फक्त आपले उपग्रह पाडले तरी आपली प्रचंड हानी होऊ शकते. भारत आज जगात नवीन अंतराळ शक्ती म्हणून समोर येत असतांनाच आपल्या अंतराळातील संपत्तीचे रक्षण करण्याची जवाबदारी पण भारताची स्वतःचीच आहे, आणि त्या करता भारतीय सक्षम आहे हेच आज "मिशन शक्ती" ने दाखवून दिले. या निमित्याने आपण पण त्या तीन देशाच्या "स्पेस फोर्सेस" मध्ये दाखल झालो आहोत. आपली इच्छा असो किंवा नसो पण स्वसंरक्षणा साठी का होईना आपल्याला हे पाऊल उचलणे अत्यावश्यक होते, आणि ते आपण उचलले!

आजच्या "मिशन शक्तीच्या" यशाचे श्रेय निर्विवाद पणे DRDO आणि इसरो च्या शास्त्रज्ञानचे आहे. पण त्याच बरोबर ही उडी मारतांना त्यांच्या मागे खंबीर पणे उभ्या राहणाऱ्या सरकारचे पण आहे. कारण याला लागणार पैसा तसेच, या विरोधात येणाऱ्या आंतराष्ट्रीय दबावाला तोंड सरकारलाच द्यायचे आहे आणि हे सरकार हे कामही सक्षम पणे करेलच!

बाकी विरोधकांना कितीही रडू द्या, कोणालाही श्रेय देऊ द्या, मात्र अवकाश प्राप्त DRDO प्रमुख डॉ. व्ही. के. सारस्वत जे म्हणाले ते लक्षात ठेवा आणि मग श्रेय नक्की कोणाला द्यायचे ते ठरवा, ANI चे हे दोन ट्विट फार महत्वाचे आहेत.

-वरील परिस्थिती दोन सरकार मधील फरक दाखवण्यास पुरेसा

टिप्पण्या