काँग्रेस फक्त "नेहरू-गांधी" घरण्यालाच मान देते

                    लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाचे एकमेकांच्या चुकांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष आहे. उत्तर प्रदेशातील राम नगर येथे प्रचारासाठी गेलेल्या कॉंग्रेसच्या स्टार नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांच्या हातून पण अशीच चूक झाली. रामनगर येथील एका चौकात देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला आपल्या गळ्यातील हार काढून घातला, हा प्रकार अत्यंत निंदनीय असा आहे यात काही शंका नाही. भाजपने लगेच हा मुद्दा उचलत प्रियंका गांधी वढेरा यांच्या वर शरसंधान केले. मुळातच या आरोपातील मुख्य आक्षेप हा होता की कॉंग्रेस संस्कृतीत नेहरू-गांधी परिवारा शिवाय ज्या व्यक्ती भारताच्या पंतप्रधान जरी झाल्या तरी त्यांचा उचित सन्मान कॉंग्रेस आणि गांधी परिवारा कडून होत नाही.
                   या आरोपात नवीन काही नाही, आपले विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पण सरकारच्या कार्यकाळाच्या शेवटच्या संसद अधिवेशनात संबोधित करतांना संसदेत पंतप्रधान बसतात त्या भागातील पट्टीकेवर पंतप्रधान म्हणून फक्त तीनच नवे आहेत हे नमूद केले होते, ती तीन नवे कोणती याचा आपण अंदाज लावू शकतो, आणि या करता खूप दूर जाण्याची पण गरज नाही, अगदी अलीकडे २३ डिसेंबर २००४ ला भारताचे १२ वे पंतप्रधान आणि भारताच्या नव्या आर्थिक शक्तीचे प्रणेते श्री पी व्ही नरसीह राव यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मृतदेह अंतिम दर्शना करता कॉंग्रेस भवनात तर आणू दिलाच नाही पण त्याचा अंत्यविधी पण दिल्लीत होऊ दिला नाही. जो दुजाभाव कॉंग्रेसचे असूनही स्वर्गीय पी व्ही नरसीह राव यांच्या बद्दल आहे, तोच दुजाभाव भारताचे २ रे पंतप्रधान राहिलेले स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल पण आहे यात काही शंका नाही. पण या मागचे राजकारण पण आपल्याला समजून घ्यायला हवे.
                        आपण स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना नम्र मितभाषी आणि मातृहृदय-कोमलहृदयी व्यक्ती म्हणून ओळखतो, पण त्यांचा कणखरपणा देशवासियांना दोन वेळा दिसला पहिल्यांदाब १९५६ साली पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या सरकार मध्ये रेल्वे मंत्री म्हणून काम करतांना, एका रेल्वे अपघाताची नैतिक जवाबदारी अंगावर घेत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि दुसरे म्हणजे १९६५ च्या युद्धात पंतप्रधान म्हणून कणखर पणे या युद्धाला सामोरेच गेले नाही तर विपरीत परिस्थितीवर मात करत युद्ध जिंकून पण दाखवले.

                       कमी उंची, कृश बांधा आणि नम्र भाषा या मुळे लाल बहादूर शास्त्री यांच्यातल्या कणखरपणा कडे दुर्लक्ष केल्या गेले, पण शास्र्त्रीजी अव्वल दर्जाचे राजकारणी आणि मुसद्दी होते हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले होते, पण या सगळ्या पेक्षा ते अत्यंत प्रामाणिक आणि राष्ट्रप्रेमी व्यक्तित्व होते. रेल्वे मंत्री म्हणून राजीनामा दिल्यावर संसदेत केलेल्या संबोधनात करतांना त्यांनीच स्पष्ट केले होते, ते म्हणतात, “कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.”

                        2 ऑक्टोबर 1904 साली अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या शास्त्रीजींनी अत्यंत मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधी यांच्या कार्याने प्रेरित होत त्यांनी स्वत:ला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. लाल लजपतराय, पुरषोत्तम टंडन, आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी यांच्या सोबत शास्त्रीजींनी कामच केले नाही तर त्यांच्या कढून राजकारणाचे नकळत धडेही घेतले. १९४६ साली झालेल्या प्रांतिक निवडणुकीनंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंदवल्लभ पंत यांच्या सरकार मध्ये संसदीय सचिव झाले. लवकरच ते त्या सरकार मध्ये गृहमंत्री म्हणून काम बघायला लागले. गोविंदवल्लभ पंत यांच्या नंतर ते मुख्यमंत्री पण झाले.

                             १९५१ मध्ये त्याची दिल्लीतील कारकीर्द सुरु झाली. जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात चवथ्या क्रमांकाचे प्रतिष्ठेचे रेल्वेमंत्री आणि दळणवळण मंत्री म्हणून पद मिळाले. शास्त्रीजी चा नम्र स्वभाव आणि प्रामाणिकपणा या मुळे लवकरच ते देशभरात प्रसिद्ध झाले. रेल्वे अपघातानंतर दिलेल्या राजीनाम्या मुळे त्यांच्या लोकप्रेमात भरच पडली.

                               अनेक लेखक असा समज करून देतात कि जवाहरलाल नेहरू यांनीच लाल बहादूर शास्त्री यांना आपला उत्तराधिकारी म्हणून मान्य केले होते. हे अत्यंत चुकीचे आहे! या करता तत्कालीन राजकीय परिस्थितीचे भान पण ठेवायला हवे.
                   १९४७-१९६२ हा काळ भारतात खऱ्या अर्थाने नेहरू पर्व होते. कॉंग्रेस मध्ये पण नेहरूंना कोणी विरोध करू शकत नव्हते. पण १९६२ च्या चीन युद्धानंतर परिस्थिती झपाट्याने बदलायला लागली. स्वत: नेहरू झालेल्या पराभवाने खचले. कॉंग्रस मधील असंतुष्ट आता हळू आवाजात का असेना पण विरोध जाहीर करायला लागली. या घडामोडी मुळे जवाहरलाल नेहरू यांनी पहिले केराची टोपली दाखवलेली “कामराज योजना” पुन्हा खुणाऊ लागली. तामिळनाडू कॉंग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री कामराज यांच्या कल्पनेतून आलेली हि योजना म्हणून “कामराज योजना” या योजने नुसार ६० वर्षावरील नेत्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देत पक्षबांधणी करता काम करत पक्ष वाढवावा आणि नवीन नेतृत्व बहरु द्यावे अशी या मागची भावना होती.

                         “कामराज योजना” कार्यान्वित करत नेहरूंनी आपल्या मुलीचा म्हणजेच इंदिरा गांधी यांचा भविष्याचा रस्ता प्रशस्त केला होताच, एका झटक्यात मोरारजी देसाई, जगजीवनराम आणि स का पाटील सारख्या महत्वाकांक्षी नेत्यांना घरी बसविले होते. पण ह्या कामराज योजनेच्या पाठी कॉंग्रेस मध्ये पण अंतर्गत राजकारण खेळल्या जात होते.

                            भुवनेश्वर येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांना पक्षाघाताचा झटका आला. त्या मुळे जवाहरलाल नेहरू आपल्या तीनमूर्ती भवन मधूनच कारभार चालवू लागले. नेहरूंच्या आजारपणाच्या काळात सत्तेची साऱ्या चाब्या गुलझारीलाल नंदा, टी टी कृष्णम्माचारी आणि अप्रत्यक्षपणे इंदिरा गांधी यांच्या हातात एकवटल्या. हा जेष्ठ आणि काही प्रमाणात असंतुष्ट काँग्रेसजनांना मान्य होणे नव्हते, या करता पण राजकारण सुरु झाले. याचीच परिणीती शास्त्रीजींची नेहरूंच्या आजारपणाच्या काळात पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात बिन खात्याचे मंत्री म्हणून वर्णी लागण्याच्या रुपात झाली. पण वरिष्ठ नेते आणि प्रामाणिकपणे उत्तम काम सांभाळत असून सुध्दा शास्त्रीजींना “उपपंतप्रधान” करावे जेणे करून त्यांना काही निर्णय घेतांना त्यांना त्रास होणार नाही, हि कॉंग्रेस कमेटीची शिफारस पण जवाहर नेहरू यांनी झिडकारली! मग कोणत्या अर्थाने नेहरू यांनी शास्त्रीजींना आपला उत्तराधिकारी म्हणून मान्य केले होते? 

                          नेहरू यांच्या मृत्यू नंतर कॉंग्रेसमध्ये सर्वसंमतिने नेता निवड व्हावी असा मतप्रवाह तयार झाला. इंदिरा गांधी यांची इच्छा असली तरी त्या तश्या बोलू शकत नव्हत्या. खरे तर इंदिरा गांधी यांच्या वतीने द्वारकाप्रसाद मिश्र प्रयत्न करीत होते पण, मोरारजी देसाई यांच्या महात्वाकांक्षे मुळे त्यांचे प्रयत्न वाया गेले. मोरारजी देसाई पुन्हा रिंगणात आले होते, पण ते कोणलाच नको होते. या सगळ्या राजकारणात शास्त्रीजींचे राजकारण आणि मूसद्दीपण कामात आले आणि पंतप्रधान पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. 
                                   इदिरा गांधी यांना मंत्रिमंडळात पण खाते वाटपात चांगले खाते आले नाही. कारण गुलजारीलाल नंदा नेहरूंच्या मृत्यू नंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करत होते, त्याच मुळे शास्त्रीजींच्या सरकार मध्ये त्यांना चांगले मंत्रालय मिळणे कमप्राप्त होते, त्यांना गृहखाते देण्यात आले. टी टी कृष्णम्माचारी यांना अर्थ खाते देण्यात आले. या मुळे खाते वाटपात पण इंदिरा गांधी चौथ्या क्रमांकावर गेल्या, योगायोग बघा शास्त्रीजी पण जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात चवथ्या क्रमांकाचे मंत्री होते!

                               दुर्दैवाने शात्रीजींना पंतप्रधान म्हणून सिद्ध करायला अवघी दीडच वर्षे मिळाली, पण या दीड वर्षाच्या कार्यकाळात शास्त्रीजींनी भारतीयांच्या जनमानसात आपल्या प्रामाणिकपणा आणि खंबीर नेतृत्वाने अढळ स्थान निर्माण केले. भारताच्या बिकट परिस्थितीत भारतीयांना एक वेळा उपास करायचे आव्हान देणारा आणि स्वत: पण एक वेळ उपास करत भारतीयांना जोडून घेणारा, “जय जवान जय किसान” असा घोष देत पाकिस्थांच्या युध्द खोरीला आव्हान देणारा आगळा पंतप्रधान असा लौकिक शास्त्रीजींनी मिळवला.

                        ताश्कंद येथे पाकीस्थान सोबत करार करायला गेलेले आपले पंतप्रधान शास्त्रीजी एकाएकी निधन पावतात, या निधना मागे घातपाताची शंका व्यक्त होऊनही, नंतर सत्तेत असलेले पंतप्रधान या विरोधात काहीच पावले उचलत नाही ते का? हे समजायला अजून काही मार्ग नाही. तरी एक गोष्ट नक्की भारतात कमालीचे लोकप्रिय झालेले दोन मोठे नेते ज्यांच्या निधना बद्दलचा गुंता अजूनही सुटला नाही, ते म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि लाल बहादूर शास्त्री!

टिप्पण्या