पाकिस्थानात झालेल्या एअर ट्राइक मुळे एका महत्त्वाच्या बातमी कडे आपल्या सगळ्यांचे दुर्लक्ष झाले. आपल्या तथाकथित पुरोगामी वार्तापत्रांना तर या विषयी काहीही ममत्त्व नसल्यामुळे यांनीही हा विषय सध्या चाललेल्या राजकारणात बाजूला टाकला!
हा विषय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या वचनाप्रमाणे आणि 1960 पासून उघड पणे भारतीय सशस्त्र सेनेने केलेल्या मागणी प्रमाणे 25 फेब्रुवारी 2019 रोजी "राष्ट्रीय युद्ध स्मारक" -राष्ट्राला समर्पित करत भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतीय सेना आणि देशातील राष्ट्रवादी विचारांच्या लोकांची इच्छा पूर्णत्वास नेली.
भारतात आजपर्यंत भारतीय युद्ध स्मारक बनवल्या गेले नव्हते! धक्कादायक असले तरी हे सत्य आहे. गेल्या 70 वर्षात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाने अनेक वास्तू आणि स्मारक तयार करण्यात आले, इतकेच काय तर भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने महराष्ट्रात तर प्रत्येक शहरात स्मारक उभारल्या गेले होते, त्यातही आपल्या नेत्यांनी भष्टाचार झाल्याचे दाखले दिल्या गेले होते. पण इतके सारे होत असतांना पण भारतीय लोकशाही आणि देशाच्या सर्वभौमित्वासाठी गेल्या 70 वर्षात आपले रक्त देशासाठी देणाऱ्या सैनिकांसाठी स्मारक उभारण्याचे मात्र कोणाला सुचले नाही.
भारतात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दिल्लीतील "इंडिया गेट" येथील "अमर जवान ज्योतीला" लष्करी मानवंदना देतांना आपण बघत असलो तरी ते काही पूर्णपणे "राष्ट्रीय युद्ध स्मारक" नाही, आणि इंडिया गेट हे काही भारतीय सैनिकांसाठी बांधलेले स्मारक नाही हे कटू असले तरी सत्य आहे.
मध्यंतरी समाज माध्यमांतून एक संदेश फिरत होता, त्यात इंडिया गेट वर कोणत्या जातीचे आणि धर्माचे किती जवानांची नावे आहेत याची माहिती दिल्याचा दावा करत समाजात फूट पाडण्याचे कारस्थान होते. कारण एक तर त्यांना "इंडिया गेट" चा इतिहास माहीत नव्हता किंवा त्यांनी "इंडिया गेट" वरील नावे वाचण्याचा प्रयत्न पण केला नसेल.
"इंडिया गेट" एडविन ल्युटीयन्स यांच्या कल्पनेप्रमाणे बांधण्यात आले होते, अँग्लो-अफगाण युद्धात आणि पहिल्या महायुद्धात "ब्रिटिश इंडियन आर्मी" मधील 13,300 हुतात्मा जवानांचे त्यात नाव कोरले गेले आहे, त्यात अनेक ब्रिटिश जवान आणि अधिकारी पण आहेत. 1924 पासून या स्मारकाचे काम सुरू झाले जे 1931 साली संपले आणि या स्मारकाचे त्याच वर्षी लोकार्पण झाले. इंडिया गेट मध्ये लागलेली "अमर जवान ज्योत" ही 1971 च्या युद्धा नंतर या युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या आठवणी प्रित्यर्थ स्थापित करण्यात आली आहे.
1971 च्या लढाई करता "अमर जवान ज्योती" आणि 1999 साली कारगिल येथे झालेल्या लढाई प्रित्यर्थ "कारगिल युद्ध स्मारक" ही 70 वर्षात केलेले भारतीय सेनेचा भारतीय राज्यकर्त्यांनी केलेला सन्मान आहे.
म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे योग्य राष्ट्रीय स्मारक भारत सरकारने बांधले नव्हते. असे असले तरी भारतीय सैनिकांच्या मर्दुमकीची दखल जगाने नक्कीच घेतली आहे. फ्रांस ने राजधानी पॅरिस पासून 200 किलो मीटर दूर विलर्स गिल्सन येथे पहिल्या महायुद्धात भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमाचे स्मारक बांधले आहे, तसेच इस्रायल मधील हैफा येथे झालेल्या युद्धात भारतीयांनी केलेल्या कामगिरीचे स्मारक आहे, तसेच ते सीरिया आणि सिनाई येथे पण आहे.
मानवतावाद आणि अहिंसा याच्या वेडगळ कल्पनांपाई आपण आपल्या सैन्याच्या पराक्रमाचे राष्ट्रीय स्मारक तर उभारले नाहीच पण विदेशी इंग्रजांनी उभारलेल्या स्मारकाचे पण विस्मरण आपण कसे केले याचे एक उदाहरण, आपल्याला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान "तीन मूर्ती चौकात" आहे हे माहीत आहे. हे निवसस्थान आता नेहरू यांचे राष्ट्रीय स्मारक आहे. पण "तीन मूर्ती चौक" कशाचे स्मारक आहे हे आपल्याला सांगितलेच गेले नाही! हे तीन मूर्ती चौकात असलेल्या स्मारकात तीन सैनिक मुर्त्या आहेत, त्या हैफाच्या लढाईत मर्दुमकी गाजवलेल्या जोधपूर, म्हैसूर आणि हैद्राबाद येथील सैनिकांचे प्रतीक म्हणून ह्या तीन मुर्त्या!
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तथाकथित शांततावादी भूमिकेत सैन्याच्या हिंसक कारवायांचे उदात्तीकरण करणे बसत नसल्यामुळे असल्या सैन्य स्मारकांना विस्मृतीत ढकलण्यात आले. तसेच तेव्हा भरतासोबत जीतके देश स्वातंत्र झाले होते त्या देशात काही न काही कारणाने सैन्याने तेथील सत्ता ताब्यात घेत लोकशाहीचा गळा आवळला होता, तीच परिस्थिती भारतात येईल अशी काही प्रमाणात रास्त भीती पण या मागे होती. पण या सगळ्यात भारतीय सेना तर व्यवसायिक झाली पण भारतीय लोकशाही मध्ये नौकरशाहीचे महत्व अवास्तव वाढले.
पण ब्रिटिशांनी तयार केलेली व्यवसायिक परंपरा भारतीय सैन्याने तशीच्या तशी उचलत आपल्या व्यावसायिक मानसिकतेचा पूर्ण दाखला भारतीय जनतेला दिला आहे. भारतातील नाजूक राजकीय परिस्थितीत पण भारतीय सेना कधीही लोकशाहीच्या आड आली नाहीच, पण लोकशाहीच्या रक्षणा करता आपल्या बराकी मधून बाहेर आलेले सैन्य काम संपल्यावर नेहमी परत बराकीत वापस गेले. भारतीय संविधानाचे आणि लोकशाहीचे आपल्या परीने भारतीय सेनेने केलेले हे रक्षणच नाही काय? इतकी व्यवसाईकता जगात फार कमी देशाच्या सैन्यात आहे आणि ज्या देशात असे व्यवसायिक मानसिकतेत सैन्य आहे ते देश जगातील महासत्ता आहेत हे विसरून चालणार नाही!
तरी आपल्या जुनाट मानसिकतेतून आपले राजकीय नेतृत्व बाहेर न आल्यामुळेच "राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा" प्रश्न मार्गी लागत नव्हताच उलट त्याला वेगवेगळ्या कारणाने विरोध करत स्मारकाच्या कामात अडंगा मात्र उभा केल्या जात होता. दिल्लीच्या तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी तर इंडिया गेट समोरील परिसराचे सौन्दर्य कमी होईल हे सांगत या स्मारकाला विरोध केला होता.
वर सांगितल्या प्रमाणे नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकी मध्ये या स्मारकाच्या निर्मितीचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येताच या करता काम सुरू केले. नरेंद्र मोदी यांच्या घोषणे प्रमाणे भूमिपूजन आणि उदघाटन दोन्ही मोदी यांच्या हस्तेच झाले हे विशेष.
दिल्लीत "इंडिया गेट" समोर असलेल्या छत्री समोरील 40 एकर परिसरात हे "राष्ट्रीय युद्ध स्मारक" निर्माण केले आहे. परिसरातील जुन्या वास्तू सोबत ताळमेळ ठेवत याचे वास्तूचित्र तयार करण्यात आले आहे. या करता एक जागतिक वास्तुचित्र स्पर्धा आयोजित केल्या गेली होती, त्यात चेन्नई येथील WeBe Design Lab ने बाजी मारली. याचे मुख्य वास्तुकार योगेश चांद्रहासन आहेत.
या स्मारकात भारताच्या स्वातंत्र्या नंतर 1947-48 (पाकिस्थान), 1961 (गोवा), 1962 (चीन), 1965 (पाकिस्थान), 1971 (बांगलादेश मुक्ती), 1987 (सियाचीन), 1987-88 (शांती सेना-श्रीलंका), 1999 (कारगिल) या युद्धात आणि इतर युद्धजन्य परिस्थितीत देशाकरता, देशवासीयांकरता आपले बलिदान देणाऱ्या 25, 942 सैनिकांचे नाव येथे लावण्यात आली आहे, सोबतच काही अत्यन्त अटीतटीच्या युद्धक प्रसंगाचे भित्तिचित्रे पण तेथील संग्रहालय लावण्यात आली आहे आणि त्याची माहिती देखील. या पद्धतीने एक जागतिक दर्जाचे युद्ध स्मारक तयार करण्यात आले आहे.
कधी दिल्लीत गेलात तर या स्मारकाला नक्की भेट द्या, आणि प्रत्येक सैनिकासमोर नतमस्तक होत आदरांजली नक्की वहा! फक्त भारतातील पुरोगाम्यांप्रमाणे त्यांची नावे वाचून त्यांना कोणत्याही धार्मिक, जातीय, पंथीक जोखडात बांधू नका, कारण त्यांनी प्राण आपल्या देशा साठी, देशाच्या एकतेसाठी, देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी दिलेत, ना की तुमच्या भांडणा साठी! आणि लक्षात ठेवा काँग्रेसची दांभिकता जे आज मोदी सरकारवर सैन्याच्या अपमानाचा आरोप करते त्यांनी कधीच भारतीय सैन्याला त्यांचा योग्य सन्मान दिला नाहीच, पण याच सैन्याच्या नियमित सरावाला सत्ता उलथवण्याचे नाव देत बदनाम करण्याचे उद्योग मात्र सातत्याने केले.
खूप सुरेख वास्तव मांडले आहे . माहिती नसलेला इतिहास ज्ञात झाला
उत्तर द्याहटवासर्वांना वंदन
आपले अभिनंदन.