राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तथाकथित भारतीय पुरोगामी – भाग १





चले निरंतर चिंतन मंथन, चले निरंतर अथक प्रयास |
भारत मां की सेवा मे हो, अपने जीवन का हर श्वास |
मन मे परम विजय विश्वास ||

               कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. राहुल गांधी जर्मनीत गेले असता तेथे एका कार्यक्रमात त्यांनी “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची” तुलना मुस्लीम जगतातील सगळ्यात जुन्या दहशदवादी संघटना “मुस्लीम ब्रदरहूड” सोबत केली आणि भारतात राजकीय आणि वैचारिक धुरळा उडाला. जर्मनीत श्री. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला कोणी मनावर घेतले ते कळले नाही, पण भारतातील तथाकथित पुरोगामी, छद्म धर्मनिरपेक्षवादी, स्वयंघोषित बुद्धीजीवी असलेले डावे आणि स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणारे समाजवादी यांनी मात्र श्री. राहुल गांधी यांचे वक्तव्य चांगलेच डोक्यावर घेतले. या सगळ्या “कंपूने” या निमित्ताने  “राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर” नेहमीप्रमाणे येथेच्छ तोंडसुख घेतले आणि नेहमीच्या पद्धतीने खोट्या बदनामीला आपल्यापरीने हातभार लावला.

                  पण या वेळेस नेमकी नाविन्यपूर्ण घटना घडली. इतर वेळेस असल्या “बदनामी” करणाऱ्या वक्तव्यावर शांत असणारा आणि प्रसिद्धी पासून सदैव दूर असणारा “संघ” जगासमोर आला. प्रसिद्धी माध्यमां सोबतच देशातील आणि देशाबाहेरील अनेक मान्यवरांशी खुद्द पूज्यनीय सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांनी दिल्ली येथे संवाद साधला आणि श्री. राहुल गांधी यांच्या भारताबाहेर केलेल्या बालिश वक्तव्या मधील “हवा” काढून घेतली. खरे तर हा कार्यक्रम अगोदरच ठरला होता. पण आजपर्यंत श्री. राहुल गांधी यांच्या बाबत घडते तसेच झाले, त्यांनी त्याच्या “वक्तव्याची” वेळ चुकीची निवडली.

               विज्ञान भवन, दिल्ली येथे दिनांक १७, १८, आणि १९ सप्टेंबर २०१८ ला “भविष्याचा भारत – संघाच्या दृष्टीकोनातून” या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय व्याख्यानमालेत जगातील अनेकांच्या मनात असलेल्या प्रश्नाला सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांनी अत्यंत सोप्या शब्दात उत्तर दिले.
                  या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात साधारण प्रश्न जसे, संघाची उदिष्टे, संघाचा कोणत्याही समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन, सोबतच हिंदू परंपरा – संस्कृती या वर आधारित विचारसरणी, तत्कालीन राजकीय परिस्थिती,  संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे विचार आणि प्रेरणा, सोबतच संघ स्वयंसेवक कोणत्या वैचारिक प्रेरणेने “राष्ट्र-प्रथम” या तत्वावर काम करतो, तसेच कोणत्याही आपत्तीत सतत “राष्ट्रा” सोबत असतो, या सगळ्या गोष्टींवर भर देत थोडक्यात संघाचा ९३ वर्षाचा पट मांडला. “आम्हाला कोणत्याही समाजावर “वर्चस्व” गाजवायचे नसून, आम्हाला समाजाचे “वर्चस्व” हवे आहे. समाजाला कोणत्याही चांगल्या कामा करता “संघ वर्चस्वाची” गरज लागेल ह्या स्थितीला “संघ” नक्कीच चांगले समजत नाही. या पेक्षा समाजाकरता केलेले कोणतेही “सकारात्मक काम” हे समाजातील “सामान्य व्यक्ती” कडूनच पूर्ण व्हावे, हेच “संघाचे” अंतिम “लक्ष्य” आहे.” हे खरे या दिवसाचे सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांच्या व्याख्यानाचे “सार” होते.



                  दुसऱ्या दिवशी सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांनी “संघाविषयी” असलेले अनेक गैरसमज पुसून काढण्याचा विस्तृत प्रयत्न केला. संघाच्या हिंदुत्वाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि “भारतीय संविधानाच्या” मूळ सिद्धांतावर असलेला विश्वास त्यांनी व्यक्त केला. “हिदुत्व” हे कोण्या एका पंथ आणि धर्मासाठी नसून भारतातील नांदत असलेल्या समस्त धर्मांसोबत “सहिष्णुतेने” राहण्यात आहे. तसेच “हिंदुत्व” हे “पवित्र जीवन मूल्याचा समुच्चय” असून हा देशाचा आधार आणि प्राण आहे. याच आधारावर समतायुक्त आणि शोषणमुक्त समाजाची बांधणी करणे हे संघाचे लक्ष आहे आणि या बांधणीतून एक संपन्न, समर्थ, शक्तिशाली, “विश्वगुरु” असा भारत तयार होईल असा संघाचा विश्वास आहे हे अधोरेखित केले.

                            भारतीय संविधानाशी असलेल्या बांधिलकी वर आधारित भारतीय लोकशाही वर असलेला विश्वास व्यक्त करतांनाच, महिला सशक्तीकरणा कडे बघण्याचा “संघाचा” दृष्टीकोन अतिशय स्वच्छ शब्दात त्यांनी सांगितला. “महिला आणि पुरुष समाजाचा एक भाग असल्यामुळे समाजाच्या प्रत्येक कार्यात पुरुषाच्या बरोबरीने “हिस्सेदार आणि जवाबदार” आहे आणि म्हणून त्यांच्या सोबत समान व्यवहार झाला पाहिजे, पुरुष आणि महिला या दृष्टीने “परस्पर पूरक” आहेत”, हा विचार पण सरसंघचालक यांनी मांडला.

                  “संघ आणि राजकारण” या कळीच्या मुद्यावर बोलतांना, “ संघ हा कोणत्याही राजकीय विचारांपासून दूर राहील हे संघाच्या स्थापने पासूनच ठरविले होते. कोणत्याहि राजकीय पक्षात “संघातील अधिकारी” कोणतीही “आधिकारिक पद” भूषवणार नाही. संघाचे काम “समाज” एकत्रित करणे आहे, राज्य कोण करणार हे ठरवणे संघाचे काम नाही. राज्य कोण करणार ह्याचा निर्णय “समाज” लोकशाही पद्धतीने करेल. पण “राष्ट्र हिता” साठी “राज्य” कसे चालावे यावर संघाचा “विचार” आहे आणि त्या करता “लोकशाही” पद्धतीने मत मांडायचा प्रयत्न संघ नक्कीच करतो. संघ राजकारणापासून दूर राहतो याचा अर्थ असा नाही कि संघ देशात होणाऱ्या “घूसपेठी” बद्दल काही बोलणार नाही. अश्या “राष्ट्रीय प्रश्नांवर” ज्या प्रश्नांच्या उत्तरांमुळे देशांच्या समाज जीवनावर परिणाम होणार असेल, तर त्यावर संघ नक्कीच बोलेल. संघाच्या स्वयंसेवकांवर कोणत्या एका राजकीय पक्षात जाण्याचा दबाव नाही, तरी स्वयंसेवक इतर पक्षात का जात नाही ? हा विचार त्या राजकीय पक्षाने करावा असा टोला पण सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांनी लावला.      

                तीन दिवसीय व्याख्यानमालेतील दोन दिवसाच्या सरसंघचालकांच्या व्याख्यानाचे हे “सार” होते. तिसरा दिवस हा आलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायला ठेवला होता. अनेक प्रश्न ज्याला आज पर्यंत संघाने उत्तर न दिल्याने विरोधकांचा फायदा होत होता त्याला अत्यंत समर्पक उत्तरे सरसंघचालकांनी दिली आणि त्या मुळे भारतातील तथाकथित बुद्धीजीवी उघडे तर पडलेच, “पोथीनिष्ठ” म्हणून बदनाम संघ स्वतः कसा बदलत गेला आणि “पुरोगामी” झाला, आणि तथाकथित बुद्धीजीवी स्वतः अजून कसे “पोथीनिष्ठ” राहिले हे अधोरेखित करून गेले. हे आपण पुढच्या भागात बघू.           





टिप्पण्या