महाराष्ट्रात आणि
भारतात सुरू असलेल्या घडामोडी आणि त्याचे भारतीय वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या करत
असलेले वृत्तांकन पहाता लोकशाहीच्या या चौथ्या स्तभाचे नक्की काय करायचे ? हा प्रश्नच आ वासून
उभा आहे.
खरे तर कोणत्याही
घटनेचे सत्य कथन करणे, हे वृत्तपत्राचे खरे काम आणि आपल्या
वर्तमानपत्रात किंवा वृत्तवाहिणीवर येणारे वृत्त हे खोडसाळ आणि चुकीचे नाही हे
बघणे संपादकांचे काम असते. त्या शिवाय संपादकाने घडलेल्या घटनेवर निष्पक्ष मीमांसा
करावी अशी अपेक्षा असते.
महाराष्ट्र हे देशात “वृत्तपत्र” सुरू करणाऱ्या
अग्रगण्य राज्यापैकी एक राज्य. देशाला लोकमान्य टिळक, खाडिलकर, आचार्य अत्रे, माडखोलकर सारखे
दीग्गज पत्रकार दिलेला महाराष्ट्र हाच का? असा प्रश्न पडावा अशी
परिस्थिती निर्माण झाली आहे.
“संपादकाने” सरकारच्या बाजूनेच
बातम्या द्याव्या असे नाही, “संपादक” हा उत्तम प्रकारे “विरोधी पक्षाचे” काम नक्कीच करू शकतो.
मात्र फक्त सरकार आपल्या “विचारधारेचे” नाही म्हणून
कोणत्याही प्रकरणात ओढून ताणून “सरकार विरोध” करणे, किंवा त्या “विचारधारेच्या” व्यक्तीने केलेले
व्यक्तव्य मोडतोड करून दाखवणे कितपत योग्य आहे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात हे
घडते आहे आणि त्या मुळे महान वृत्तपत्र परंपरा असलेल्या वृत्तपत्राच्या प्रामाणिक
वार्तांकना विषयी लोकांच्या मनात शंका उत्पन्न होत आहे.
साधारण “आणीबाणी” नंतर भारतात आणि
पर्यायाने महाराष्ट्रात पण एक नवीन पत्रकारीका जन्माला आली, ती म्हणजे काँग्रेसचे
कोणत्याही निर्णयाला विरोध न करणारी. यात डावे पत्रकार पण त्याच मार्गाने जात
सत्तेचे लोणी काँग्रेस सोबत चाखायला लागले यातून एक नवीन जमात पुढे आली त्यालाच
आपण “बुद्धिजीवी” म्हणून ओळखायला
लागलो. पण जशी जशी उजव्यांची सद्दी वाढायला लागली त्यांच्या पदवी समोर एक आजून
पदवी लागली आणि त्यांना “पुरोगामी बुद्धिजीवी” म्हणून ओळखले जाऊ
लागले.
खरे तर “बुद्धिजीवी” हे लोक सगळ्या
विचारधारेत असतातच पण डाव्या आणि कॉंग्रेसच्या पूर्णत:
कह्यात गेलेल्या भारतीय पत्रकारीकेला “उजव्या” विचारसरणी मध्ये कोणी “बुद्धीजीवी”
आहेत हे मान्य करणे जीवावर आले. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत पण मा.गो. वैद्य,
मुजफ्फर हुसेन सारखे राष्ट्रवादी आणि उजव्या विचारसरणीचे लोक “बुद्धीजीवी” म्हणून
समोर यायला लागल्या वर हा “पुरोगामी बुद्धीजीवी” हा शब्दप्रयोग उपयोगात आणून
भारतीय जनतेच्या डोळ्यात आणि डोक्यात धूळफेक करायचे काम या “संपादकांनी” सुरु
केले.
पण २०१४ च्या
निवडनुकी नंतर सत्तेत आलेल्या भाजप आणि पंतप्रधान म्हणून आलेल्या नरेंद्र मोदी
यांच्या मुळे खरे तर या “पुरोगामी बुद्धीजीवी” म्हणवून घेत असलेल्या “संपादक आणि
पत्रकार” यांच्या समोर अंधार पसरला कारण भारतीय जनता यांच्या “बौद्धिक धूळफेकिला”
बधली नाही. २००० पासून गुजरात दंग्याच्या निमित्याने भारतीय पत्रकार ज्याच्या
विरुद्ध हात धुवून मागे लागले होते, आणि ज्याची बदनामी करण्यात कोणतीही कसूर ठेवली
नव्हती त्याच माणसाला पंतप्रधान बनलेल बघतांना यांच्या पाया खालची वाळू घसरणे साहजिकच
होते. पण भारतात नवीनच आलेला “सोशल मिडिया” भारतातील “वृत्तपत्र जगताला” भारी
पडला. कारण हे स्वत:ला “पुरोगामी
बुद्धीजीवी” म्हणवून घेणारे पत्रकार – संपादक जे खोटे वृत्त पसरवत होते त्यातील
खोटे पणा याच “सोशल मीडियातून” समोर यायला लागला. भारतात घडणाऱ्या कोणत्याही
घटनेला “धार्मिक – जातीय” रंग देण्याचे आणि या घटनेचे खापर “उजव्या लोकांवर” फोडायचे
अनेक मनसुबे या “सोशल मिडिया” ने उधळले.
गंमत म्हणजे
“व्यक्ती स्वातंत्र्य” आणि “अभिव्यक्ती” या दोन गोष्टींच्या “गळचेपीच्या” नावाने
गळे काढणारे हे “संपादक आणि पत्रकार” लोकांकरता मात्र हेच “व्यक्ती स्वातंत्र्य”
आणि “अभिव्यक्ती” फक्त काही लोकांकरताच कशी असते हे बंगळूरूच्या पत्रकार “गौरी
लंकेश” यांची हत्या झाल्यावर प्रकर्षाने समोर आले. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या
झाल्यावर दिल्लीतील प्रेस क्लब वर “धरणे” देत सरकारचे वाभाडे काढणारे हेच
“पुरोगामी पत्रकार” मात्र डाव्यांच्या राज्यात झालेल्या शंतनू भौमिक या
पत्रकाराच्या हत्ये नंतर मात्र चिडीचूप बसले. इतकेच नाही तर नुकत्याच काश्मीर
मध्ये शुजात बुखारी या पत्रकाराच्या हत्ये नंतर मात्र हीच “पुरोगामी बुद्धीजीवी”
पत्रकार-संपादक मांडळी चिडीचूप होती. इतकच कशाला तर काश्मीर मध्येच १९९० पासून
२०१८ पर्यंत १९ पत्रकारांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. पण त्या हत्यांचे कोणतेही
पडसाद भारतीय वृत्तपत्र सृष्टीत दिसले नाही.
लासा कौल, पी
एन हांडू, मोहम्मद शबान वकील, अली मोहम्मद महाजन, सय्यद गुलाम नबी, मोहम्मद शफी
बट, गुलाम मोहम्मद लोन, मुश्ताक अली, गुलाम रसूल शेख, अल्ताफ अहमद फकतूर, सैदान
शफी, तारिक अहमद, प्रदीप भाटीया, पर्वाज मोहम्मद सुलतान, अब्दुल माजित भट, आसिया
जिलानी, अशोक सोडी, जावेद अहमद मीर ह्यांच्या साठी कधी दिल्लीतील “प्रेस क्लब” वर
या संपादकांनी कधी “धरणे” दिलेत का हो? ते जाऊ द्या पण या व्यतिरिक्त भारतात २८
पत्रकारांची हत्या १९९० ते २०१८ पर्यंत करण्यात आली पण त्यातील फक्त “गौरी लंकेश”
सोडली तर एकही पत्रकाराची बातमी हि यांच्या साठी “राष्ट्रीय बातमी” होऊ शकली नाही
ती का? याचा विचार पण आपण करायला हवा.
जिथे फक्त
“उजव्या विचारसरणीला” बदनाम करता येऊ शकते फक्त त्याच हत्या ह्या “राष्ट्रीय
बातमीचा” विषय होतात, पण काश्मीर मधील हत्या किंवा डाव्यांच्या राज्यात होणार्या
हत्या ह्या कधीच “राष्ट्रीय बातम्यांचा” विषय होत नाही असे का??
याच बरोबर चुकीच्या आणि खोडसाळ
बातम्या देण्याचा सपाटा या लोकांनी सध्या लावला आहे, मग ते भिडे गुरुजी यांच्यावर
गुदरलेले “आंबा” असो कि विहरीत पोहणाऱ्या पोरांना झालेल्या मारहाणी ला “जातीय” रंग
देणे असो, या अगोदर पण दिल्ली आणि बंगाल मध्ये झालेल्या चर्च वरील हल्याचा काहीही
पुरावे नसतांना संबंध “उजव्या” विचारधारेशी जोडण्यात आले होते.
या सगळ्या प्रकरणामध्ये
भारतीय वृत्तपत्र सृष्टीची विश्वासहार्तता सध्या रसातळाला गेली आहे. त्या मुळे आपण
आपल्या भारताच्या सुजाण नागरिक असल्याचे कर्तव्य पाळतांना ज्या प्रमाणे “सोशल
मिडिया” वर येणाऱ्या बातम्या खातरजमा केल्या शिवाय विश्वास ठेवत नाही त्याच
प्रमाणे आता आपल्याला या “प्रेष्या” पत्रकार-संपादक यांच्यावर विश्वास ठेवता येणार
नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा