भा.ज.प. ला प्रत्येक निवडणुकीत यश का मिळते ??



कर्नाटक निवडणुकांचे निकाल आल्यावर भा.ज.प. तिथे पण १०४ जागा घेऊन सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला. खरे तर तिथे कॉंग्रेस हरेल असे चित्र नव्हते, किमान भारतीय प्रसारमाध्यमांनी तरी तसे ते तयार केले होते असे आता म्हणायला हरकत नाही. तरी तिथे कॉंग्रेसला केवळ ७८ जागा मिळाल्या. बाकी अजून तिथे सत्तेची साठमारी, घोडाबाजार सुरु आहे. पण आपला विषय तो नाही. कारण प्रसारमाध्यम आणि सोशल मिडिया या वर सतत सध्या भा.ज.प. विरोधी वातावरण तयार होत असतांना पण भा.ज.प. प्रत्येक निवडणुकीत यश कसे मिळवते?? हा आहे. “मोदी लाट” जी २०१४ साली तयार झाली होती ती गेली ४ वर्षे खरच कायम आहे का?? हे खरे प्रश्न अनेकांच्या मनात आहे, आपण फक्त याची कारण शोधायची प्रयत्न करू.
 
भारतीय प्रसार माध्यमे दाखवतात तशी “मोदी लाट” खरेच आहे का? आणि २०१४ ते २०१८ अशी चार वर्षे अशी “लाट” खरेच राहते का ? भारतीय राजकारणात “राजकीय लाट” येणे हे काही नवीन नाहीये. सगळ्यांच्या लक्षात असणारी सगळ्यात मोठी “लाट” म्हणजे १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्ये नंतर झालेल्या निवडणुकीत तेव्हा कॉंग्रेसला “राक्षसी बहुमत” मिळाले होते. बरे हे सगळे “शीख शिरकाण” सारखे घृणित कार्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केल्यावर आणि त्या वर “जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजुची जमीन हादरणे सहाजिकच आहे.असे अत्यंत वादग्रस्त आणि झालेल्या शीख विरोधी दंगलींना सरळ सरळ समर्थन देणारे वक्तव्य देऊन पण भारतीय जनतेने त्यांना ४०४ जागा तत्कालीन लोकसभा निवडणुकीत दिल्या होत्या तरी १९८९ च्या निवडणुकी पर्यंत विरोधी पक्षांनी कॉंग्रेसची हवा पुरती काढून घेतली होती आणि जनता पण पूर्णपणे नाही तरी बरीचशी कॉंग्रेसच्या विरोधात गेली होती. त्या मनाने राजीव गांधी यांच्या हत्ये नंतर आलेल्या लाटेत कॉंग्रेसला २४४ जागा भारतीय जनतेने दिल्या आणि नरसिंव्हराव यांना पंतप्रधान बनविले. पण लक्षात ठेवा या दोन्ही सरकारला त्यांनी जिंकलेल्या निवडणुकी नंतर त्या विजयातील सतत्य पुढील ५ वर्षे कायम ठेवता आले नाही आणि पुढील निवडणुकीत जिंकता पण आले नाही. या इतिहासाकडे बघता भा.ज.प. चे प्रत्येक निवडणुकीतील यश डोळ्यात भरणारे तर आहेच आणि २०१९ करता उत्कंठा वाढविणारे पण यात काही शंका नाही.
या सगळ्या गदारोळात मला स्वत:ला तरी “मोदी लाट” अस्तित्वात असल्याची काही चिन्हे दिसत नाहीत. कारण असे नाही कि २०१४ पासून भा.ज.प. प्रत्येक निवडणूक खिशात टाकत आहे असे नाही. काही विधानसभेच्या निवडणुका, काही पोटनिवडणुका, स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यात भा.ज.प. ला अपयश येऊन हि भा.ज.प. चीच हवा का दिसते ? मग पुन्हा प्रश्न तोच कि भा.ज.प. चे यश कशात?? 
याचे खरे उत्तर आहे ते विरोधी पक्षाच्या “नकारात्मक राजकारणात” आणि “भारतीय प्रसारमाध्यमांच्या” नकारात्मक प्रसिद्धी मध्ये. या मध्ये कॉंग्रेस पासून सत्तेत साथ देणाऱ्या पण गेल्या ४ वर्षा पासून “राजीनामे” खिशात ठेवणाऱ्या शिवसेने पर्यंत सगळेच पक्ष येतात. “नरेंद्र मोदी” यांना मोठे केले तेच मुळी त्यांच्या “नकारात्मक प्रसिद्धीनेच” हेच मुळी कोणी लक्षात घेत नाहीये. “गुजरात दंगलीचा” डाग अंगावर घेतलेले आणि “मौत का सौदागर” हि उपाधी मिळविलेल्या नरेद्र मोदी याच्यावर जितके आरोप २००० ते २०१४ झाले त्याचा वापर “सकारात्मक” पद्धतीने आपली स्थिती मजबूत करण्याकरता वापर नरेंद्र मोदी यांनी केला. याचीच पुनरावृत्ती भा.ज.प. सरकार स्थापने नंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा मोठ्या खुबीने करत आहे.  
 
नकारात्मक प्रसिद्धीचे उदाहरण द्यायचे तर सगळ्यात ताजे उदाहरण म्हणजे “भारताच्या प्रत्येक गावात वीज पोहचल्याचे.” Tweet पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करताच, भारतातील तमाम प्रसिद्धी मध्यम आणि विरोधक तत्काळ कामाला लागले आणि कोण कोणत्या गावात अजून वीज पोहचली नाही याचे दाखले द्यायला सुरवात केली. पण विरोधी पक्षापेक्षा “प्रसिद्धी माध्यमांवर” अधिक जवाबदारी असते त्या मुळे एक मोठा विरोधाभास समोर आला. वीज न पोहचलेल्या गावांची यादी देत असतांना त्यांना मुंबई पासून जवळ असलेल्या “घारापुरी बेट” येथे ७० व्र्शानान्त्र वीज पोहचली हि बातमी पण द्यावी लागली. जवळपास प्रत्येक राज्यातच अशी काही “बेटे” होती जिथे ७० वर्षात वीज पोहचली नव्हती. त्या मुळे झाले काय कि, सरकारी आकडे कदाचित चुकले असतील पण सरकार वीज प्रत्येक गावात पोहचवायचे काम प्रामाणिक पणे करत आहे हे मात्र जनतेच्या मनात अगदी सकारात्मक पद्धतीने पोहचले. हीच गोष्ट “स्वच्छ भारत” योजनेतील संडास बांधकाम याला पण लागू होते. यातच कॉंग्रेस जो मोदी वरती आरोप करते कि, “काही झाले तरी कॉंग्रेसने ६० वर्षाच्या काळात काय काम केले हे दाखवा? मग देशाने प्रगती कशी केली?” याचे उत्तर परस्पर कॉंग्रेस आणि त्यांच्या बाजूने बोलणार्या प्रसिद्धी माध्यमांना मिळते कारण “न केलेल्या कामाची सूची” तर तेच काढून देतात ना !!   

अगदी “नोटबंदी” सारख्या सामान्य लोकांना त्रास झालेल्या योजनेच्या विरोधात तर भारतातील तमाम विरोधी पक्ष एकमुखाने समोर आले. या “नोटबंदी” कार्क्रमात भा.ज.प. ने स्वत: करोडो कमावले असा आरोप होऊन सुद्धा जनतेने भा.ज.प.लाच निवडून दिले ते का? याचेही कारण हेच कि, “ओरडणारे तेच आहे ज्यांचे यात नुकसान झाले.” असे भारतीय जनतेवर ठसविण्यास भा.ज.प. नेतृत्व सकारात्मक रित्या यशस्वी ठरले.

एक नक्कीच आहे कि गेल्या ७० वर्षात भारतीय मतदार अधिक सजग आणि राजकीय दृष्ट्या अधिक प्रगल्भ झाला आहे. त्याच मुळे सरकारच्या प्रत्येक कामा कडे त्याचे लक्ष आहे. “सोशल मिडिया” मुळे सरकारवरील सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया लगेच कळण्याची व्यवस्था पण झाली आहे, आणि भा.ज.प.ची स्वत:ची या नव मध्यमावर पकड चांगली आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही. कोणतेही सरकार त्याच्या समोर असलेल्या प्रत्येक आघाडीवर यशस्वी होईलच असे नाही, पण सरकार सकारात्मक पद्धतीने त्या समस्येला हात नक्कीच लाऊ शकतो आणि ते आम्ही करतो आहे हे भा.ज.प. नेतृत्व नक्कीच दाखवत आहे. कॉंग्रेसच्या आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारपेक्षा कार्यक्षम मंत्री या सरकार मध्ये आहेत, श्री. नितीन गडकरी, श्री पियुष गोयल, सुश्री सुषमा स्वराज हि यातील काही नवे आहेत आणि देशातील प्रत्येक प्रसिद्धी माध्यमांचे त्यांच्यावर चांगलेच “लक्ष” पण आहे. त्याच सोबत मोदींनी पण जे लोक काम करत नाही, त्यांचे लोढणे गळ्यात लटकवून न ठेवता त्यांना घरचा रस्ता दाखवत आपण जनतेच्या कामा करता किती गंभीर आहोत हे दाखवून दिले.  

विरोधी पक्षाच्या नकारात्मक राजनीती मध्ये “हिंदुत्वाला” सतत नकारात्मक पद्धतीने समोर आणणे पण त्याच्या राजकीय महत्वाकांक्षेला लगाम घालत आहे. “कर्नाटक” निवडणुकीच्या निकालाने हे अजून प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे विशेषत: कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा मत मिळवण्यासाठी हिंदू मंदिर आणि मठ - महाराज यांचे उंबरठे आपले डोके टेकवून झिजवत होते नेमके त्याच वेळेस “हिंदू” धर्माचा एक पंथ म्हणून मान्यता असलेल्या “लिंगायत” पंथाला तीच कॉंग्रेस वेगळा “धर्म” म्हणून मान्यता द्यायला आणि या गोष्टीचा राजकीय फायदा घ्यायला उत्सुक होती हा विरोधाभास पण भारतीय जनते समोर आला आणि कॉंग्रेसच्या तथाकथित “सॉफ्ट हिंदुत्वाचा” बुरखा टराटरा फाडून गेला. या उलट भा.ज.प. ने मुस्लीम महिलांच्या जिव्हाळ्याच्या “तीन तलाक” मुद्याला हात घालून आपण राजकारणात आणि सामाजिक एकतेच्या कार्यक्रमात धर्माला उभे करत नाही हे दाखून दिले. 

“संघटन” हि भा.ज.प. च्या यशातील अजून एक महत्वाचा “भाग” आहे. भा.ज.प.चे स्वत:च्या संघटने सोबतच त्याला जगातील सगळ्यात मोठ्या “सांस्कृतिक संघटन” असलेल्या “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची” साथ लाभली आहे, त्याच सोबत रा.स्व.सं. च्या सोबत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम या सारख्या अनेक छोट्या मोठ्या संघटना, हजारो व्ययक्तिक रित्या काम करणारे स्वयंसेवक यांची अख्खी फौज “सोशल मिडिया” पासून तर अगदी निवडणुकांमध्ये “बूथ लेव्हल” पर्यंत काम करते. याचाच फायदा अगदी आसाम पासून तर कर्नाटक पर्यंतच्या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळत आहे. सोबतच अमित शहा याची कुटनीतिक राजकारण आणि काही वेळेला “नैतिकता” गुंडाळून, संविधानिक संकेत हवे तसे वाकवत  कॉंग्रसला त्याच्याच भाषेत देत असलेले उत्तर जे त्यांनी गोवा, मिझोरम, बिहार मध्ये दाखवले ते “खरे” राजकारण पण कारणीभूत आहे.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सरकारवर अजून न झालेला “भ्रष्टाचाराचा आरोप”. विरोधकांनी कितीही बोंब मारली तरी अजूनही सिद्ध करता येणे तर दूर पण निदान नाव ठेवता येईल असा एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण विरोधक समोर आणू शकले नाही. कॉंग्रेसच्या गेल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत सामान्य लोकांना मोजता पण येणार नाही अश्या “कोटीच्या कोटी उड्डाणे” घेत असलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे या सरकारची काही बाहेर आली नाही. “राफेल सौद्या” वर राहुल गांधी यांनी कितीही भ्रष्टाचाराचा आरोप केला असला तरी सरकारच्या स्पष्टीकर्णावर जनतेचा विश्वास आहे असेच परिस्थिती वरून वाटते. या उलट राहुल गांधी पासून लालू यादव पर्यंत सगळे विरोधक कोणत्या न कोणत्या “भ्रष्टाचाराच्या प्रकरणात” एकतर शिक्षा भोगत आहे किंवा न्यायालयीन प्रक्रियेत तरी अडकलेले आहेत आणि एकेकाळी भा.ज.प. नेत्यांवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करणारे "आप" चे अरविंद केजरीवाल सगळ्या भा.ज.प. नेत्यांना "माफीनामे" पाठवत आहेत. 

या सगळ्या “चक्रव्हुहात” अडकलेले विरोधक २०१९ साली भा.ज.प. ला कशी मात देतात हे बघणे नक्कीच मनोरंजक ठरेल. आपला हा “यशाचा आलेख” भा.ज.प. पुढील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांच्या निवडणुकीत कायम ठेवत दमदार पणे २०१९ ला भा.ज.प. सामोरा जातो कि विरोधक या “चक्रव्हुहातून” बाहेर पडत भा.ज.प. ला त्यात अडकवत त्याचा “यशाचा अश्व” कसे रोखतात हे बघणे खरेच उद्बोधक आणि तितकेच मनोरंजक होईल.     

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा