डॉ. हेडगेवार यांनी "संघाला" राजकारणापासून जाणून अलिप्त ठेवले होते. जरी त्यांचा पिंड हा "काँग्रेसच्या" मुशीतच तयार झाला होता, तरी त्यांनी संघ कार्य वाढवण्यासाठी संघ आणि राजकारण यात अंतर ठेवले. याचा अर्थ असा नव्हे की "संघ स्वयंसेवक" राजकारण करत नव्हते, ते नक्कीच राजकारणाचा भाग बनू शकत, फक्त संघाचा आजच्या सारखा कोणता "राजकीय पक्ष" नव्हता. त्या मुळे स्वयंसेवक "हिंदू महासभे" पासून "काँग्रेस" पर्यंत कोणत्याही पक्षाचे काम करत. अजून संघ "राजकीय दृष्ट्या अस्पृश्य" ठरण्याइतका मोठा झाला नव्हता.
त्या नंतर गोळवलकर गुरुजी 1940 ला सरसंघचालक बनले. तेव्हा भारताच्या स्वातंत्र्याचे वारे जसे वाहत होते तसेच भारताच्या "धार्मिक फाळणीचे" पण वारे वाहू लागले. "संघ विचार" जरी "हिंदुत्वा" कडे झुकणारे असले तरी ते तेव्हा काय किंवा आताही "कडवे" नव्हते, त्या मुळे वैचारिक दृष्ट्या संघ विचारच्या जवळ असूनही "हिंदू महासभे" सोबत अनेक मुद्यांवर एकमत नव्हते. त्यात फाळणीच्या निमित्ताने अनेक "हिंदुत्ववादी विचारांचे" लोक या दोन्ही बाजूंना जाऊन मिळाले. पण गुरुजी तेव्हा पण संघाला "राजकारणा" पासून वेगळे ठेऊनच कार्य करत होते. याचे उदाहरण म्हणजे "संघ स्वयंसेवक" जेव्हा फाळणीच्या आगीत होरपळणाऱ्या "हिंदूंना" मदत करत होते त्याच वेळेस काश्मीर मध्ये "भारतीय सेनेला" मदत पण करत होते. जरी। पं. नेहरूंना "हिंदुत्ववादी" विचार पटत नसले तरी "फाळणीच्या" वेळेस घेतलेली जास्त कडवी भूमिका "हिंदू महासभेची" होती, संघ त्यातल्या त्यात "मवाळ" भमिकेत होता. या मुळे नेहरूंनी या कामाचे श्रेय °संघाला" दिले पण. याच मुळे असेल पण नथ्थुराम गोडसे चा प्रवास पण "संघ" मार्गे "हिंदू महासभे" पर्यंत झाला. त्याचे पर्यवसान "गांधी खुनात" झाले आणि संघावर पहिली बंदी आली.
गांधीना संघाचा "वैचारिक विरोध" असला तरी त्यांचा "खून" करावा हा संघाचा विचार कधीच नव्हता, त्या मुळे संघांविरुद्ध तसे पुरावे मिळणार नाही हे "गुरुजींना" पक्के माहीत होते. त्या मुळे गुरुजी या बाबतीत सरकारशी जुळवून घेण्याच्या मनस्थितीत होते. तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी हे राजकारण बरोबर साधले आणि "संघ" म्हणजे नक्की काय? हा भ्रम दूर करण्यासाठी त्याला "सांस्कृतिक संघटन" बनवण्याचा प्रस्ताव "गुरुजींसमोर" ठेवला आणि तो मान्य करत संघाने सरकार दरबारी तशी नोंदणी पण केली.
गोळवलकर गुरुजी संघाने राजकारण करण्याच्या विरोधी नव्हते मात्र ते "राजकारण" कसे करावे या बाबतीत संघात वेगवेगळे विचार असतीलही, पण परिस्थिती अशी होती की आता सारखे "संघ नियंत्रित" राजकारण तेव्हा करू शकले नाही, समजा "गांधी हत्येचा" ठपका संघावर आला नसता तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. त्या ठपक्या मुळे आणि सरदार पटेल यांच्या चाणाक्ष खेळी मुळे "संघ" आणि "राजकारण" यांच्यातील दरी काही वर्षे अजून वाढली.
गांधी हत्ये नंतर "हिंदू महासभेचा" भारतीय राजकारणातील प्रभाव नष्ट होत गेला, सोबतच पटेल यांनी चाणाक्ष पणे संघाला "सांस्कृतिक संघटने" च्या रूपात गुंतवल्या मुळे तसेच स्वतः संघाचे लक्ष "राजकारण " नसल्याने भारताच्या "हिंदुत्ववादी राजकारणात" पोकळी तयार झाली. ती दूर करायला काही "हिंदुत्ववादी नेते" आणि संघ स्वयंसेवक यांनी मिळून 1952 साली "भारतीय जनसंघ" हा पक्ष सुरू केला. या पक्षावर संघाचा कोणताही दबाव नव्हता, पण संघा करता हा पक्ष सगळ्यात जवळचा पक्ष होता हे नक्की.
1973 मध्ये सरसंघचालक म्हणून बाळासाहेब देवरस रुजू झाले. त्याच वेळी भारतात वेगळा "राजकीय खेळ" सुरू झाला. जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेले सरकार विरोधी आंदोलन, त्याला लोकांचा मिळत असणारा प्रतिसाद, सोबत खुद्द आपल्याच पक्षात उठणारे विरोधी सूर या वर मात करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी देशात "आणीबाणी" लागू केली. ही संघवरील दुसरी बंदी होती जी पूर्णपणे "राजकीय" विचाराने प्रेरित होती, "संघाचा" वाढत प्रभाव याला कारणीभूत होता. "संघ आणि बाळासाहेब देवरस" यांनी या आलेल्या संकटाचा आपल्या "संघटनेसाठी" योग्य उपयोग तर केलाच सोबतच या वेळेस संघ पूर्ण पणे आणि उघड पणे प्रथमच "राजकारणात" उतरला. पुढे "भारतीय जनसंघ" "जनता पार्टीत" विलय करून घेऊन समाजवाद्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत पण आला. "जनता पक्षाच्या" फटफुटीत समाजवाद्यांचे आपसातील हेवेदावे जसे कारणीभूत होते, तसेच "संघ स्वयंसेवकांचे" दुहेरी सदस्यत्वाचा वाद पण कारणीभूत ठरला. या वरून पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या.
या सगळ्यात एक विचार प्रकर्षाने समोर आला तो म्हणजे "संघ" विचारांचा पक्ष उभा राहायला हवा. मग असा पक्ष उभा राहायला तर त्या वर नियंत्रण पण करायला हवे ज्या करता आज पर्यंत संघ कधीच तयार नव्हता. पण या काळात देशात वाढत जाणारी फुटीरता चळवळ आणि ती वाढवायला त्याला आपल्या "सत्तेच्या राजकारणा" पाइ मदत करणारे काँग्रेस नेतृत्व याच सोबत निष्प्रभ झालेले विरोधी पक्ष, या परिस्थितीला शह देण्याचे आव्हान सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी स्वीकारले आणि "संघाचे" नियंत्रण असलेला "भारतीय जनता पक्ष" अस्तित्वात आला.
अजूनही "संघ" स्वतः राजकारण करत नाही. पण भारतीय राजकारणाची "दिशा" मात्र कधीही बदलू शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा