“कारवान” या वेबसाईटने निरंजन टकले नावाच्या पत्रकाराची स्व. न्यायमूर्ती लोया
यांच्या हृदयविकाराने झालेल्या मृत्यूवर लिहलेली “शोध कथा” छापली आणि एका न्यायमूर्तीच्या
मृत्यूवर शंकेचे ढग तर जमा झालेच, पण या कथेमुळे भा.ज.प. चे राष्ट्रीय
अध्यक्ष्यांच्या विषयी पण संशयाचे धुके तयार केले.
कोण होते हे न्यायमूर्ती लोया?
न्यायमूर्ती बृजमोहन लोया हे CBI च्या विशेष कोर्टाचे न्यायधीश. त्यांच्या
कोर्टात “सोहराउद्दीन फेक एन्काऊंटर” चा खटला सुरु होता आणि आरोपी होते अमित शहा.
ते एका लग्ना करता नोव्हेंबर २०१४ मध्ये “नागपुरात” आले आणि येथे त्यांचा
हृदयविकाराने मृत्यू झाला. तर आपले “पुरोगामी शोधपत्रकार” श्रीमान निरंजन टकले
यांना यात घातपात वाटतो. खाली त्याचा प्रकाशित रिपोर्ट देत आहे.
या रिपोर्ट मुळे भारतातील समस्त पुरोगामी पत्रकार, समाजसेवक आणि नेत्यांना
भारतात “हिटलरशाही” असल्याचा दिव्य सात्क्षाकार झाला. लगेच निखील वागळे पासून विश्वाम्भर
चौधरी सारखे समाजसेवक, सीताराम येचुरी पासून अरविंद केजरीवाल सारखे नेते या रिपोर्ट
वरून काहूर माजवायला लागले. गुजरात राज्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कॉंग्रेस पण
नथीतून तीर मारू लागला.
या लोकांचे दुर्दैव असे कि त्यांनी अशा माणसावर विश्वास टाकला ज्याने या आधी
अशीच “शोध पत्रकारितेचा” दावा करत स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पण घाणेरडे आरोप केले
आणि तोंडघशी पडला होता.
पण या वेळी तर श्रीमान टकले यांचा दावा तर पार उडून चालला आहे. कारण विवेक देशपांडे आणि मयुरा जानवलकर
(नागपूर/लातुर) या दोन इंडियन
एक्सप्रेसच्या पत्रकारांनी या श्रीमान टकले यांच्या या रिपोर्टवर त्याच्या रिपोर्ट
करून, श्रीमान निरंजन टकले याची पत्रकारिता किती भंपक आहे हे दाखून दिले.
या इंडियन एक्सप्रेस च्या रिपोर्टचा मराठी अनुवाद श्री. राजेश कुलकर्णी यांनी
केला असून तो खाली देत आहे.
लेखक: विवेक देशपांडे आणि मयुरा जानवलकर (नागपूर/लातुर) २७ नोव्हेंबर २०१७
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेस व मार्क्सवादी पक्षाचे नेते व दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधिश ए पी शाह यांनी सोहराबुद्धिन चकमक मृत्यु प्रकरणाची सुनावणी करणार्या सीबीआय न्यायाधीशांच्या २०१४मधील मृत्युच्या चौकशीची मागणी केली आहे. मृत न्यायाधीश ब्रिजमोहन हरकिशन लोया यांच्या मृत्युमागील संशयास्पद कारणे व ती दडपून टाकण्यावरून त्यांच्या वडलांनी व बहिणीने केलेल्या आरोपांबद्दल मागच्या आठवड्यात कॅरॅव्हॅन या नियतकालिकामध्ये आलेल्या लेखाच्या संदर्भात त्यांनी ही मागणी केली आहे.
उपलब्ध नोंदींप्रमाणे लोया, ४८, यांचे आता मुंबई न्यायालयात न्यायाधीश असलेल्या आपल्या सहकारी न्यायाधीश स्वप्ना जोशी यांच्या मुलीच्या लग्नासाठी व रिसेप्शनसाठी नागपूरला गेले असता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
कॅरॅव्हॅनमधील यासंबंधीच्या लेखासंबंधी इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचा घटनाक्रम हॉस्पिटलमधील नोंदी, लोया यांच्या कुटुंबाच्या सदस्यांसह नागपूर-लातुर-मुंबईमधील साक्षीदारांची भेट घेत पुन्हा उभा केला. यात त्यांनी लोया यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, पोलिस कर्मचारी आणि न्या. लोया यांच्या मृत्युसमयी हॉस्पिटलमध्ये हजर असलेल्या उच्च न्यायालयाच्या दोघा न्यायाधीशांशीही संवाद साधला.
या तपासावरून असे उघड झाले की कॅरॅव्हॅनमधील लेखामधील हॉस्पिटलमधील इसीजी मशिन चालत नसल्याच्या, न्यायमूर्तींचा मृतदेह जवळजवळ बेवारस असल्यासारखा सोडून देणे, तो कोणाचीही सोबत न देता लोया यांच्या लातुरजवळच्या गावी पाठवणे असे कॅरॅव्हॅन नियतकालिकातील लेखातील महत्त्वाचे वाटावेत असे दावे वास्तवाला धरून नसल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून खरे नसल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या तपासातून उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून व नोंदींवरून समोर आले आहे.
महत्त्वाचे हे की मुंबई न्यायालयाचे दोन न्यायमूर्ती न्या. भूषण गवई आणि सुनील शुक्रे हे दोघेही मृत्युच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेले व त्यांनीच मृतदेह न्या. लोया यांच्या गावी हलवण्याची व्यवस्था केली. हे दोघेही न्यायाधीश एक्सप्रेसशी बोलले व त्यांनी सारा घटनाक्रम सांगितला. त्यांनी न्या. लोया यांच्या मृत्युशी संबंधी कोणताही संशय घेण्यासारखे काही नसल्याचे सांगितले.
सोहरबुद्दिन शेख याच्या चकमकप्रकरणी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे सहआरोपी असलेल्या प्रकरणाची सुनावणी न्या. लोयांसमोर होत होती. शहा यांची नंतर निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात सुरू होत आहे. शहा यांच्या सुटकेविरूद्ध सीबीआयने अद्याप अपिल दाखल केलेले नाही.
छातीत दुखणे – दंदे हॉस्पिटलकडे
३० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या लग्नानंतर ज्यावेळी १ डिसेंबरला पहाटे चार वाजता छातीत दुखत असल्याची तक्रार न्या. लोया यांनी केली तेव्हा ते नागपूरच्या सिव्हिल लाइन्स भागातील रवी भवन अतिथीगृहात मुक्कामाला होते.
त्यावेळच्या घटनाक्रमाला उजाळा देत न्या. भूषण गवईंनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “न्या. लोया आपले सहकारी न्यायाधीश श्रीधर कुलकर्णी आणि श्रीराम मधुसूदन मोडक यांच्याबरोबर राहिले होते. त्यांना पहाटे चारच्या सुमारास त्रास सुरू झाला. (स्थानिक न्यायाधीश) विजयकुमार बर्डे आणि तेव्हाचे नागपूर खंडपीठाचे उपरजिस्ट्रार असलेले रुपेश राठी यांनी त्यांना प्रथम तीन किमीवर असलेल्या दंदे हॉस्पिटलमध्ये नेले. त्यावेळी दोन गाड्या नेल्या होत्या.”
“त्यांना रिक्षामध्ये (कॅरॅव्हॅनच्या लेखात दावा केल्याप्रमाणे) नेण्याचा प्रश्न नव्हता.” न्या. शुक्रे यांनी सांगितले, “न्या. बर्डे यांनी स्वत:च्या गाडीतून व स्वत: गाडी चालवत त्यांना दंदे हॉस्पिटलमध्ये पोहोचवले.”
दंदे हॉस्पिटलमध्ये इसीजी का काढण्यात आला नाही असा प्रश्न कॅरॅव्हॅनच्या लेखात आणि न्या. लोया यांच्या बहिणीने विचारला होता. मात्र उपलब्ध नोंदींप्रमाणे इसीजी काढला गेला होता व इंडियन एक्सप्रेसने त्याची प्रत मिळवली आहे.
हॉस्पिटलचे संचालक पिनाक दंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “ त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये पहाटे पावणेपाच-पाच वाजता आणले गेले होते. आमच्याकडे २४ तास सेवा मिळते. तेथे उपस्थित असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकार्याने त्यांना तपासले. इसीजी काढल्यानंतरच आमच्या लक्षात आले की न्या. लोया यांना हृदयविकारासंबंधीच्या विशेष उपचारांची गरज आहे. आमच्याकडे ती उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे ते मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये गेले.
मेडिट्रिनाचे संचालक समीर पालतेवार यांनी बोलण्यास नकार दिला तरी इंडियन एक्सप्रेसने मिळवलेल्या तेथील नोंदी न्या. लोयांना ते हॉस्पिटलमध्ये आणले जात असताना ‘रेस्ट्रोस्टेमल चेस्ट पेन’ झाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे दाखवतात.
मेडिट्रिनामध्ये मृत्यु – न्यायाधीशांचे आगमन
हॉस्पिटलमध्ये आणल्या-आणल्या त्यांचा श्वास सुरू होण्यासाठी कृत्रिम उपाय सुरू केले गेले. २०० ज्यूल्स तीव्रतेचे विजेचे झटके अनेक वेळा देण्यात आले. कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन नेहमीच्या पद्धतीप्रमाणे चालू ठेवले गेले. हे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले असे लोयांवरील मेडिट्रिनाच्या फाइलमध्ये उल्लेख आहे.
मेडिट्रिनामध्ये न्यायाधिश येऊन दाखल झाले. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना न्या. गवई म्हणाले, “ मला उच्च्य न्यायाल्याच्या रजिस्ट्रारकडून फोन आला. नागपूर खंडपीठाचा सर्वात वरिष्ठ व प्रशासनिक न्यायाधीश या नात्याने मी न्या. शुक्रे यांच्याबरोबर ताबडतोब मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये गेलो. मी माझ्या ड्रायव्हरचीही वाट पाहिली नाही आणि मीच गाडी चालवत गेलो. मुख्य न्यायाधीश मोहित शहा हेदेखील न्या. स्वप्ना जोशी यांच्या मुलीच्या लग्नाला आले होते. त्यांच्यासह आणखी काही न्यायाधीश तेथे पोहोचले. लोया यांचे प्राण दुर्दैवाने वाचवता आले नाहीत. त्यांच्या मृत्युशी व त्याच्याशी संबंधित घटनांमध्ये अक्षरश: काहीही संशयास्पद नव्हते.
न्या.शुक्रे म्हणाले, “मी व न्या. गवई असे दोघेही मेडिट्रनामध्ये गेलो. त्यावेळचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहादेखील नागपूरमध्ये होते. त्यामुळे मी त्यांच्या मुख्य खासगी सचिवाला फोन करून त्याबाबत कळवले. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा न्या. लोया आयसीयुमध्ये होते. मुख्य न्यायधीशही तेथे पोहोचले. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्याची शर्थ केली आणि तेथे उपस्थित असलेल्या न्यायाधीशांनीही शक्य ते केले.
हॉस्पिटलच्या प्रशासनाने एक डिसेंबरला सकाळी सहानंतर लगेचच लोया यांना मृत घोषित केले आणि मृत्युचे निश्चित कारण कळण्यासाठी पोस्टमॉर्टेम करण्याचा सल्ला दिला.
कॅरॅव्हॅनच्या लेखात असा दावा करण्यात आला होता की ‘मृताच्या चुलत भावाने’ मृतदेह घेतला होता आणि न्या. लोया यांच्या वडलांनी म्हटले, “माझा कोणीही भाऊ किंवा चुलत भाऊ नागपूरमध्ये नाही. त्यामुळे पोस्ट मॉर्टेम रिपोर्टवर कोणी सही केली हा आणखी एक प्रश्न अनुत्तरीत आहे.”
इंडियन एक्सप्रेसने रिपोर्टवर सही केलेल्या व्यक्तीला शोधले. तिचे नाव प्रशांत राठी, स्वत: डॉक्टर. राठींनी मृतदेह ताब्यात घेतला होता.
त्या सकाळच्या घटना आठवत राठी म्हणाले की त्यांना त्यांचे काका (मावशीचे पती) रूख्मेश पन्नालाल जकोटिया यांच्याकडून फोन आला होता. “त्यांनी सांगितले की त्यांच्या चुलत भावाला (न्या. लोया) मेटिट्रिना हॉस्पिटलमध्ये दाखले केलेले आहे आणि त्यांना मदत करण्यास सांगितले. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा तेथील डॉक्टरांनी मला सांगितले की ते (न्या. लोया) आता या जगात नाहीत. मी ही गोष्ट माझ्या काकांना कळवली. त्यांनी तेथील औपचारिक गोष्टींची पूर्तता करण्यास मला सांगितले”, राठी यांनी सांगितले.
राठी यांनी आणखी सांगितले, “ तेथे न्या. भूषण गवई यांच्यासह सात-आठ न्यायाधीश होते. त्यांनी सांगितले की पोस्टमॉर्टेम करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे सीताबर्डी पोलिस स्टेशनमधून एका ज्येष्ठ पोलिस अधिकार्यारला पंचनामा करण्यासाठी बोलावण्यात आले.”
पोस्ट-मॉर्टेम, घराकडे प्रयाण
नागपूरमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात १०:५५ ते ११.५५ या दरम्यान पोस्टमॉर्टेम करण्यात आले. कोणत्याही विषप्रयोगाचा वा गैरप्रकाराचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे त्या अहवालात म्हटले आहे.
पोस्टमॉर्टेम करण्याच्या थोडा वेळ आधी राजेश धांडे व रामेश्वर वानखेडे या दोन पंचांच्या हजेरीत मृतदेकावरील वस्तुंचा पंचनामा करण्यात आला.
पोस्ट मॉर्टेम पूर्ण होऊन कागदपत्रांवर सही करून मृतदेह दोघा अधिकार्यांसह व एका पोलिस हवालदारासह लातुरला रवाना करेपर्यंत आपण तेथे हजर असल्याचे राठी यांनी सांगितले.
कॅरॅव्हॅनच्या लेखात दावा केलेल्या लोया यांच्या शरीरावरील रक्ताच्या डागांबद्दल एका वरिष्ठ सरकारी फॉरेन्सिक तज्ज्ञाने सांगितले, “पोस्टमॉर्टेमदरम्यान रक्त बाहेर येणे साहजिक आहे; कारण त्यादरम्यान शरीरातील सर्व मोठ्या पोकळ्या उघडल्या जातात. शरीरावर घातलेल्या टाक्यांमधून कधीकधी रक्त बाहेर येऊ शकते.”
लोया यांच्या मृतदेहाबरोबर लातुरला पाठवलेल्या अँब्युलंसमध्ये ड्रायव्हरखेरील कोणीच नसल्याचे लोया यांची बहिण अनुराधा बियाणी यांनी म्हटल्याचा उल्लेख कॅरॅव्हॅनच्या लेखात आहे.
मात्र न्या. गवई यांचे म्हणणे वेगळे आहे.
“मी मुख्य जिल्हा न्यायाधीश के के सोनावणे यांना स्वत: सांगितले होते की मृतदेहाबरोबर दोन न्यायाधिशांना पाठवा.”, न्या. गवई यांनी सांगितले. “योगेश रहांगदाळे व स्वयम चोपडा हे ते दोघे कनिष्ठ डिव्हिजनचे दिवाणी न्यायाधीश होते. वातानुकूलित अँब्युलंसमधून ते गेले. रस्त्यामध्ये वातानुकूलन व्यवस्था बंद पडली तर बर्फाच्या लाद्याही बरोबर पाठवण्यात आल्या होत्या.”
रहांगदळे यांच्या कारमधून हे न्यायाधीश अँब्युलन्सबरोबर गेले. उच्च न्यायालयात नेमलेला ड्रायव्हर एका वाहतुक पोलिस हवालदारासह त्यांना तिकडे घेऊन गेला.
“नांदेडच्या थोडे पुढे गेल्यावर गाडीच्या प्रवासात थोडा वेळ खंड पडला.”, न्या. गवई म्हणाले. अँब्युलन्स लातुरला पोहोचली तेव्हा तेथे काही सहकारी न्यायाधीश उपस्थित होते.
अँब्युलन्सबरोबर गाडीतून गेलेले दोघे न्यायाधीश व हवालदार प्रशांत तुळशीराम ठाकरे यांना लातुरला पोहोचण्यास उशीर झाला.” त्यांच्या गाडीच्या प्रवासात खंड पडण्याचे कारण गाडीला दुसरी गाडी चाटून गेली हे होते. त्यामुळे त्याठिकाणी १५ मिनिटे थांबावे लागल्यानंतर त्यांची गाडी गातेगावकडे मार्गस्थ झाली.
गातेगावला पोहोचल्यानंतर हे दोघेही न्यायाधीश न्या. लोया यांच्या वडलांना भेटले आणि लोया यांच्या घराजवळील एका शेतामध्ये अंत्यविधी होईपर्यंत थांबले. याशिवाय इंडियन एक्सप्रेसने न्या. लोया यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधल्यासंबंधीची खालील वेगळी बातमी छापली आहे.
२०१४मधील न्या. लोया यांचा मृत्यु: आम्ही कधीही शोक आवरू शकणार नाही – न्या. लोया यांचे कुटुंबीय
लेखक: मयुरा जानवलकर – लातुर – २७ नोव्हेंबर २०१७ इंडियन एक्सप्रेस
न्या. ब्रिजमोहन लोया यांच्या २०१४मधील मृत्युनंतर आजही त्यांच्या लातुरमधील कुटुंबियांना त्यांना गमावलेले असल्याच्या वास्तवाला तोंड देणे कठीण होऊन बसलेले आहे. त्यांच्यापैकी काहीजणांनी ४८व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने झालेल्या त्यांच्या मृत्युच्यावेळच्या परिस्थितीबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत तर काही जणांनी त्यांच्या दु:खाव्यतिरिक्त काही सांगण्यासारखे नसल्याचे इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
लातुरच्या पद्मानगरमध्ये राहणारी लोयांच्या सहा बहिणींपैकी सर्वात लहान असलेल्या पद्मा रणदाद म्हणतात, “माझ्या भावाला गमावल्याच्या दु:खावर कधीच मात करता येणार नाही. आम्हाला दुसर्या कशात पडायचे नाही.” त्यांचीच बहिण अनुराधा बियाणी यांनी केलेल्या दाव्यांबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, “माझ्या बहिणी काय म्हणत आहेत त्याबद्दल मला काही माहित नाही. आम्ही कशातच (गुंतलेलो) नाही. त्या हे सारे स्वत:च करत आहेत.”
पद्मा यांचे गातेगावमध्ये शिक्षक असलेले पती ओंकार रणदाद म्हणतात, “आम्ही याबाबत काहीबोलू इच्छित नाही. आम्ही आमचे जीवन शांतपणे जगणारी साधी माणसे आहोत.”
न्या. लोयांचे काका श्रीनिवास लोया यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की त्यांची पुतणी अनुराधा हिने न्या. लोया यांच्या मृत्युसंबंधात महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. दोघा न्यायाधिशांनी यात काहीच संशयास्पद नाही असे सांगितल्याचे त्याना कळवले असता ते म्हणाले, “तसे असेल तर त्यांच्या कुटुंबाला त्याबद्दल ताबडतोब का कळवण्यात आले नाही? त्यांनी किमान त्यांच्या पत्नीला तरी कळवायला हवे होते.”
धुळ्यामध्ये डॉक्टर असलेली न्या. लोयांची बहिण अनुराधा बियाणी, औरंगाबादमध्ये शिक्षक असलेली बहिण सविता मंधाने आणि न्या. लोया यांचे वडील हरीकिशन यांच्याशी संपर्क साधण्याचा इंडियन एक्सप्रेसने प्रयत्न केला. या सर्वांनी कॅरॅव्हॅन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतींमध्ये प्रश्न उपस्थित केलेले होते. मात्र या सर्वांचेच मोबाईल फोन बंद होते. लातुरपासून ३० किमीवरील गातेगाव या गावच्या हरीकिशन यांचे घर बंद असल्याचे इंडियन एक्सप्रेसला आढळले.
लोया यांचे काका श्रीनिवास यांनी सांगितले की त्यांचा ठावठिकाणा अगदी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही माहित नाही. “गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याशी कसलाही संपर्क झालेला नाही”, ते म्हणाले.
लोया कुटुंबियांशी परिचय नसूनही लोया यांच्या मृत्युनंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा व ते रास्वसंघाचा कार्यकर्ता असल्याचा दावा करणारे कॅरॅव्हॅनने उल्लेख केलेले ईश्वर बाहेती यांच्याबद्दल विचारले असता ते खरे तर न्या. लोया यांचे मित्र असल्याचे पद्मा यांनी सांगितले. “लातुरला आल्यावर न्या. लोया प्रत्येक वेळी डॉ. चेतन सारडा, डॉ. जाजू आणि डॉ. हंसराज बाहेती यांच्याकडून तपासणी करून घेत असत.” असे काका श्रीनिवास यांनी सांगितले. ईश्वर बाहेती यांचे भाऊ असलेले डॉ. बाहेती यांच्याशी इंडियन एक्सप्रेसने संपर्क साधला असता त्यांनी मात्र ते या विषयावर काही बोलू इच्छित नाहीत असे सांगितले.
अनेकदा फोन करून व एसएमएस पाठवूनही न्या. लोया यांची पत्नी शर्मिला यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
फक्त "नागपुरात" झालेला न्यायमूर्ती लोया यांचा दुर्दैवी मृत्यू आणि "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे" असलेले "नागपूरशी सबंध" याच "सुता" वरून "स्वर्ग" गाठायचा प्रयत्न करणारे पुरोगामी पत्रकार कोणत्याही गोष्टीत
कारण नसतांना RSS, भा.ज.पा. यांना आणि विशेष म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी
यांना कसे गुंतवतात हे तर आपण २००० साला पासून बघत आहोत. निरंजन टकले हे पण सवंग
लोकप्रियता आणि पोटभरू पत्रकारितेच्या मागे लागून असले उद्योग करत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा