भारत पूर्वी पासूनच "एक राष्ट्र" आहे

                  
   
                      अनेकदा चर्चेत मत देतांना अनेक लोक भारताला एक “राष्ट्र” म्हणून घेण्यास तयार नसतात. विशेषत: “डाव्या विचारसरणीचे”. त्यानी केलेल्या “राष्ट्र” या व्याख्येच्या संकल्पनेत “भारत” एक “राष्ट्र” म्हणून बसत नाही असे यांचे म्हणणे आहे. हे तर अजून हास्यास्पद आहे आणि त्याची “पोथीनिष्ठता” अधोरेखित करणारी आहे.

                           हे खर आहे, १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात ३०० च्या वर वेगवेगळी संस्थान होती आणि त्यांना भारतात विलीन करून घेतांना स्व. वल्लभभाई पटेल यांना बराच आटापिटा करावा लागला. त्याच बरोबर भारताची फक्त “धार्मिक” कारणावर फाळणी पण झाली. त्याच बरोबर भारतामध्ये अनेक भाषा, विचारधारा, मान्यता, खाद्यसंस्कृती याच बरोबर परंपरेच्या जोखडाखाली पिचलेला एक खूप मोठा जनसमुदाय होता किंवा अजूनही आहे. तरी भारत एक “राष्ट्र” म्हणून उभे राहिलेच, पण निरंतर प्रगती पण करत राहिले. हे कसे घडले? याचा विचार विदेशी किवा आधुनिक “राष्ट्र” संकल्पने प्रमाणे विचार करणार्यांना पडत नाही याचे वाईट वाटते.

                       प्रथम एक नजर या वर टाकू कि जगात असलेले देश कोणत्या कारणाने “राष्ट्र” म्हणून पुढे आलेत. जगात मुख्यत: भौगोलिक समानता, वंश, भाषा, धर्म अशा मुद्यांवर समूह एकत्र येवून कालांतराने त्याचे “राष्ट्र” बनले आहे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळे मुद्दे “राष्ट्र” निर्मिती वर प्रभाव टाकत राहिले. काही उदाहरण मी खाली देत आहे. जे “राष्ट्र” म्हणून एकत्र आले आणि जगावर राज्य करणारे झाले.

                    “युनाईटेड किंगडम” भारतावर १५० वर्षे राज्य करणारा हा देश पण मुख्यत: तीन देश किवा संस्थाने मिळून बनला आहे. १) इंग्लंड २) स्कॉटलंड ३) वेल्स या तीन देशांचे इ. स. ९२७ साली एकत्रीकरण झाले. पण त्याही अगोदर इ.स. ५०० पूर्वी ७ वेगवेगळ्या राज्यात विभागलेला होता आणि त्यांची पण आपसात धमासान युद्ध पण होत. एव्हडेच नाही तर आधुनिक काळात पण “स्कॉटलंड” पण या देशातून फुटण्याची हिंसक चळवळ अगदी ९० च्या पर्यंत चालवत होता. हे भौगोलिक एकसंधता आणि धर्म या तत्वावर एक झालेले “राष्ट्र” होते.

                  “जर्मन” जर्मन राष्ट्र पण वेगवेगळे “जर्मन” भाषिक ३०० संस्थाने एकत्र करून बनला आहे. यातील बरीचशी संस्थाने नंतर प्रशिया, बेव्होरीया या संस्थानात गेली होती. ओटोमान बिस्मार्क याने १६७१ पर्यंत आता दिसणाऱ्या एकत्रित जर्मनीचा पाया तयार केला. विशेष म्हणजे आधुनिक युगात पण जर्मनी दोन वेळा तुटला आणि पुन्हा एकत्रित झाला. पण “राष्ट्र” म्हणून ते अबाधित राहिले.

                इटली पण असेच अनेक राज्य एकत्र करून बनलेला देश आहे. “गरीबल्डी” हे नाव आपण ईतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. या माणसाच्याच पुढाकाराने १८६० साली इटली या “राष्ट्राची” पायाभरणी झाली. पुढे अनेक वर्षे ती सुरु राहिली आणि आजच इटली “राष्ट्र” आपल्याला दिसत आहे.
            
                जगातील प्रत्येकच “राष्ट्र” कधी ना कधी कोणत्या न कोणत्या कारणांनी एकत्र आली आणि नंतर मजबूत “राष्ट्र” म्हणून जगासमोर आली. मग “भारतालाच” वेगळा न्याय का?

                 मुळातच “राष्ट्र” एका रात्रीतून उदयाला येत नाही आणि संघर्षाशिवाय तर नाहीच नाही. हा संघर्ष कधी रक्तलांच्छित असतो, कधी भावनिक तर कधी वैचारिक. अश्या अनेक आंदोलनातून गेल्यावर “राष्ट्र निर्मिती” होत असते. यात राजकीय, सामाजिक, वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक असे अनेक घटक काम करत असतात.

                   भारताच्या दृष्टीने विचार केल्यास इथे “धार्मिक किवा सांस्कृतिक” घटकाने अधिक काम केलेले आहे. कोणाला आवडो अथवा न आवडो, भारताच्या ईतिहासाचे कोणी काही अर्थ लावो, याला कोणीही नाकारू शकत नाही. तुम्ही याला “वैदिक” म्हणा, “सनातन” नाही तर “हिंदू” पण या “धार्मिक किवा सांस्कृतिक” घटकांमुळे “भारतीय उपमहाव्दिप” मधील सगळी जनता एकमेकांना बांधल्या गेलेली होती. भारताचा मुद्देसूद ईतिहास जरी “अलेक्झांडर” च्या नंतरच्या काळापासून असला तरी त्या अगोदर भारताला ईतिहास नव्हता असे नाही.

                         भारताच्या खात्यावर अनेक अश्या गोष्टी आहेत ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान हवा गणिताचे अनेक नियम हे भारतीयांनी बनवले, भारताने जगाला “शून्य” देऊन एक नवी क्रांती केली. याच बरोबर “शुश्रुत ऋषी” नी “शल्य चिकित्सा” याचा शोध लावला आणि “भारतीय आयुर्वेदात” नवीन शाखा सुरु केली. भारतीयांना “खगोलशास्त्र” पण उत्तमरीत्या अवगत होते आणि हे सगळे “अलेक्झांडर” च्या आक्रमणाच्या अगोदर पासून होते. भारतातील हजारो वर्षे अगोदरची प्राचीन मंदिरे आपण बघतो. ती नक्की कुणी बांधली याची जरी नोंद नसली तरी त्याची डागडुजी केव्हा, कोणी केली याची नोंद आपल्याला जरूर सापडते. हि मंदिर तेव्हा बांधल्या गेली याचाच अर्थ असा कि तेव्हाही भारतीय त्या देवतेवर आस्था ठेऊन होते. अगदी रामायण – महाभारतात पण भारताचा उल्लेख “भारतवर्ष” असा आला आहे. इथे राज्य करणाऱ्या प्रत्येक राजाच्या मनात संपूर्ण भारत पादाक्रांत करून “चक्रवर्ती” बनण्याची अभिलाषा राहिली आहे. मौर्य, गुप्त यांच्या कार्यकाळात तर आज दिसणाऱ्या भारताच्या ९०% भाग त्यांच्या साम्राज्याला जोडलेलाच होता. यातूनच हा संपूर्ण भू-भाग एक “राष्ट्र” म्हणून उदयास येण्याच्या तयारीत नक्कीच होता असे दिसते.
                        
                                 प्राथमिक दळणवळणाची साधन आणि जलद संदेश वहनाचा अभाव या मुळे प्रत्येक वेळेस इतक्या मोठ्या भूभागावर सारखे नियंत्रण ठेवणे हे कोणत्याही राज्यकर्त्या साठी त्या काळात चांगलीच कठीण गोष्ट आसेल आणि त्याच मुळे कदाचित आजच्या नकाशातील “भारत” तंतोतंत तिथे दिसत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या कि या भूभागावरील सामान्य लोक “धार्मिक यात्रा” करत आणि एकमेकांसोबत सुख-दु:ख पण वाटत. उगाच नाही भारताच्या दक्षिण टोकावर रामेश्वरम येथील हिंदू भक्तीभावाने पार उत्तर भागातील मानस सरोवर यात्रा करतो, तर उत्तरे कडील हिंदू त्याच अपार भक्तीने रामेश्वरमला शरण जातो. पार पूर्वे कडील “आसाम” मधील हिंदू पश्चिम किनार्यावर असलेल्या “सोमनाथ” वर भक्तीभाव अर्पण करतो, तर पश्चिमी भागातील हिंदू त्याच श्रद्धेने “कामाख्या देवीच्या” मंदिरात नतमस्तक होतो. भौगोलिक स्थितीनुसार खानपान आणि मान्यता यात काही फरक पडत असला तरी हिंदू धर्माचे सामान्य नियम-अनियम संपूर्ण भारतात सारखेच दिसून येतात. हीच गोष्ट भारतीयांना एक करणारी मोठी कडी आहे आणि भारताला “राष्ट्र” म्हणून एक करणारी सुद्धा.

                               “इंग्रज” आले म्हणून भारताचा जन्म झाला म्हणणारे वरील सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करतात. इग्रज नसते आले तरी येणाऱ्या काळात होणार्या आधुनिक बदलात भारत एक “राष्ट्र” म्हणून उभा झालाच असता, कदाचित थोडा वेळ गेला असता पण या स्थित्यांतराला कोणीही अडवू शकले नसते.
आणि “इंग्रजाने” भारत नक्कीच एक केला नाही, तसे असते तर ते सोडून जातांना ३०० च्या वर संस्थाने भारतात राहिलीच नसती, इग्रजांनी मोठा प्रयत्न भारत तोडन्याचाच केला. त्याचीच फळ भारताला ७० वर्षा नंतर पण “राष्ट्र” न मानाण्यारा लोकांच्या रूपांनी आपल्याला दिसत आहे. हे मान्य करायला काहीच हरकत नाही कि भारतात अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांना तोंड देत आहे. ज्या मुळे अनेकदा नको त्या भावना भारतात समोर येतात, म्हणून हे अजिबात नाही कि भारतियांच आपल्या देशावर प्रेम अजिबात नाही. या समस्यांमध्ये पण इतर अनेक कंगोरे आहेत पण तो या लेखाचा विषय नाही.

                              
म्हणून मी त्याच इग्रजांच्या देशाचे उदाहरण देऊ केले. त्यांच्या आणि आपल्या विचारसरणी मधील मुलभूत फरक हाच आहे कि ते सतत सांगतात कि, “आम्ही कसे घडलो.” आणि आम्ही सतत सांगत असतो कि, “आम्ही कसे घडू शकत नाही.”

टिप्पण्या