महाकुंभ फुटबॉलचा प्रचार इस्लामचा

 


मध्य पूर्व अरब इस्लामी देश कतर मध्ये या वर्षीच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद आहे. कोणत्याही अरब देशांमध्ये विश्वचषकाच्या आयोजनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. कतरला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजनपद मिळाल्यावर आश्चर्य आणि वाद उत्पन्न झाले होते. हे यजमानपद मिळवायला कतरने फिफा अधिकाऱ्यांना जवळपास ३० लाख पौंड, म्हणजेच जवळपास ३७ लाख डॉलर्सची लाच दिल्या गेल्याचा आरोप केला गेला होता. मात्र या आरोपाच्या तपासा करता गठीत चौकशी समितीने हा आरोप फेटाळला, मात्र तरीही संशय कायम आहे. 


हे यजमानपद विवादात अडकण्याची अनेक कारणे आहेत. मुख्यतः फुटबॉल विश्वचषक स्पर्धा साधारणतः जून - जुलै महिन्यात होतात, मात्र या महिन्यात कतर आणि एकूणच मध्य पूर्वेतील देशातील तापमान अतिशय वाढलेले असते. या तापमानात फुटबॉल सामने कसे खेळणार? हा मोठा प्रश्न होता. यावर उपाय म्हणून कतर सामान्यांसाठी वातानुकुलीत स्टेडियम्स उभारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र फिफा अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली. मग हे सामने नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात ज्या काळात कतर मधील तापमान कमी असते तेव्हा खेळण्याचे ठरवण्यात आले. 



मात्र नोव्हेंबर - डिसेंबर हा काळ युरोपियन फुटबॉल क्लब करता अत्यंत व्यस्त असा काळ असतो. इंग्लंडची प्रीमियर लीग, इटलीची सिरी ए आणि स्पेनची ला लीगा या फुटबॉल लीग सामने याच काळात भरवले जातात. फुटबॉल मधील अनेक प्रसिद्ध खेळाडू वेगवेगळ्या क्लब कडून या लीग खेळत असतात. आता या सगळ्या लीग सामन्यांचे वेळापत्रक या मुळे विस्कळीत झाले आहे. 


त्यातच भर म्हणजे कतर मध्ये या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि फुटबॉल स्टेडियम उभारण्याची कामे सुरू असतांना, या करता मोठ्या प्रमाणावर परदेशी मनुष्यबळ आणण्यात आले होते. मात्र या मजुरांना कतर मध्ये अत्यंत हीन वागणूक मिळत असल्याचा आणि कतर सरकार पण यांच्या बाबतीत कायदे पाळत नसल्याचा आरोप आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सतत करत होत्या. 



शेवटी या विवादांवर मात करत कतर आपल्या देशात फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा भरवण्यास जय्यत तयार आहे. हा लेख तुम्ही वाचत असतांन स्पर्धांचा उदघाटन समारंभ पण सुरू असेल. मात्र कतरला यजमानपद बहाल करतांना, तत्कालीन काळात कतरच्या याजमानपदाच्या बोलीचे समर्थन करणारे तत्कालीन फिफाचे अध्यक्ष सेप ब्लँटर मात्र साक्षात्कार झाल्यासारखे या यजमानपदाला पाठींबा देऊन खूप मोठी चूक झाली हे सातत्याने म्हणत आहे. कदाचित त्यांचे बोलणे आता खरी होण्याची चिन्हे आहेत. कदाचित हा विश्वकप सुरू असतांना आणि संपल्यावर पण कतरच्या मागे लागलेले विवाद आणि आरोप संपणार नाही अशी चिन्हे आहेत. 


साधारणतः ऑलम्पिक आणि फुटबॉल विश्वचषक सामने जगातील बहुसंख्य देशात बघितल्या जातात. अनेक देशातील लोक हे सामने बघायला यजमान देशात उपस्थित होतात. या काळात आपल्या देशात येणाऱ्या परदेशी नागरिकांवर आपल्या देशाची चांगली छाप पडावी या साठी यजमान देश सजग असतात. आपल्या देशातील पर्यटन स्थळे, संस्कृती, खानपान याचा प्रभाव परदेशी नागरिकांवर पडावा आणि त्यांना आपल्या देशात पुन्हा पुन्हा यावेसे वाटावे हा या मागचा उद्देश या मागे असतो. अश्या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे त्या देशाची, त्या देशातील पर्यटन स्थळांची, संस्कृतीची, खानपान संस्कृतीची आणि आधुनिकतेची जाहिरात होते. आज पर्यंत ऑलांपिक किंवा फूटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचे यजमानपद असलेल्या देशाचे, शहरांचे नाव मोठे झाले. 



पण, आताचे आयोजन एका कट्टर इस्लामिक अरबी देशात होत आहे. या आयोजनाचा उपयोग हा देश फक्त देशाच्या आणि सामने आयोजित शहरांच्या भविष्यातील आर्थिक उन्नतीसाठी करणार की अजून कोणत्या गोष्टीसाठी करणार? 


मात्र कतर या आयोजनाचा उपयोग आपल्या देशाच्या आर्थिक उन्नती, इतर देशांसोबत व्यापरिक संबंध वाढवायला, आपल्या देशातील पर्यटन वाढवायला करणार तर आहेच, पण मोठ्या प्रमाणावर अधिकृतरित्या इस्लामच्या प्रचारासाठी आणि येणाऱ्या पाहुण्यांना इस्लामची दीक्षा देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. वरकरणी "जगात इस्लाम विषयी, इस्लामच्या शिकवणुकी विषयी असलेल्या गैरसमजांना दूर करण्यासाठी !" असा मुलामा दिला असला तरी प्रत्यक्षात कतरमध्ये परदेशातून येणाऱ्या गैरइस्लामी पाहुणा आपल्या देशात वापस जातांना एक तर इस्लाम स्वीकारलेला राहील किंवा इस्लामच्या प्रेमात पडलेला राहील याची तजवीज केली गेली आहे. या सगळ्यासाठी कतर सरकारचे धार्मिक मंत्रालय व्यवस्थित कामाला लागले आहे. मंत्रालयाची एक टीम आधुनिक दृक् श्राव्य साधनांनी युक्त अश्या गाड्यांचा ताफा आणि मोठे मनुष्यबळ या करता काम करत आहे. महत्वाचे म्हणजे जगात नावाजलेले कथित इस्लामी अभ्यासक आणि प्रचारक यांना खास निमंत्रण कतर सरकारने दिले आहे. या सगळ्या प्रचारकांची भाषणे सामन्या दरम्यान स्टेडियम मधील मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. या इस्लाम प्रचारकांमध्ये भारतातून पळून गेलेला झाकीर नाईक पण विशेष आमंत्रित आहे. त्याची भाषणे पण तेथे दाखवण्यास सुरवात झाली आहे. 


या वरून कतर देशाची आणि तेथील सत्ताधाऱ्यांची मानसिकता आपल्याला लक्षात येईल. मध्यंतरी भाजपाच्या माजी महिला प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या कथितपणे विवादित टिपणीवर इस्लामी देशांमधून जो विरोधाचा सूर आला होता, त्यात टिपेचा आवाज कतर देशाच्या सत्ताधाऱ्यांचा होता हे लक्षात घेणे आवश्यक ! 


महत्वाचे म्हणजे कतर देशाच्या या खेळाचे आयोजन आणि हे आयोजन करतांना आपल्या कट्टर इस्लामी नियमात कोणतीही सूट न देण्याचा, वरून इस्लामी प्रचार - प्रसार करण्याचा, या काळात होणाऱ्या धर्म परिवर्तनाचा मोठ्या प्रमाणावर जाहिरात आपल्या देशात समाज माध्यमांवरून सुरू झाली आहे. अगदी मराठीत ही सगळी माहिती देणारी, त्याचे कौतुक करणारे लेख मोठ्या प्रमाणावर येत आहेत. इतकेच नाही तर या निमित्याने भगौडया झाकीर नाईकचा उदो उदो पण सुरू झाला आहे. 


बाकी या विश्वचषक खेळाच्या आयोजनाने फुटबॉलचे संवर्धन, प्रगती किती होईल हे माहीत नाही. मात्र इस्लामचा टाइम बॉम्ब मात्र ट्रिगर केल्या जाईल का ही भीती आहे.

टिप्पण्या