बागो मे बहार है

तुम्हाला पठाणकोट अतिरेकी हल्ला आठवतो काय? होय, तोच ज्या नंतर भारतीय सेनेने पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून लष्करी कारवाई केली होती....होय तोच !


तर हा अतिरेकी हल्ला अनेक अंगांनी गाजला, मग तो पाकिस्थानच्या तपास अधिकाऱ्यांना बोलावणे असो की त्या नंतर भारतीय सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसत केलेली लष्करी कारवाई "सर्जिकल स्ट्राईक" असो ! मात्र या नंतर पठाणकोट हल्ल्याच्याच पार्श्वभूमीवर अजून एक प्रश्न खूप गाजला होता, तो होता "बागो मे बहार है?"

भारतातील तमाम तथाकथित पुरोगामी पक्ष, त्यांचे चेले चपाटे कुठेही कधीही एकच प्रश्न विचारायचे "बागो मे बहार है?" कारण हा प्रश्न विचारला होता भारतातील सगळ्यात पुरोगामी पत्रकार रविष कुमार याने, हा प्रश्न विचारतांना त्याने काही मूक अभिनय करणाऱ्या कलाकारांना आपल्या कार्यक्रमात बोलावले होते. त्यातून त्याने केंद्र सरकार करत असलेली तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा करवाईवर जळजळीत टीका करण्याचा आव आणला होता, सोबत आपल्या वाहिनीचा पडदा काळा करत सरकारचा जोरकस निषेध व्यक्त केला होता. भारतातील तमाम अर्धबुद्धी जे स्वतःला बुद्धिजीवी, तथाकथित पुरोगामी पक्ष, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी पुढे आले होते. कारण नक्की काय होते?
कारण होते NDTV या वृत्तपत्र वाहिनीवर सरकारने केलेली कारवाई ! सरकारने या वाहिनीला नोटीस देत २४ तासासाठी या वाहिनीचे प्रसारण थांबवण्याची दिलेली शिक्षा ! या शिक्षे विरोधात हा सगळा तमाशा करण्यात येत होता आणि प्रश्न विचारण्यात येत होता, "बागो मे बहार है?"

का केली होती ही कारवाई? कारण सरकारचे म्हणणे असे होते की NDTV चे पत्रकार पठाणकोट हल्ल्याचे थेट प्रक्षेपण करत होतेच, पण हे करतांना ज्यावेळी दोन दहशतवादी जिवंत होते आणि भारतीय सुरक्षा रक्षक व दहशतवादी यांच्यात धमुश्चक्री सुरू होती त्यावेळी इंधनाच्या टाक्यांची जागा, हवाई दलाच्या तळाची रचना आणि तिथल्या महत्त्वाच्या जागा वाहिनीवरून सांगण्यात येत होत्या. ज्यावेळी सैन्याची कारवाई संपलेली नाही, अशा वेळी महत्त्वाची माहिती न दाखवण्याचा संयम वाहिन्यांनी दाखवायला हवा असे मत सरकारकडून व्यक्त करण्यात आले होते. त्या मुळे NDTV ला अशी नोटीस बजावण्यात आली होती. केबल टिव्ही नेटवर्क (रेग्युलेशन) अॅक्ट अंतर्गत कुठल्याही दहशतवादविरोधी कारवाईचं लाइव्ह प्रक्षेपण वाहिन्यांना करता येणार नाही असा प्रोग्रामिंग कोड आहे आणि त्या कोड नुसार ही कारवाई करण्याचा विचार सरकार कडून केल्या गेला होता.

२६/११ च्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस पण अश्याच थेट प्रक्षेपणामुळे पाकिस्थान मधून आपल्या सुरक्षा दलाची हालचाल टिपून प्रत्यक्ष हल्ला करत असलेल्या अतिरेक्यांना मिळत आहे हे भारतीय सेनेने पकडले होते. त्याच पुळे तत्कालीन सरकारने हा कायदा तडकाफडकी आमलात आणला होता. तेव्हा पासून थेट प्रकक्षेपण न करता, काही काळाने प्रक्षेपण करावे असे अपेक्षित आहे. मात्र पठाणकोट हल्ल्याच्या वेळेस NDTV ने हा नियम तर पाळला नाहीच वर सेना शिबिरातील महत्वाच्या जागा पण आपल्या त्या बातमीत दाखवल्या आणि सरकारने गंभीर दखल घेत कारवाई केली. अर्थात NDTV वर अश्या पद्धतीचा आरोप हा पहिला नाही. कारगिल युद्धात पण वार्तांकन करणाऱ्या NDTV ची पत्रकार बरखा दत्त हिच्यावर भारतीय सेनेतून आक्षेप घेण्यात आले होते. मात्र त्या वेळेस वृत्तवाहिन्या नव्या होत्या आणि सेनेला पण अशी परिस्थिती हाताळण्याची सवय नसल्यामुळे मामला थंड बसत्यात गेला होता. मात्र दबावाला बळी पडून म्हणा अथवा सरकारचा मोठेपणा म्हणा तेव्हा या करवाईतून NDTV ची सुटका झाली होती. आता इतके सारे आठवण्याचे कारण काय?

तर सध्या अजून एक पत्रकार आणि त्याची वाहिनी एका विवादात अडकली आहे, फक्त हा पत्रकार तथाकथित पुरोगामी नाहीये ! भारतातील तमाम विरोधी पक्ष, त्यांचे चेले चपाटे, तथाकथित पुरोगामी पत्रकार मात्र या पत्रकारावर कारवाई करावी म्हणून सरकार समोर आक्रोश करत आहेत. हा पत्रकार आहे अर्णव गोस्वामी ! आरोप आहे आपल्या वाहिनीची TRP चुकीच्या पद्धतिने वाढवण्याचा प्रयत्न करण्याचा जेणे करून आपल्या वाहिनीकडे जास्त जाहिरातदार आकृष्ट होतील आणि आपले उत्पन्न वाढेल.

राज्याच्या ठाकरे सरकार विरोधात आघाडी उघडलेल्या या पत्रकाराला चुकीच्या पद्धतीने अटक करून कारागृहाची सफर राज्य सरकारने घडवून आणली होती. न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत त्याची सुटका केली. तेव्हा पासून राज्य सरकार अर्णवला पुन्हा चांगली अद्दल घडवायच्या मागे होती. तेव्हाच मुंबई पोलिसांना वाहिन्यांची TRP पैसे घेऊन वाढवण्याच्या कंपचा शोध लागला. त्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली. खुद्द मुंबई पोलीस कमिश्नरांनी पत्रकार परिषद घेत ही बातमी पत्रकारांना दिली होती. सध्या ब्रॉडकस्ट ओडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) ही TRP बघणारी संस्था या घोटाळ्यातील मुख्य आरोपी. या प्रकरणात बार्कचे माजी सी ई ओ पार्थ निर्मल दासगुप्ता, रोमिल रामगढीया यांच्या सोबत या घोटाळ्यात स्वतःच्या वाहिनीचा फायदा करून घेतला अश्या फक्त मराठी या वाहिनीचे शिरीष पट्टणशेट्टीवार, बॉक्स सिनेमा या वाहिनीचे नारायण शर्मा, यांच्या सोबतच हंस रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडचे विशाल वेद भंडारी, बोंपली मेस्त्री या सगळ्यांना अटक केली. मात्र अगदी पहिल्या दिवसापासून अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक वाहिनीचे नाव या घोटाळ्यात चर्चेत असून मुंबई पोलिसांनी अजून अटक केली नाहीये.

मात्र मुंबई पोलिसांनी काही व्हाट्स अँप चाट जे अर्णव गोस्वामी आणि पार्थ निर्मल दासगुप्ता यांच्या मध्ये झाले आहेत ते सार्वजनिक केले आहेत. या मध्ये अनेक बाबतीत झालेल्या चर्चे सोबतच पुलवामा अतिरेकी हल्याबद्दल झालेल्या चर्चेचा बागुलबुवा उभा करण्यात येत आहे. त्यात पुलवामा हल्ल्यानंतर अर्णव सांगत आहे "कुछ तो बडा होने वाला है पाकिस्थान मे" ! आता या वरून अर्णवला होणाऱ्या एअर स्राईकची माहिती होती आणि ती सरकारने पुरवली होती असा जावईशोध विरोधी पक्ष आणि त्यांचे रेम्या डोक्याचे समर्थक लावत आहेत.



आता यांचा शोध कसा गंडलेला आहे ते पहा.



आता विरोधकांचा पहिला आरोप आहेआरोप पुलवामा हल्ला होणार हे अरनबला माहिती होते. पण वस्तुस्थिती अशी आहे की हा आरोप पूर्णपणे बनावट आहे. पुलवामा हल्ला हा १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झाला, आणि अरनबच्या व्हाट्स अँप चाटची तारीख २३ फेब्रुवारी २०१९ आहे. दुसरा आरोप आहे की पुलवामा हल्ला झाल्यानंतर अरनब आनंदी झाला होता. पण चाट वाचल्यावर, "We won it like crazy " हे अर्णव रिपब्लिक वाहिनीच्या चांगल्या प्रसिद्धी विषयी बोलत आहे, ना की पुलवामा हल्ला विषयी. आता महत्वाचा आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षतेचा प्रश्न असल्याचा आरोप की,अरनबला बालाकोट एअर स्ट्राईकची माहिती आधीच होती. पण वस्तुस्थिती ही की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर सभेत इशारा दिला होता की पुलवामा हल्ल्याची फार मोठी किंमत पाकिस्तानला लवकरच चुकवावी लागणार आहे.शेंबड्या पोरालाही लक्षात येईल की मोदी लवकरच मोठी कारवाई करणार आणि या नंतर देशातील समाज मध्यमावर पण "कुछ बडा होने वाला है" चे संदेश फिरायला लागले होते. पाकिस्थान सुद्धा या नंतर आपल्यावर सर्जिकल स्ट्राईक पुन्हा केल्या जाईल या भीती खाली वावरत होता. मात्र नक्की काय होणार हे कोणालाच माहीत नव्हते.



बाकी संसद हल्ला झाल्यावर जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई याला संसद भवनाचे दरवाजे या करता बंद करण्याचे सुचले की फक्त आपल्याजवळ या हल्ल्याचे चांगले दृश्य राहतील आणि आपल्या वाहिनीला फायदा होईल, आणि सरदेसाईच्या समयसुचकतेचे आणि व्यवसायिक मेंदूचे कौतुक करणारे मात्र रिपब्लिक वाहिनीच्या अर्णव गोस्वामीचा मात्र त्याच व्यवसाईकतेसाठी निषेध करत आहे हे हास्यास्पद नाही काय? बाकी बालकोट एअर स्ट्राईक होणार हे अर्णवला माहीत नव्हते हे तर वर आलेच आहे, काही मोठे होणार हा त्याचा अंदाज होता. मात्र त्याने हा अंदाज पण आपल्या वाहिनीवरून दाखवला नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. बाकी NDTV ने पठाणकोट हल्ल्याच्या वेळेस कायदा मोडून केलेले थेट प्रक्षेपण आणि अगदी सेनेच्या शिबिरातील महत्वाच्या जागा दाखवणारे बतमीपत्र ज्यांना खुपले नाही त्यांना मात्र "कुछ बडा होने वाला है" हे जास्त खुपत आहे हे हास्यास्पद आहे.



तरी TRP घोटाळा असो किंवा चाट प्रकरण पोलिसांनी योग्य तपास करावा आणि अर्णव वर पक्क्या पुराव्यानिशी खटला लवकरात लवकर दाखल करावा, कारण निदान राज्य सरकार तर तुमच्याच हातात आहे, उगाच हवेत गोळीबार करत बसू नका आणि एकदा आठवा "बागो मे बहार है"

टिप्पण्या