कर नाही त्याला डर कशाचा?

                ९० च्या दशकात "जैन डायरी" प्रकरण समोर आले होते. प्रसिद्ध उद्योकपती बी. आर. जैन यांच्या वर पडलेल्या CBI धाडी मध्ये त्यांच्याकडे काम करणाऱ्या जैन नावाच्याच व्यक्तीकडे असणारी एक लाल डायरी CBI ने हस्तगत केली आणि भारतीय राजकारणात भूकंप झाला. सत्ताधारी काय, विरोधी पक्ष काय सगळेच या डायरीच्या पानावर असलेल्या नावात अडकले. ही नाव "हवाला" मार्गे पैसे मिळालेल्या लोकांची आहे असा दावा तत्कालीन  CBI अधिकाऱ्यांनी केला, चौकशी सुरू झाली.
            तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांचे नाव या यादीत असल्यामुळे याचीही चौकशी करण्यात आली. पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असूनही बिनबोभाट चौकशीला सामोरे गेले.

                    भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांनी तर राजकीय सुचिता याचा नवीन आदर्श उभा केला. या प्रकरणात चौकशी सुरू असतांना १९९६ मध्ये घोषित लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते उभे पण राहिले नाही, कारण एकच भ्रष्टाचाराचा डाग असतांना आपण लोकांसमोर कसे जाणार? हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला.

                  या जैन हवाला प्रकरणाच्या चौकशीतुन कोणताही आरोप अडवाणी यांच्या वर सिद्ध न होता सहीसलामत सुटल्यावर १९९८ च्या लोकसभा  निवडणुकीत ते पुन्हा गांधीनगर वरून उभे राहिले आणि जिंकले पण!

                  पी व्ही नरसिंहराव यांना पण सेंट किटस् प्रकरणात न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागले आणि ते प्रत्येक वेळेस चौकशीला सामोरे गेले. लखुभाई पाठक फसवणूक प्रकरणात तर त्यांच्यावर आरोप निश्चित झाल्यावर १९९७ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्या नंतर सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
                            आज भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांना ज्या प्रकारे CBI ला अटक करावी लागली, हे बघून वरील दोन्ही प्रकरणाची आठवण झाली. निदान गृहमंत्री म्हणून ज्यांच्या हातात देशाच्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जवाबदारी होती अश्या माणसाने तरी न्यायालयाकडून जामीन रद्द झाल्यावर स्वतःहून CBI समोर हजर होत चौकशीला सामोरे जायला हवे होते. या अगोदर ज्या न्यायालयाने तब्बल बावीस वेळा चितंबरम यांना जामीन दिला होता. पण या वेळेस जामीन न मिळाल्यावर महाशय ३० तास गायब राहिले ते का? मनात चोर असल्यामुळेच ना? 

                           अर्थात ज्या काँग्रेस पक्षात चितंबरम आहेत त्या पक्षाचे आजी आणि माजी अध्यक्षच भष्टाचाराच्या आरोपात जामिनावर बाहेर असल्यामुळे हे काही वेगळे वागले असे नाही. सोनिया आणि राहूल गांधी यांना नॅशनल होराल्ड प्रकरणात फक्त न्यायालयात हजर राहावे लावले म्हणून काँग्रेस मोर्चे काढून निषेध व्यक्त करत न्यायाल्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात. 
                         खरे तर काँग्रेस आणि काँग्रेसी नेते अजूनही भारताच्या भाग्यविधाता असलेल्या अहंकारातून बाहेर आलेले नाही. गांधी आणि त्यांची पिलावळ अजूनही स्वतःला भारतातील असे विशेष व्यक्ती मानतात की त्यांची चौकशी न्यायालय, CBI, ED सारख्या संवैधानिक संस्था पण करू शकत नाही. या अहंकारातून काँग्रेसने लवकरात लवकर बाहेर येणे गरजेचे आहे.

                        गंम्मत म्हणजे हेच नेते आणि त्यांचे चेलेचपाटे दिवसरात्र आपण भारतीय संविधान आणि कायद्यावर कसे विश्वास ठेवतो हे दाखवायचा आटोकाट प्रयत्न करत असतात आणि इकडे त्याच संविधान आणि कायद्याला ठेंगा दाखवतात!
                        खरे तर मराठीत एक म्हण आहे "कर नाही त्याला डर कशाचा?" समजा तुम्ही चुकीचे वागलेच नाही आहात तर चौकशीला समोर जायला का घाबरता? हा खरा प्रश्न आहे. राजकिय सूड वगैरे जरी असले तरी स्वतःच्या वागण्यातून तरी कायद्याचा सन्मान करतो हे दाखवता येते हे वरच्या उदाहरणात दिसलेच आहे. महाराष्ट्रात पण राज ठाकरे यांना ED ने केवळ चौकशी करताच बोलविले आहे. पण आपण केलेली पाप आपल्या मनात असल्यामुळे या चौकशीची भीती वाटत असेल तर मग आपल्या चेल्यांमार्फत सामान्य जनतेला वेठीला धरणे किंवा ३० तास फरारी राहणे असली थेर सुचतात असेच म्हणावे लागेल.

टिप्पण्या