नरेंद्र मोदी - देशाच्या "धार्मिक" राजकारणाचा "अक्ष" बदलणारा माणूस

           नरेंद्र मोदी यांनी भारतातील तमाम तथाकथित पुरोगामी, सेक्युलर राजकारण्यांच्या तोंडाला फेस आणला आहे हे नक्की.
              मोदी यांनी २०११ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असतांना "सद्भावना मिशन" नावाचा कार्यक्रम केला होता. भारतातील विविध धर्माच्या धर्मगुरूंना एकत्र करत प्रार्थना आणि उपवास असा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम प्रसारित करायला भारतातील तमाम वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात एक मुस्लिम मौलाना, मौलाना मेहंदी हसन बाबा यांनी मोदींना मुस्लिम धार्मिक टोपी घालायचा प्रयत्न केला. तेव्हा या तमाम वृत्तवाहिन्यांसमोर मोदी यांनी ती "टोपी" घालायचे नाकारले. भारतात कोण्या राजकारण्यांनी अशी हिम्मत दाखवली होती. या घटनेवर विरोधी पक्षाने मोठा वाद उभा केला होता. पण भारतात मात्र या घटनेचा मोठा सकारात्मक परिणाम झाला. माझ्या मते मोदी यांची लोकप्रियता वाढण्यामागे या घटनेचा मोठा हात होता. त्या नंतर वाराणसीत होणाऱ्या "गंगा आरतीत" सहभागी होत तमाम हिंदूंना खिशात घातले आणि विरोधकांना तडफडत ठेवले.

               या नंतर मोदी यांचा झंझावतात तथाकथित भारतीय पुरोगामी आणि सेक्युलर पक्षाची आणि त्यांनी तयार केलेल्या "धार्मिक मतपेढी" ची पतझड सुरू झाली. इतकेच नाही तर भारतीय राजकारणाचा "धार्मिक" अक्ष या माणसाने बदलवून टाकला. इतका की अरविंद केजरीवाल सारख्या माणसाला गंगेत डुबकी मारायला लावली.
                      गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कट्टर सर्वधर्म समभावाचे गोडवे गाणाऱ्या काँग्रेस पक्षाला तथाकथित "सॉफ्ट हिंदुत्वा" कडे वळावे लागले. ज्या पक्षात मुस्लिमांची धार्मिक ओळख असणारी गोल टोपी घालून, मुस्लिमांच्या "रमजान" या सणात "इफ्तार पार्टी" करणे हे आवश्यक समजले जात होते, त्या काँग्रेस पक्षाच्या राजकुमाराला "जानवे" घालून देवळात फिरवण्याची कर्तबगारी नरेंद्र मोदी यांच्या खात्यात जमा झाली. अहो, इतकेच नाही तर "धर्मला अफूची गोळी" मानणारे कम्युनिस्ट डोक्यावर हिंदू देवतेला घेत चक्क हिंदू धार्मिक सणात सहभागी झाल्याचे छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्धीला द्यायला लागले. हे तेच कम्युनिस्ट होते जे पश्चिम बंगाल मध्ये सत्तेत असून कधी उघडपणे "दुर्गापूजेत" सहभागी होत नसत.
                     २०१९ ची लोकसभा निवडणूकीचे निकाल कोणाच्याही बाजूने येऊ द्या. मात्र या निवडणुकीचा एक बदल बघून मोठे चुकल्या चुकल्या सारखे होत आहे. खरे तर या निवडणुका मुस्लिमांचा धार्मिक सण "रमजान" च्या महिन्यात होत आहे. हाच "माणीकांचनयोग" २०१४ पूर्वी आला असता तर, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रात मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव, लालू प्रसादचे पोर, राहुल गांधी "गोल टोपी" घालून, तर सोनिया, प्रियंका, मायावती, ममता डोक्यावर पदर गुंडाळून "इफ्तार पार्ट्या" आयोजित करतांना दिसल्या असत्या. 

                         तुमच्या लक्षात आले का? यादव पिता-पुत्र आणि मायावती यांनी भलेही त्याच्या प्रचारसभेत मुस्लिमांना नरेंद्र मोदी यांची भीती घालत धार्मिक मुद्यावर मते मागितली असतील, पण "इफ्तार पार्टीचे" एकही छायाचित्र त्यांनी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रात येऊ दिले नाही. जी गत उत्तर प्रदेशातील यादवांची तीच गत बिहार मधील लालू पुत्रांची झाली.
                      काँग्रेसने पण आपला गुजरात, कर्नाटक मधील "सॉफ्ट हिंदुत्वाच्या" नाटकाचा पुढील अंक या निवडणुकीत पण कायम ठेवला. राहुल गांधी थेट तिरुपती येथील बालाजी मंदिरात धोतर घालून पोहचले, तर प्रियांका वाद्रा महादेवाच्या अभिषेकाच्या छायाचित्रात चमकून गेल्या आणि गंगेच्या पाण्याचे "आचमन" करतांना वृत्तवाहिन्यांवर दिसायला लागल्या.
                             तिकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भलेही कितीही मुस्लिम धार्जिणेपणा करो, नरेंद्र मोदी यांच्या "हिंदुत्वाच्या राजकारणाला" शिव्यांची लाखोली वाहो, पण त्यांनी देखील देशाच्या वृत्तसृष्टीत आपला "नमाज अदा" करतानाचे छायाचित्र येऊ दिले नाही. अर्थात आपल्या धसमुसळ्या आणि आक्रमक स्वभावा पाई त्या "जय श्री राम" च्या घोषणा देणाऱ्या लोकांना रागावंतांना चित्रफितीत अडकून भाजपला एक मुद्दा हातात देऊन गेल्या, तरी त्यांनी त्यांच्या स्वभावाविरुद्ध या करता बरीच काळजी घेतली. 
                           पण या सगळ्या प्रतिकात्मक राजकारणात नरेंद्र मोदी सगळ्या राजकारण्यांवर भारी पडले ते आपल्या "केदारनाथ" दौऱ्याने. खरे तर १९ मे ला शेवटच्या चरणाचे मतदान होणार, म्हणून आता खुला प्रचार बंद झाला आहे. पण मोदी यांनी १८-१९ तारखेला केदारनाथ येथे फक्त दौराच नाही, तर ध्यान, पूजा करणार असे जाहीर केले. भारतातील तमाम वृत्तवाहिन्या धावत केदारनाथला पोहचल्या, आणि थेट प्रक्षेपण करत्या झाल्या. विरोधकांनी दाखवलेले "हिंदुत्व" नरेंद्र मोदी यांनी एका झटक्यात पुसून काढले. 

                    गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि भगवी कफनी घालून ध्यानाला बसलेल्या नरेंद्र मोदी यांची छवी भारतातील तमाम हिंदू जनतेला नक्कीच सुखावह वाटली असणार यात शंका नाही.

                   पण विरोधकांना मात्र त्याच्या "इफ्तार पार्टीची" जाहिरात न करण्याच्या कथित "मास्टर स्ट्रोक" चे अतीव दुःख होत डोके फोडून घ्यायची वेळ आली असणार हे नक्की.

टिप्पण्या

  1. No one is any where near Modi.All are trying to copy his love for Hindus and most of the people in India knows the drama of the other political leaders.

    उत्तर द्याहटवा
  2. मोदीजीं नी आपले सत्व कायम ठेवून सर्वधर्म समभाव कसा अंगिकाराव याचा स्वतःच्या उदाहरणा वरुन परीपाठ घालून दिला.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी बरोबर,आपली हिंदू धर्म परंपरा आपण का सोडायची हे हिमतीने कृतीतून दाखवून देणारे पहीलेच पंतप्रधान

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा