राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तथाकथित भारतीय पुरोगामी – भाग 2


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तथाकथित भारतीय पुरोगामी – भाग १



जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

              “भविष्याचा भारत – संघाच्या दृष्टीकोनातून” या कार्यक्रमात पहिल्या दोन दिवसीय व्याख्यानमालेत सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांनी “संघाचा” ९३ वर्षाचा इतिहास, “संघाचा” विचार, “संघाच्या” भावना, “संघाचे” कर्तव्य, आणि “संघाचा” सगळ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन उत्तम प्रकारे मांडलेले आपण कालच्या लेखात बघितले. थोडक्यात सांगायचे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या “राष्ट्र आरती - जयोऽस्तु ते मधील वरील ओळी “भारता” करता कश्या पूर्ण करता येतील याचा ध्यास “संघ कार्यात” दिसून येतो.

          सोबतच या दोन दिवसीय व्याख्यानाचे “दुवे” मी सोबत जोडलेले आहे. त्या मुळे लिखाणाच्या ओघात किंवा माझ्या आकलन शक्तीच्या क्षीणते मुळे काही मुद्दे सुटले असतील तर ते आपल्या ध्यानात येतीलच. 

दिवस १ ला

 
          आता येऊ ते लेखाच्या मूळ मुद्याकडे, तर “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या” या उपक्रमाकडे भारतातील तथाकथित पुरोगामी लोकांनी कसे बघितले ? आणि का ?

          खरे तर सरसंघचालकांनी पहिल्या दोन दिवसात जे काही सांगितले ते काही नवे नाही. पण जे संघाला “अस्पृश्य” मानतात आणि “हिंदुत्वाच्या” बाजूने बोलणे म्हणजे जणू “समाज हिता” विरुद्ध बोलणे असे समजल्या जाते. “विचारांचे युद्ध हे विचारांनी लढायचे असते” असली वाक्ये टाकणारे हे तथाकथित पुरोगामी मात्र “संवादालाच” घाबरतात हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकर्षाने समोर आले.
दिवस २ रा :- 

              या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या “जिज्ञासा” पूर्ण करण्याची सुवर्ण संधी खरे तर भारतातील या पुरोगामी जमातीला मिळाली होती, पण आपल्या “पोथीनिष्ठ” विचारांच्या आहारी गेलेल्या पुरोगाम्यांना मात्र तसे करता आले नाही.

             खरे तर संघ “बंदिस्त” कधी नव्हता, ना आहे. “संघाने” या आधीही, “संघाला “बाहेरून” बघून तो कसा आहे हे न ठरवता, “संघात” येऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन ठरवा” असे आवाहन अनेकदा केले आहे, मात्र “संघाला” बदनाम करणार्यांनी मात्र तिकडे कधीही लक्ष न देता आपला बदनामीचा एक कलमी कार्यक्रम सुरूच ठेवला, याचे एकमेव कारण म्हणजे त्यात “देशाचा” किंवा “समाजाचा” फायदा होता हे नाही, तर त्यात फक्त आणि फक्त या तथाकथित “पुरोगाम्यांचा” फायदा होता. म्हणूनच जेव्हा या कार्यक्रमाच्या आयोजनाचे कळले तेव्हा सगळ्यात पहिले या आयोजना विषयी अनिष्ट शंका पण याच कंपूने बाहेर काढल्या, पण रोज वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या, समाज माध्यमे या वर “संघावर” वेगवेगळे आरोप करणारे हे तथाकथित पुरोगामी मात्र या कार्यक्रमावर “बहिष्कार” टाकून मोकळे झाले. “सहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारांची लढाई” सारख्या शब्दांना भारतात खऱ्या अर्थाने पराजित कोणी केले असेल तर, याच “पोथीनिष्ठ” पुरोगामी म्हणवणाऱ्या कंपूने.

            विदेशात जाऊन “संघाला” दहशतवादी संघटनेच्या बरोबरीने उभे करणारे किंवा “संघात महिला जाऊ शकत नाही.” या ऐकीव माहितीवर, कारण माहित नसतांना संघावर श्री राहुल गांधी असो किंवा “संघ” संविधान मानत नाही, लोकशाही वर विश्वास नाही असा आरोप करणारे डावे पक्ष असो, किंवा संघावर “जातीयतेचा” आणि “मनुस्मृती मानतो” असा आरोप सतत करणारे “दलित नेते” असो या सगळ्यांना खरे तर “संघाच्या” व्यासपीठावर जाऊन “संघाला” अडचणीचे प्रश्न विचारून अडकवायची पूर्ण संधी यांनी का घालवली ?? याचे उत्तरेच खरे तर हा कर्यक्रम बघून मिळतात.

          तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवशी सरसंघचालक श्री. मोहनजी भागवतांनी दोन दिवसात विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली. यात अगदी पुरोगाम्यांच्या कळीचा प्रश्न “बंच ऑफ थॉटस” असो, कि संघाच्या वरच्या फळीत अजून इतर जातीय का दिसत नाही ? हा असो, मग धर्म परिवर्तनाचा प्रश्न असो, कि तथाकथित “गोरक्षकांनी” केलेल्या हत्यांचा प्रश्न असो, किंवा देशाला भेडसवणारे कोणतेही “आर्थिक, सामाजिक, राजकीय” प्रश्न असो प्रत्येक प्रश्नावर कोणतीही लपवाछपवी न करता सरसंघचालकांनी “संघाचा” दृष्टीकोन अगदी स्पष्ट पणे ठेवला. मुळातच हा भागही पाहण्यासारखा आहे, याचा “दुवा” सोबत देत आहे.

दिवस ३ रा 

                मग प्रश्न हा पडतो कि पुरोगामी या वेळी काय करत होते ?? तर ते नेहमी प्रमाणे या कार्यक्रमात सहभागी न होता, संघाला प्रश्न विचारण्या एवजी दूरचित्रवाणी वर, वृत्तपत्रामध्ये, समाज माध्यमांवर वेगवेगळे आरोप करत, भूतकाळातील घटनांवर जे भाष्य संघाने किंवा संघ पदाधिकाऱ्याने कधी केलेच नाही ते लिहून फक्त संघाची “बदनामी” करायचा प्रयत्न करत होते.

              अर्थात “भारत तेरे तुकडे होंगे”, “घर घर अफजल पैदा होंगे” म्हणणाऱ्याच्या मागे उभे राहणारे, किंवा समजाला “प्रबुद्ध” करण्याच्या नावाखाली त्याला “संवैधानिक व्यवस्थेविरुद्धच” उभे करण्याचे काम करणाऱ्या, “संविधान, न्यायव्यवस्था आणि लोकशाहीचे” गोडवे गात त्याच “संविधानाला, न्यायव्यवस्थेला आणि लोकशाहीला” सुरुंग लावणाऱ्या “नक्षलवादी” लोकांसोबत जाऊन “रक्तरंजित क्रांती” करायची स्वप्न बघणाऱ्या या तथाकथित पुरोगाम्यानकडून दुसरे काही अपेक्षित पण नाहीये.

            माणसातील “माणूसपणा” मोठा करत “समाज” घडवून त्या समाजावर पूर्ण भरवसा करत भारताला एक “समर्थ राष्ट्र” म्हणून जगात उभे करण्याचे फक्त स्वप्न न बघता, त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वत: च्या “सर्वस्वाचा” त्याग करणाऱ्या स्वयंसेवकांची “फळी” उभी करणाऱ्या. तरी पण अगदी नम्र पणे “संघाचे काम फक्त “शाखा” लावणे आणि त्यात “खेळणे” इतकेच आहे. बाकी कार्य स्वयंसेवक स्वतःच करतात.” हे सांगणारे सरसंघचालक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नक्कीच वेगळे आणि आश्वासक आहे.   

टिप्पण्या